Leading International Marathi News Daily
मंगळवार, २४ मार्च २००९

वसमत येथे आगीत तीन मुलींचा मृत्यू
सात मुलांसह बारा गंभीर भाजले
वसमत, २३ मार्च/वार्ताहर
शहरातील शुक्रवार पेठेत लग्नाच्या मांडवाला मध्यरात्री १ वाजता अचानक आग लागून तीन मुली मृत्युमुखी पडल्या. बारा जण गंभीर भाजले आहेत. जखमींमध्ये सात मुलांचा समावेश आहे. सर्व जखमींवर वसमत उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना नांदेड येथील सरकारी रुग्णालयात हलविण्यात आले. शुक्रवार पेठेत राहणाऱ्या सय्यद हसन सय्यद मीर यांच्या मुलीचे लग्न काल सायंकाळी ५ वाजता पार पडले. वऱ्हाड रवाना झाल्यावर नातेवाईकांनी लग्नघरी मुक्कामी राहिले. या मांडवाला मध्यरात्री अचानक आग लागली.

अखेर उस्मानाबाद ‘राष्ट्रवादी’कडेच जालना काँग्रेसच्या ताब्यात
औरंगाबाद, २३ मार्च/खास प्रतिनिधी

उस्मानाबाद मतदारसंघावरून अडलेले काँग्रेस आघाडीचे जागावाटपाचे घोडे आज मार्गी लागले. उस्मानाबाद मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडेच कायम राहिला. जालना मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसने दावा केला होता. ती जागा आपल्याकडेच कायम ठेवण्यात काँग्रेसने यश मिळविले. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसने उस्मानाबाद वगळता केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री सूर्यकांता पाटील (हिंगोली), रमेश आडसकर (बीड) आणि राज्यमंत्री सुरेश वरपूडकर (परभणी) या उमेदवारांची नावे घोषित केली आहेत.

परभणीत वरपूडकर ‘राष्ट्रवादी’चे उमेदवार
परभणी, २३ मार्च/वार्ताहर

लोकसभेच्या परभणी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसने आज सायंकाळी सुरेश वरपूडकर यांची उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे श्री. वरपूडकर पक्षांतर्गत विरोधकांना शह देण्यात यशस्वी झाल्याचे सिद्ध झाले. आता वरपूडकर व शिवसेनेचे गणेशराव दुधगावकर यांच्यात चुरशीचा लढत होण्याची शक्यता आहे. वरपूडकर यांना तिसऱ्यांदा पक्षाची उमेदवारी मिळाली आहे. यापूर्वीच्या दोन्ही निवडणुकांत त्यांचा शिवसेनेकडून पराभव झाला होता.

नांदेडमध्ये भाजपची पाटलांना डावलून पवार यांना उमेदवारी
नांदेड, २३ मार्च/वार्ताहर

लोकसभेच्या नांदेड मतदारसंघात विद्यमान खासदाराला उमेदवारी नाकारण्याची नामुष्की भारतीय जनता पक्षावर आली आहे. पक्षातर्फे संभाजी लक्ष्मणराव पवार यांना उमेदवारी देण्याचा ‘प्रयोग’ करण्यात आला आहे. या पाश्र्वभूमीवर काँग्रेसचा संभाव्य उमेदवार बदलला जाण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे!

पाच वर्षांत १० हजार विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय - देशमुख
लातूर, २३ मार्च/वार्ताहर

आंतरराष्ट्रीय दर्जाचे के. जी. टू पी. जी.पर्यंतचे सर्व प्रकारचे शिक्षण शहरात ‘गोल्डक्रेस्ट हाय’ या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. आगामी पाच वर्षांत १० हजार विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय संस्थेमार्फत केली जाणार असल्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी आज सांगितले.
अतिरिक्त औद्योगिक वसाहतीत ११० एकर परिसरात सुरू होत असलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शैक्षणिक संकुलाचे भूमिपूजन विलासराव व वैशाली देशमुख यांच्या हस्ते आज करण्यात आले.

आणि ग्रंथोपजीविये..
फक्त एक वर्षांपूर्वी तिथली जागा एकदम सपाट आणि मोकळी होती. वसतिगृहाच्या इमारतीतून ती जागा ठळकपणे दिसायची. नियोजित वाचनालयाची इमारत त्या जागी बांधून होणार होती. वाटलं की, आता पाच-सात वर्षे तरी घोर नाही. खडीचे-वाळूचे ढीग, यंत्रांचा खडखडाट, कामगारांची वर्दळ, त्यांच्या तात्पुरत्या झोपडय़ा, सिमेंटमुळे उडणारी आणि हवेत कायमच असणारी धूळ या सगळ्या गोष्टी आता परिसरात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना सोसायला लागतील.

मुख्यमंत्री नांदेडमध्ये कशासाठी आले?
नांदेड, २३ मार्च/वार्ताहर

काल सायंकाळनंतर अचानक नांदेडला आलेले व आज दुपारी येथून दिल्लीला रवाना झालेले मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी १८ तासांच्या वास्तव्यात नांदेडमधील नाजूक स्थिती आणि निवडणूकविषयक रणनीती यावर खलबते केली; पण पक्षाच्या उमेदवाराचे नाव गुलदस्त्यात ठेवल्यामुळे स्थानिक पदाधिकाऱ्यांसह काँग्रेस कार्यकर्तेही चकित झाले.

सांस्कृतिक सभागृहे आणि चकचकीत रस्ते
प्रमोद माने
औरंगाबाद, २३ मार्च

आधी आमदार आणि मग खासदार असलेल्या चंद्रकांत खैरे यांनी गेल्या पाच वर्षांत आलेला संपूर्ण निधी पाणीपुरवठा, आरोग्य, सांस्कृतिक सभागृह, रस्ते, पूल आणि संगणक यावरच खर्च केला. औरंगाबाद, वैजापूर, गंगापूर, पैठण आणि कन्नड या शिवसेनेच्या प्रभाव असलेल्या विधानसभा मतदारसंघांमध्ये त्यांनी आपल्या निधीचा विनियोग केला. विशेषत: त्यांनी लक्ष घातले ते औरंगाबादच्या विकासकामांमध्ये. शहरात पाणीटंचाई आहे.

‘राष्ट्रवादी’तर्फे पद्मसिंह?
उस्मानाबाद, २३ मार्च/वार्ताहर

लोकसभेच्या उस्मानाबाद मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांचे नाव जाहीर झाल्याची बातमी आली आणि उत्सुकता संपली. तथापि अधिकृत यादीत त्यांचे नाव नाही. उस्मानाबादची जागा काँग्रेसला की राष्ट्रवादी काँग्रेसला, असे प्रत्येक जण एकमेकांना विचारत होता. अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे पारडे जड झाले. डॉ. पाटील यांची उमेदवारी जाहीर झाल्याच्या बातमी नंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

पत्रकारभवनाच्या परिसरातील हिरवळ गेली कोणीकडे?
अधिकाऱ्यांकडून शोध सुरू
औरंगाबाद, २३ मार्च/प्रतिनिधी
औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातील माजी आमदार श्रीकांत जोशी यांच्या निधीतून आणि महापालिकेच्या सहकार्याने भाग्यनगरात उभारण्यात आलेल्या भव्य पत्रकारभवनाचे उद्घाटन भारतीय जनता पक्षाचे नेते गोपीनाथ मुंडे यांच्या हस्ते मागील महिन्यात झाले. उद्घाटनानंतर येथे अद्यापि एकही जाहीर कार्यक्रम झालेला नाही. तोच या भवनाच्या परिसरातील हिरवळ (लॉन) मात्र गायब झाल्याचे समोर आले आहे.

मकबरा परिसरातील महिला पाण्यासाठी पालिकेवर
पंधरा दिवसांपासून पाणीच नाही
औरंगाबाद, २३ मार्च/प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपासून अतिशय कमी दाबाने पाणी येत असताना नंतर पाणीच येणे बंद झाले. काही दिवस वाट पाहिल्यानंतर संतप्त झालेल्या बीबी का मकबरा परिसरातील महिलांनी आज सकाळी महानगरपालिका कार्यालयावर मोर्चा नेला. अधिकाऱ्यांना घेराव घालण्याबरोबरच घोषणांनी परिसर दणाणून सोडला. पाणी मिळाले नाही तर अधिकाऱ्यांना काळे फासण्यात येईल, असा इशाराही या महिलांनी दिला आहे.

‘दारू’मुळे राज्याचे सामाजिक आरोग्य धोक्यात
गाव ‘तंटामुक्त’व ‘दारूमुक्त’ करण्याची गरज
जळकोट, २२ मार्च/वार्ताहर
संतांची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व पुरोगामी विचारसरणीचा नेहमीच पुरस्कार करणाऱ्या महाराष्ट्राचे ‘दारू’मुळे सामाजिक आरोग्य धोक्यात आले आहे.
मद्य ‘सेवन’ व ‘विक्री’मुळे गावातील शांतता भंग होऊन ‘तंटय़ां’चा भारही वाढू लागला आहे. त्यामुळे महात्मा गांधी तंटामुक्त गाव समित्यांनी आपले गाव ‘तंटामुक्त’ करण्याबरोबरच ‘दारूमुक्त’ बनविण्याची गरज प्रकर्षांने भासू लागली आहे. अवैध धंदे करणाऱ्या लोकांना पर्यायी रोजगाराकडे वळविले तर दारूबंदी कामी मदतच होईल.

सेहेचाळीस हजारांची घरफोडी
औरंगाबाद, २३ मार्च/प्रतिनिधी

मुलाला शाळेत सोडण्यासाठी घराबाहेर पडताच चोरटय़ांनी घर फोडून रोख रकमेसह ४६ हजार रुपयांचे दागिने चोरून नेले. ही घटना काल दुपारी १२ ते एक या वेळेत पंचायत समितीच्या शासकीय निवासस्थानात घडली. मोहम्मद अफसर मोहम्मद उमर यांनी सिटीचौक पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या पत्नी दुपारी १२ वाजता मुलाला शाळेत सोडण्यासाठी गेल्या. एक वाजता त्या परतल्या तेव्हा कपाटातील सर्व सामान अस्ताव्यस्त पडलेले होते आणि ४४ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने तसेच दोन हजार रुपये रोख चोरटय़ांनी लंपास केले होते. चोरटय़ांनी घराच्या मागील दाराचे कुलूप तोडून आत प्रवेश केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

मंगळसूत्र पळविले
औरंगाबाद, २३ मार्च/प्रतिनिधी
शाळेतून घरी परतत असताना एका शिक्षिकेच्या गळ्यातील मंगळसूत्र दुचाकीस्वाराने पळविल्याची घटना वाळूज सिडको महानगरातील भरवस्तीत घडली. शिक्षिका केतकी केशव देशपांडे (वय ४२) शाळेतून घरी परतत होत्या. अयोध्यानगरातील पद्मालय कन्स्ट्रक्शन कार्यालयासमोर असताना एकाने दुचाकीवरून येऊन त्यांच्या गळ्यातील २१ हजार रुपयांचे मंगळसूत्र हिसकावले. त्यांनी आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला मात्र तो लगेच पसार झाला. त्याच्या दुचाकीवर क्रमांकही नव्हता, असे त्यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

किरकोळ कारणावरून तरुणाला बेदम मारहाण
औरंगाबाद, २३ मार्च/प्रतिनिधी

किरकोळ कारणावरून बाचाबाची झाल्याने दोघांनी एकाला शिवीगाळ करून बेदम मारहाण केली आणि नंतर त्याच्या डोक्यात दारूची बाटली फोडली. ही घटना रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास जयभीमनगरात देशीदारूच्या दुकानासमोर घडली. श्याम अशोक काळे (२०, रा. जयभीमनगर) असे या हल्ल्यात जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून बेगमपुरा पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. श्याम याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार रात्री ८ वाजण्याच्या सुमारास तो देशी दारूच्या दुकानासमोर उभा होता. तेव्हा तेथे राहुल आणि अमोल रतन घारे हे दोघे भाऊ आले. त्यांच्यात किरकोळ कारणावरून बाचाबाची झाली. यामुळे संतापलेल्या घारे भावंडांनी श्याम यास शिवीगाळ करून बेदम मारहाण केली आणि नंतर त्याच्या डोक्यात देशी दारूची रिकामी बाटली फोडली. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

युवकाच्या मृत्यूमुळे बिस्मिल्ला कॉलनीत तणाव
औरंगाबाद, २३ मार्च/प्रतिनिधी

बिस्मिल्ला कॉलनीत रविवारी दुपारी किरकोळ कारणावरून झालेल्या हाणामारीत जखमी झालेल्या चौघांपैकी एकाचा रात्री मृत्यू झाला. यामुळे या परिसरात तणाव निर्माण झाला होता. पोलीस बंदोबस्तात मृतावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिसांनी एकास अटक केली आहे. शेख नजीर शेख अन्वर असे मृत झालेल्याचे नाव आहे. त्याची आई जरीना बेगम आणि अन्य दोघेही जखमी झाले होते. काल दुपारी नजीर याचा याच परिसरातील अमजद शेख असद आणि शेख सलमान यांच्याशी दुचाकीचा कट मारण्यावरून वाद झाला होता. सलमान नंतर घरी गेला आणि मित्रांना घेऊन आला. त्यांच्या हातात लाठय़ा, काठय़ा, हॉकी स्टीक आणि गुप्तीही होती. त्यांनी नजीरच्या घरात घुसून घरातील सर्वानाच मारहाण केली. नजीरच्या पोटात गुप्तीने वार करण्यात आला होता. यात त्याची प्रकृती गंभीर होती. उपचारादरम्यान रात्री उशिरा त्याचा मृत्यू झाला. यामुळे बिस्मिल्ला कॉलनीत तणाव निर्माण झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी काहीजणांना ताब्यात घेतले असून सलमान यास अटक केली आहे. दुपारी चार वाजण्याच्या सुमारास पोलीस बंदोबस्तात नजीर याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. परिसरातील दुकाने दिवसभर बंद होती.

स्टोव्हचा भडका उडून भाजलेल्या महिलेचा मृत्यू
औरंगाबाद, २३ मार्च/प्रतिनिधी

स्वयंपाकासाठी स्टोव्ह पेटवीत असतानाच भडका झाल्याने भाजलेल्या महिलेचे सरकारी रुग्णालयात निधन झाले. शारदा हिम्मतराव सैबर (वय ३२, रा. सावखेडा, ता. सोयगाव) असे या महिलेचे नाव आहे. सकाळी ८ वाजता त्या स्टोव्ह पेटवीत असताना ही घटना घडली होती आणि त्या शंभर टक्के जळाल्या होत्या. त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असताना दुपारी साडेबारा वाजता त्यांचा मृत्यू झाला.अन्य एका घटनेत मुकुंदवाडी येथील अलका दिनेश गव्हाणे (वय ३०) या स्वयंपाक करत असताना स्टोव्हचा भडका झाल्याने भाजल्या. काल सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. त्या ५० टक्के भाजल्या असून त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पुनर्वसित बलसा येथे वृद्धाची आत्महत्या
परभणी, २३ मार्च/वार्ताहर

पुनर्वसित बलसा गावातील निवृत्ती सटवाजी रणेर (वय ९५) यांनी आज पहाटे आत्महत्या केली. विषारी औषध घेऊन त्यांनी आत्महत्या केल्याचे त्यांच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. बलसा या गावाचे पुनर्वसन नव्या ठिकाणी झाल्यानंतर या ठिकाणी गावकऱ्यांनी आपला संसार थाटला. जिल्हा प्रशासनाने प्रकल्पग्रस्तांना भूखंडाचे वाटप करून वीज व पाण्याची सोय उपलब्ध करून दिली. गावकऱ्यांना या ठिकाणी आता आपआपला निवारा उभारणे आवश्यक आहे.आज पहाटे रणेर यांनी आत्महत्या केल्याचे कळाल्यानंतर नायब तहसीलदार किरण अंबेकर, नवा मोंढा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी सूर्यकांत बामणे, नाना लाकाळ यांनी या गावाला भेट दिली. गावकऱ्यांच्या भावना तीव्र होत्या. नव्या पुनर्वसित ठिकाणी कोणत्याही सोयी नसल्याने रणेर यांनी आत्महत्या केली असे त्यांच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. त्यांच्यावर आधीच्या बलसा या गावीच अंत्यसंस्कार करण्याची भूमिका नातेवाईकांनी घेतल्यानंतर मोठा पेच उद्भवला. त्यामुळे पोलीस यंत्रणेवरही मोठा ताण आला. समजूत काढण्यासाठी गेलेल्या उपविभागीय अधिकारी महेंद्रकर यांनाही गावकऱ्यांच्या रोषाचे बळी व्हावे लागले. हरिओम मित्रमंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब जाधव यांनी गावकऱ्यांची समजूत घातली.

वऱ्हाडाचा टेम्पो उलटून २० जखमी
लोहा, २३ मार्च/वार्ताहर

नांदेड-लातूर रस्त्यावरील पथकर नाक्याजवळ आज सकाळी लग्नाच्या वऱ्हाडाचा टेम्पो उलटून २० जण जखमी झाले. जखमींवर नांदेड येथे उपचार करण्यात येत आहेत. मोहाखेड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तालुक्यातील आंबेसांगवी येथील देवराव कदम यांचे चिरंजीव गोविंद यांचा विवाह हरसद येथील भानुदास आलट यांची कन्या अनुराधाशी सकाळी १०.३० वाजता हरसद येथे होता. आंबेसांगवी येथील वऱ्हाड घेऊन टेम्पो (क्रमांक एमएच ०४ एजी ८७७७) सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास हरसदकडे निघाला. तो आंबेसांगवी पथकर नाक्याजवळ उलटला. या अपघातात गोविंद नागोराव कदम (वय ५२), संतोष कदम (५७), रेखा संजय कदम (२८), सुभाष शिंदे (३२), तुळशीदास उमरेकर (३०), सुनील कदम (५), प्रभाकर जाधव (२५), केशव कदम (४५), कोंडिबा डांगे (३०), राधा डांगे (५०), केशव सावंत (५०), निलावती कवठेकर (६०) यांच्यासह अन्य सात जण जखमी झाले. अपघातानंतर टेम्पोचालक पळून गेल्याचे पोलिसांनी सांगितले.

वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा आरोग्य सेवेवर परिणाम
सोयगाव, २३ मार्च/वार्ताहर

तालुक्यातील जरंडी ग्रामीण केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्यामुळे व त्यांच्या जागेवर अजूनही कुणीही न आल्याने आरोग्य सेवा ‘राम भरोसे’ झाली आहे. तालुक्यातील आरोग्य सेवेला अनेक दिवसांपासून ग्रहण लागल्याने नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न गंभीर होत आहे. जरंडी प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ. गायके व डॉ. चव्हाण हे दोन वैद्यकीय अधिकारी कार्यरत होते. या दोघांच्या बदल्या झाल्यामुळे त्यांच्या रिक्त जागेवर एक महिला व पुरुष डॉक्टरची नियुक्ती करण्यात आली. मात्र एकाचे प्रशिक्षण चालू आहे.दुसऱ्या महिला डॉक्टर अजूनही रुजू झाल्या नाहीत. त्यामुळे विना वैद्यकीय अधिकाऱ्यांअभावी आरोग्य सेवेचा प्रश्न गंभीर झाला आहे. कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया, कुपोषित मुलांची तपासणी, गर्भवती महिलांची तपासणी आदी कार्यक्रम विस्कळित झाले आहेत.विशेष म्हणजे या आरोग्य केंद्रातंर्गत १६ खेडी आहेत. गावातील नागरिकांना आरोग्य तपासणीसाठी जरंडी येथे यावे लागते.त्यामुळे जरंडी येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

अजिंठय़ाच्या जंगलात शेतक ऱ्याने अनुभवला बिबटय़ाचा थरार
सोयगाव, २३ मार्च/वार्ताहर

अजिंठय़ाच्या घनदाट जंगलातील देवधार भागात एका शेतकऱ्याने घराजवळ बिबटय़ाचा थरार अनुभवला. सोयगावपासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावर गलवाडा गावाजवळ अजिंठय़ाच्या डोंगरात असलेल्या जंगलाला सुरुवात होते. याच भागात देवधार नावाचा घनदाट जंगलाचा भाग आहे. या परिसरात काही शेतकरी शेतावरच राहतात. एका शेतकऱ्याने सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून बिबटय़ाचे दोन बछडय़ांसह अस्तित्व जाणवत होते. प्रत्यक्षात त्याने जो अनुभव घेतला तो विलक्षण होता. संध्याकाळचे पाच वाचले होते. एका बकरीवर हल्ला करून शेतकऱ्याच्या घरापासून २० ते २५ फुटावर आणून शांतपणे हा बिबटय़ा भक्ष्यावर ताव मारीत होता. धिप्पाड बिबटय़ाचे लक्ष शिकारीकडे होते. शिकार फस्त केल्यानंतर हा बिबटय़ा जवळच्या पाणवठय़ावर जाऊन शांतपणे पाणी पिऊन जंगलात हळूहळू पावले टाकत निघून गेला. इतक्या जवळून बिबटय़ाच्या सान्निध्यात अर्धा तास घालविलेल्या या शेतकऱ्याचा अनुभव चित्तथरारक होता.

बारागाव पाणीयोजनेची वीज बिल थकल्यामुळे तोडली
बीड, २३ मार्च/वार्ताहर

वीज वितरण कंपनीने केज-धारूर तालुक्यांतील बारागाव पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा बिल थकल्यामुळे तोडला. त्यामुळे बारा गावांतील गावकऱ्यांवर कालपासून पाण्यासाठी भटकंतीची वेळ आली आहे. जिल्ह्य़ातील ग्रामीण भागात पाणीपुरवठा करणाऱ्या योजनांकडे वीजबिलाची कोटय़वधी रुपयांची बाकी थकली आहे. वीज वितरण कंपनीने वेळोवेळी मागणी करूनही बाकी भरण्याकडे संबंधित यंत्रणा दुर्लक्ष करते. वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई केल्यानंतर राजकीय दडपणातून पुन्हा तडजोड केली जाते. लोकसभेच्या निवडणुकीची आचार-संहिता असल्यामुळे सर्वत्र प्रशासकीय अधिकार वापरले जात आहेत. थकीत बिलावरून वीजपुरवठा खंडित करण्याचा इशारा मागील आठवडय़ात दिला होता. मात्र ग्रामीण भागातील ग्रामपंचायतीकडून वसुलीच होत नसल्यामुळे बाकी भरण्याची कारवाई झाली नाही. परिणामी वितरण कंपनीच्या पथकाने रविवारी बारा गाव पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा खंडित केल्यामुळे भर उन्हाळ्यात या भागातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे.

आचारसंहिता भंग; तीन कर्मचारी निलंबित
गेवराई, २३ मार्च/वार्ताहर

एका राजकीय पक्षाच्या प्रचार-सभेसाठी विनापरवानगी डायस वापर-ण्यास देणे नगरपालिकेतील तीन कर्म-चाऱ्यांच्या चांगलेच अंगलट आले. आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल या तिन्ही कर्मचाऱ्यांना सेवेतून तडका-फडकी निलंबित करण्यात आले. तालुक्यातील जातेगाव येथील बाजार तळावर अखिल भारतीय छावा मराठा संघटनेची गेल्या सोमवारी (दि. १६) क्रांतीसेनेचे बीड लोकसभा मतदारसंघातील उमेदवार प्रमोद मोटे यांच्या प्रचारार्थ सभा झाली. या सभेच्या व्यासपीठावर गेवराई नगरपालिकेचे ‘डायस’ होते. पालिकेचे भांडारपाल रामनाथ तीर्थराज गंगाधर, आत्माराम सदाशिव मोटे व रखवालदार शेख अब्दुल शेख अहमद यांनी विनापरवानगी ते वापरण्यास दिल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे बीड जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या सूचनेवरून मुख्याधि-कारी उत्तमराव पाटील यांनी आचार-संहितेचा भंग केल्याबद्दल या तिघां-नाही काल सेवेतून निलंबित केले.