Leading International Marathi News Daily
मंगळवार, २४ मार्च २००९

रानमेव्याने रान बहरले..
शाहूवाडी, २३ मार्च / वार्ताहर

शाहूवाडीबरोबर जिल्ह्य़ातील चंदगड, आजरा, राधानगरी, गगनबावडा, पन्हाळा आदी तालुक्यातील रानमेवा समजल्या जाणाऱ्या फणस, आंबा, जांभूळ, करवंद आदीने यावर चरितार्थ असणारे सुखावले आहेत. या डोंगरी तालुक्यातील डोंगरकपारीत राहणारे, धनगरवाडे वस्त्यांवर राहणारे बहुतांशी कुटुंबे या रानमेव्यावर आपला चरितार्थ चालवतात. ते हा रानमेवा विकतात आणि दैनंदिन गरजा भागवतात.

दस कहानियाँ..
रूपेरी पडदा आणि राजकारणाचा संबंध तसा जुनाच. अगदी सुनील दत्त यांच्यापासून दक्षिणेतील आघाडीच्या नेत्यांनी एकेकाळी लाईट, कॅमेरा, अ‍ॅक्शनचे विश्व गाजविले होते. त्यानंतर मतांचा जोगवा मागत ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले नि यशस्वीही झाले. सध्याच्या राजकारणावर नजर टाकली तरी धर्मेद्र, हेमा मलिनी, शत्रुघ्न सिन्हा, विनोद खन्ना, जया प्रदा, जया बच्चन, गोविंदा आणि आता अगदी नगमा, मुन्नाभाई संजूबाबापर्यंतचे तारे-तारका ‘ताई-माई-आक्का, विचार करा पक्का’चे नारे देत हिंडणार आहेत.

हातकणंगलेत राजू शेट्टी यांची उमेदवारी
शरद जोशी, रघुनाथ पाटील यांच्या शेतकरी संघटनांची विचित्र कोंडी

आष्टा, २३ मार्च / शीतल पाटील

हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आमदार राजू शेट्टी यांनी आपली उमेदवारी जाहीर केली असून त्यांच्या उमेदवारीला शिवसेना- भारतीय जनता पक्षाचा पाठिंबा असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे खासदार शरद जोशी व रघुनाथ पाटील यांच्या दोन्ही शेतकरी संघटनेची या निवडणुकीत कोंडी होणार आहे, तर शिवसेना- भाजपला अस्पृश्य समजणाऱ्या तिसऱ्या आघाडीतही कमालीची अस्वस्थता पसरली आहे.

.. अखेर साताऱ्यात राष्ट्रवादीचा देव पावला
सातारा, २३ मार्च/प्रतिनिधी

काँग्रेसचे नेते माजी महसूल राज्यमंत्री उदनयराजे भोसले यांनी देवदर्शनावर सपाटा लावला होता. अखेर राष्ट्रवादीचा देव पावल्याने आज त्यांची सातारा लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी जाहीर झाली. ही वार्ता समजताच त्यांच्या चाहत्यांनी जल्लोष करून आनंद व्यक्त केला. उदयनराजे यांनी सातारा लोकसभा मतदारसंघातून कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवायची याचा निर्धार करून जिल्हा ढवळून काढला होता. त्यांच्या मातोश्री राजमाता कल्पनाराजे भोसले यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना भेटून उदयनराजेंना उमेदवारी देण्याविषयी गळ घातली होती.

भाजप निष्ठावंतांना वाटते महाआघाडीची आडकाठी
मिरज, २३ मार्च / वार्ताहर

काँग्रेसचा उमेदवार अनिश्चित अन् भारतीय जनता पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांची विकास महाआघाडीला असहकार्याची गर्भित धमकी! यामुळे सांगली लोकसभेसाठी बंडखोरीचे हत्यार सध्या तरी थंडावले आहे. काँग्रेसचे आमदार अजित घोरपडे यांनी सहकार्य मागितलेले नसताना विकास महाआघाडीने घातलेला घाट भाजपच्या ‘कमळा’वर निष्ठा ठेवणाऱ्यांच्या पोटशूळचे कारण ठरू पहात आहे. काँग्रेसची उमेदवार यादी अद्यापही जाहीर करण्यात आलेली नसली तरी विद्यमान खासदार प्रतीक पाटील यांनाच पुन्हा संधी दिली जाण्याची शक्यता गृहीत धरून विरोधकांचे डावपेच सुरू होते.

सुशीलकुमार की प्रणिती?
सोलापूर, २३ मार्च/प्रतिनिधी

सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपने उमेदवार जाहीर करुन आघाडी घेतली असली तरी काँग्रेसच्यावतीने सुशीलकुमार शिंदे की त्यांच्या कन्या कु. प्रणिती शिंदे याबद्दल काँग्रेस कार्यकर्त्यांतच संभ्रम निर्माण झाला आहे. गेल्या आठवडय़ात भाजपने सोलापूरच्या राखीव मतदारसंघासाठी चित्रपट अभिनेते अ‍ॅड. शरद बनसोडे यांची उमेदवारी जाहीर केली. मात्र काँग्रेसच्यावतीने सुशीलकुमार शिंदे की प्रणिती शिंदे याबाबत अद्याप कसलाही निर्णय झाला नाही. दरम्यान, श्री. शिंदे यांना काँग्रेसने बिहारचे प्रभारी म्हणून नियुक्त केले आहे. शिवाय श्री. शिंदे यांची राज्यसभेवरील मुदत अद्याप साडेतीन वर्षे शिल्लक आहे. या परिस्थितीत श्री. शिंदे यांच्याऐवजी त्यांच्या कन्या प्रणिती यांनाच उमेदवारी मिळेल, अशी अटकळ बांधण्यात आली आहे. तद्वतच कु.प्रणिती यांनी लोकसभा मतदारसंघात प्रचार कार्याला सुरुवातही केली आहे. फक्त त्या काँग्रेसला विजयी करा, असे म्हणत आहेत. दुसरीकडे श्री. शिंदे यांच्या प्रचारासाठी लागणारे फलक, पोस्टर्स त्यांच्या नावाने तयार करण्यात आली आहेत. त्यामुळे त्यांनाच उमेदवारी मिळेल,असा विश्वास काही कार्यकर्त्यांना वाटतो. भाजपच्यावतीने धनसंपन्न असलेल्या अ‍ॅड. बनसोडे यांना उमेदवारी दिल्यामुळे सुशीलकुमारांसारखाच तगडा उमेदवार हवा, अन्यथा २००४ प्रमाणे पक्षाला दगाफटका होऊ शकतो, अशी शंका व्यक्त होत आहे.

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या दोघांना पोलीस कोठडी
माळशिरस, २३ मार्च/वार्ताहर

नियोजित पतीबरोबर दूरदर्शन संच खरेदीसाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी वेळापूर पोलिसांनी अकलूजच्या दोघांना अटक केली असून त्यांना पुढील तपासासाठी २६ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. ओझा यांनी दिला आहे.पंचवटी (अकलूज) येथील या १५ वर्षीय मुलीचे लग्न ठरले होते. मात्र वय कमी असल्याने त्यांच्या लग्नाचा कार्यक्रम पुढे ढकलला होता. दि. २२ मार्च रोजी सकाळी ११ वा.च्या सुमारास हे नियोजित पती-पत्नी दूरदर्शनसंच खरेदीसाठी वेळापूरला गेले असताना विनोद कांबळे, सोमनाथ हुलगे व बाळू निचळ असे एका रिक्षातून आले व त्यांनी या मुलीच्या नियोजित पतीस तू या मुलीबरोबर लग्न करू नको म्हणत त्यास मारहाण व शिवीगाळ केली व या मुलीस बळजबरीने रिक्षात घालून श्रीपूर येथील विश्वतेज लॉजमध्ये तिला रात्री १० वाजेपर्यंत डांबून ठेवले व बाळू निचळ याने तिच्यावर बलात्कार केला, अशी फिर्याद बलात्कारीत मुलीने वेळापूर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.

‘कर्म उपासनेच्या आधारे सच्चिदानंद पदवी घ्यावी’
कागल, २३ मार्च / वार्ताहर

कर्म उपासना व ज्ञानाच्या आधारे सच्चिदानंदांची पदवी संपादन करा. अन्य पदव्या चरितार्थ मिळवून देतात, परंतु सच्चिदानंदांची पदवी जीवनात आनंद निर्माण करते असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय प्रवचनकार डॉ. श्रीकृष्ण देशमुख यांनी केले. डॉ. देशमुख यांचा मुरगूड (ता.कागल) येथे अमृतमहोत्सवी वर्षांनिमित्ताने नागरी सत्कार संपन्न झाला. अध्यक्षस्थानी शाहू कारखान्याचे चेअरमन विक्रमसिंह घाटगे होते तर गोकुळचे संचालक रणजितसिंह पाटील, प्रवीण पाटील, महालक्ष्मी दूध संघाचे चेअरमन प्रा.संजय मंडलिक यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. देशमुख यांचा सत्कार रणजितसिंह पाटील तर वसुंधरा देशमुख यांचा सत्कार सौ. सुहासिनीदेवी घाटगे यांच्या हस्ते करण्यात आला.

कृष्णा पाणी योजनेला थकबाकीमुळे सील
इचलकरंजी, २३ मार्च / वार्ताहर

पाटबंधारे खात्याकडील ११ कोटी रुपयांची थकबाकी न भरल्याने कृष्णा नळपाणी पुरवठा योजनेच्या उपसा केंद्रास सील ठोकण्यात आले. यामुळे शनिवारी दिवसभर पाणी उपसा होऊ शकला नाही. रात्री उशिरा हे सील खोलण्याचे प्रयत्न सुरू होते. इचलकरंजी शहराला कृष्णानळपाणी पुरवठा योजनेतून पाणी पुरवठा केला जातो. मजरेवाडी (ता.शिरोळ) येथील उपसा केंद्रातून उपसा केलेल्या पाण्याचे ११ कोटी रुपयांचे बिल थकीत आहे. २००१ सालापासून असलेली थकबाकी वसूल होण्यासाठी पाटबंधारे खात्याने पालिकेकडे पाठपुरावा चालवला होता.
या वर्षांकाठी १ कोटी ७४ लाख रुपयांची वसुली भरण्यासाठी पाटबंधारे विभागाने पालिकेस नोटीस बजावली होती. त्यापैकी १ कोटी ९ लाख रुपये पालिकेने भरले होते. उर्वरित रकमेसाठी पाटबंधारे विभागाने पाठपुरावा सुरू ठेवला होता. या घडामोडी सुरू असतानाच शनिवारी सकाळी सांगली पाटबंधारे खात्याचे विभागीय अधिकारी ए.पी.सुर्वे, कुरुंदवाडचे शाखा अभियंता व्ही.डी.कोळी व त्यांच्या पथकाने उपसा केंद्रास सील ठोकले. पालिका प्रशासनाने याची नोंद घेऊन तातडीने २३ लाख रुपये पाटबंधारे खात्यामध्ये भरले. त्यानंतर सील खोलण्याचे व पाणी उपसा करण्याचे काम रात्री उशिरा सुरू होते.