Leading International Marathi News Daily
मंगळवार, २४ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

अखेर ‘नॅनो’ अवतरली
मुंबई, २३ मार्च / प्रतिनिधी

 

सर्वसामान्यांची मोटार म्हणून सर्व भारतीयांच्या मनात घर करून राहिलेली आणि रतन टाटा यांचे सर्वसामान्यांसाठी एक लाख रुपयांमध्ये मोटार देण्याचे वचन असलेल्या टाटा मोटर्सच्या ‘नॅनो’चे आज मुंबईत एका दिमाखदार समारंभात उद्घाटन झाले. आपले वचन आपण पाळले आहे, आणि त्याचा अतिशय आनंद होत आहे, असे नॅनोच्या पत्रकार परिषदेत ‘टाटा सन्स’ आणि ‘टाटा मोटर्स’चे अध्यक्ष रतन टाटा यांनी सांगितले.
नॅनो खरेदीदारांसाठी देशभरात ९ ते २५ एप्रिल या दरम्यान नोंदणी (बुकींग) करता येणार असून स्टेट बँकऑफ इंडिया व टाटा मोटर्स यांच्यामध्ये झालेल्या करारानुसार बँकेच्या १३५० शाखांमध्ये नॅनोचे बुकींग करता येणार आहे. नॅनोची एकंदर तीन मॉडेल्स बाजारात आणली असून त्यातील बेस मॉडेल एक लाख रुपयांचे आहे. नॅनो, नॅनो सीएक्स व नॅनो एलएक्स अशी तीन मॉडेल्स असून नॅनो (बेस मॉडेल्स)च्या पहिल्या एक लाख मोटारींसाठी एक लाख रुपये ही एक्स शोरूम किंमत असणार आहे. टायटनच्या शोरूम्स, टाटा इंडिकॉम्सच्या दुकानांमधून व टाटा मोटर्सच्या निवडक शोरूममधूनही नोंदणी अर्ज विकले जातील. अर्जाची किंमत ३०० रुपये असून ग्राहक बुकींगची संपूर्ण रक्कम स्वत: वा अर्थसहाय्याद्वारेही ते रक्कम भरू शकतात. २९९९ रुपये इतकी बुकींगची रक्कम आहे. त्याचप्रमाणे टाटा मोटर्सशी करार झालेल्या १५ निवडक बँका व बिगर बँकींग वित्तीय संस्थांकडून नॅनोसाठी कर्ज मिळू शकेल. जो ग्राहक यापैकी कोणा संस्थेचे अर्थसहाय्य घेणार असेल त्याच्याकडून स्टेट बॅक ऑफ इंडियाकडे थेट अर्ज नोंदणी केली जाणार आहे. बुकींगनंतर ६० दिवसांमध्ये टाटा मोटर्स पहिल्या एक लाख मोटारींचे वितरण करण्यासाठी प्रक्रिया सुरू केली जाईल. पहिल्या एक लाख मोटारींसाठी नॅनोच्या उद्घाटनाच्यावेळी असलेली किमत लागू राहणार आहे. जुलै २००९ पासून नॅनो ग्राहकाच्या हाती प्रत्यक्ष मिळणे सुरू होईल. पहिल्या एक लाख ग्राहकांसाठी नोंदणीसाठी भरलेल्या रक्कमेवर कोणतेही व्याज देण्यात येणार नाही.