Leading International Marathi News Daily
मंगळवार, २४ मार्च २००९

अखेर ‘नॅनो’ अवतरली
मुंबई, २३ मार्च / प्रतिनिधी

सर्वसामान्यांची मोटार म्हणून सर्व भारतीयांच्या मनात घर करून राहिलेली आणि रतन टाटा यांचे सर्वसामान्यांसाठी एक लाख रुपयांमध्ये मोटार देण्याचे वचन असलेल्या टाटा मोटर्सच्या ‘नॅनो’चे आज मुंबईत एका दिमाखदार समारंभात उद्घाटन झाले. आपले वचन आपण पाळले आहे, आणि त्याचा अतिशय आनंद होत आहे, असे नॅनोच्या पत्रकार परिषदेत ‘टाटा सन्स’ आणि ‘टाटा मोटर्स’चे अध्यक्ष रतन टाटा यांनी सांगितले. नॅनो खरेदीदारांसाठी देशभरात ९ ते २५ एप्रिल या दरम्यान नोंदणी (बुकींग) करता येणार असून स्टेट बँकऑफ इंडिया व टाटा मोटर्स यांच्यामध्ये झालेल्या करारानुसार बँकेच्या १३५० शाखांमध्ये नॅनोचे बुकींग करता येणार आहे. नॅनोची एकंदर तीन मॉडेल्स बाजारात आणली असून त्यातील बेस मॉडेल एक लाख रुपयांचे आहे.

मी पाकिस्तानीच!
मोहम्मद अजमल कसाबची कबुली
मुंबई, २३ मार्च / प्रतिनिधी
आतापर्यंत मला पाकिस्तानी वकिलच हवा असा घोषा लावणाऱ्या दहशतवादी मोहम्मद अजमल कसाबने आज अखेर विशेष न्यायालयाकडे त्याची बाजू लढविण्यास तयार असलेला किंवा सरकारने नेमलेला वकील चालेल, असे सांगून वकिलाबाबतची समस्या सोडवली. संपूर्ण सुनावणीदरम्यान न्या. तहलियानी यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देताना कसाबच्या चेहऱ्यावर पश्चातापाचा कोणतेही भाव नव्हता. उलट छदमीपणे हसून प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देणाऱ्या कसाबचा निर्दयीपणा न्यायालयात उपस्थित असलेल्यांनी या वेळी अनुभवला. दरम्यान, न्यायालयाने प्रकरणाची पुढील सुनावणी ३० मार्चपर्यंत स्थगित केली.

नरेंद्र मोदी, जेटली, शशांक मनोहर यांच्यावर
चिदंबरम यांचा हल्लाबोल
नवी दिल्ली, २३ मार्च/खास प्रतिनिधी
भारतात क्रिकेट हा कमालीचा लोकप्रिय खेळ असला तरी आयपीएलची ट्वेंटी-२० स्पर्धा म्हणजे केवळ क्रिकेट नव्हे. खेळ आणि व्यवसाय यांचे ते ‘धूर्त’ मिश्रण आहे. त्यात राजकारणाची भर पडण्याचे काही कारण नाही, असा आक्रमक पवित्रा घेत आज केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी ही स्पर्धा भारताबाहेर खेळवावी लागत असल्याबद्दल होणाऱ्या अनावश्यक टीकेला खरमरीत प्रत्युत्तर दिले. आयपीएलच्या सुधारित वेळापत्रकावर अंतिम निर्णय होण्यापूर्वीच ही स्पर्धा भारताबाहेर घेऊन जाण्याचा निर्णय घेताना बीसीसीआयने घाई तर केलीच, शिवाय सुरक्षेच्या मुद्यावर दुटप्पीपणा दाखविल्याचा आरोप चिदंबरम यांनी केला.

२६-२२ वर तिढा सुटला!
दोन महिने आणि डझनभर चर्चेच्या फेऱ्यानंतर राष्ट्रवादीच्या वाटय़ाला केवळ अमरावतीची अतिरिक्त जागा
नवी दिल्ली, २३ मार्च/खास प्रतिनिधी

राज्यातील लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसदरम्यानचा जागावाटपाचा अखेर आज सुटला. तब्बल दोन महिने जोरदार घासाघीस केल्यानंतर आज काँग्रेसकडून राष्ट्रवादी काँग्रेसला अनुसूचित जातींसाठी राखीव अमरावती ही एकमेव जास्तीची जागा पदरी पाडून घेणे शक्य झाले. राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेस २६, तर राष्ट्रवादी काँग्रेस २२ जागांवर लढणार आहे. उभय पक्षांनी समविचारी मित्रपक्षांसाठी आपल्या कोटय़ातून जागा सोडण्याचे ठरविले आहे. २००४ साली काँग्रेसने २७, तर राष्ट्रवादीने २१ जागा लढविल्या होत्या.

आयकॉन्सची कौंटीजसाठी ‘पसंद अपनी अपनी’
इंग्लंड कॉलिंग

विनायक दळवी
मुंबई, २३ मार्च

भारताच्या किनाऱ्यावरून निघालेले आयपीएल क्रिकेटचे तारू इंग्लंडच्या किनाऱ्यावर स्थिरावण्याची शक्यताोहे. त्या दृष्टीने हालचालींना रातोरात वेग आला असून आयपीएल संघाच्या आयकॉन्सनी आपल्या पसंतीच्या कौंटीज्ची फर्माईश पेश केली आहे. सचिन तेंडुलकरने मुंबई इंडियन्सना आपला डेरा इंग्लंडच्या दक्षिणेकडील भागात टाकावा असे सुचविले आहे. मुंबईच्या खेळाडूंना इंग्लंडच्या उत्तर भागातील थंड हवामानापेक्षा दक्षिणेकडील उष्ण हवामान लाभदायक ठरू शकेल, असे सचिन तेंडुलकरला वाटते. युवराजसिंग या पंजाब संघाच्या आयकॉनला आपल्या संघाचे बस्तान लिस्टरशायरमध्ये बसवावे असे वाटते.

गांधी X गांधी
रायबरेली, २३ मार्च/पी.टी.आय.

पिलभीतमध्ये आपले चुलत बंधू वरुण गांधी यांनी केलेल्या मुस्लिमविरोधी भाषणाबद्दल त्यांच्यावर टीका करताना प्रियांका गांधी यांनी वरुणचे हे उद्गार गांधी घराण्याच्या तत्वांच्या विरोधात असून त्याने आधी श्रीकृष्णाने सांगितलेली भगवत्गीता व्यवस्थित वाचावी आणि मगच बोलावे असे म्हटले आहे. टीव्ही वाहिन्यांवरून वरुणला हे सर्व बोलताना पाहून खूप दु:ख झाले असेही प्रियांका म्हणाल्या. सध्या प्रियांका आपली माता सोनिया गांधी निवडणूक लढवत असलेल्या रायबरेली मतदारसंघात प्रचारासाठी दाखल झाल्या असून त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केले. वरुणने आधी गीता वाचावी आणि मगच गीतेत जे सांगितले आहे त्यावर भाष्य करावे. गांधी घराण्यातील सर्व माणसे ज्या आदर्शांसाठी जगली व ज्यासाठी त्यांनी आपले प्राण अर्पण केले त्या आदर्शांनाच वरुणचे उद्गार छेद देणारे आहेत, असेही प्रियांका यांनी स्पष्टपणे नमूद केले. बिहारमध्ये लालूप्रसाद यादव आणि रामविलास पासवान यांच्यामध्ये झालेल्या समझोत्याबद्दल सर्व काही निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होईल, असेही त्यांनी सांगितले. आपण काँग्रेसच्या अन्य उमेदवारांचा प्रचार करणार नाही, फक्त आई आणि भाऊ राहुल यांचाच प्रचार आपण करू, असेही त्या म्हणाल्या.

वरुण गांधींच्या उमेदवारीवर भाजप ठाम
नवी दिल्ली, २३ मार्च/खास प्रतिनिधी

पिलीभीतमधून वरुण गांधी हेच पक्षाचे उमेदवार असतील आणि त्यांच्यासाठी आम्ही सारे प्रचारही करू, असे आज भाजपचे अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले. पिलीभीतमध्ये चिथावणीखोर भाषण दिल्याबद्दल निवडणूक आयोगाने वरुण गांधी यांना दोषी ठरविले असून भाजपने त्यांना उमेदवारी देऊ नये, अशी सूचनाही केली आहे. निवडणूक आयोगाच्या या ‘शिफारशी’मुळे भाजपमध्ये संतप्त पडसाद उमटले आहेत.
अशा सूचना करण्याचा निवडणूक आयोगाला अधिकारच नाही, असे भाजपने म्हटले आहे, तर वरुण गांधी निर्दोष आहेत, हे सिद्ध करण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. ‘उलटा चोर कोतवालको डाटे,’ अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ते अभिषेक सिंघवी यांनी केली. वरुण गांधी यांची उमेदवारी रद्द करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे आज भाजपचे प्रवक्ते बलबीर पूंज यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. राजकीय पक्षाने कोणाला उमेदवारी द्यावी वा देऊ नये, याविषयी हे सांगण्याचा आयोगाला अधिकारच नाही, असे भाजपचे सरचिटणीस अरुण जेटली यांनीही म्हटले आहे. पिलीभीत मतदारसंघात चिथावणीखोर भाषण दिल्याबद्दल ताशेरे ओढताना निवडणूक आयोगाने दाखविलेल्या अनावश्यक घाईबद्दल वरुण गांधी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. निवडणूक आयोगावर राजकीय दडपण आले असावे, असाही आरोप त्यांनी केला आहे. आपली बाजू मांडून निरपराधित्व सिद्ध करण्यासाठी आयोगाने पुरेशी संधी दिलेली नाही, असा आरोपही वरुण गांधी यांनी निवडणूक आयोगाच्या नोटीस दिलेल्या उत्तरात केला आहे. प्रक्षोभक भाषणाविषयीचे सत्य पडताळून न पाहताच आयोगाने आपल्याविषयी अंतिम निष्कर्ष काढल्याबद्दलही वरुण गांधी यांनी निराशा व्यक्त केली आहे.

 


प्रत्येक शुक्रवारी