Leading International Marathi News Daily
मंगळवार, २४ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

मी पाकिस्तानीच!
मोहम्मद अजमल कसाबची कबुली
मुंबई, २३ मार्च / प्रतिनिधी

 

आतापर्यंत मला पाकिस्तानी वकिलच हवा असा घोषा लावणाऱ्या दहशतवादी मोहम्मद अजमल कसाबने आज अखेर विशेष न्यायालयाकडे त्याची बाजू लढविण्यास तयार असलेला किंवा सरकारने नेमलेला वकील चालेल, असे सांगून वकिलाबाबतची समस्या सोडवली. संपूर्ण सुनावणीदरम्यान न्या. तहलियानी यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देताना कसाबच्या चेहऱ्यावर पश्चातापाचा कोणतेही भाव नव्हता. उलट छदमीपणे हसून प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देणाऱ्या कसाबचा निर्दयीपणा न्यायालयात उपस्थित असलेल्यांनी या वेळी अनुभवला. दरम्यान, न्यायालयाने प्रकरणाची पुढील सुनावणी ३० मार्चपर्यंत स्थगित केली. मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने आरोपपत्र दाखल केल्यानंतर कसाबविरुद्धचा खटला विशेष न्यायाधीश एम. एल. तहलियानी यांच्याकडे वर्ग करण्यात आला होता. त्यानंतर आज पहिल्यांदाच कसाबसह प्रकरणातील अन्य दोन आरोपी फईम अन्सारी आणि सबाउद्दीन शेख यांना न्या. तहलियानी यांच्यासमोर हजर करण्यात आले. सुरक्षेच्या विशेषत: कसाबच्या सुरक्षेच्या कारणास्तव तिघाही आरोपींना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्या. तहलियानी यांच्यासमोर हजर करण्यात आले. सुरूवातीला फईम आणि सबाउद्दीन यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर आर्थर रोड तुरूंग अधीक्षिका स्वाती साठे यांनी कसाबला न्यायालयासमोर हजर केले. त्यानंतर न्या. तहलियानी यांनी त्याला प्रश्न विचारण्यास सुरूवात केली. त्या वेळी व्हिडीओ कॉन्फन्सिंगद्वारे माईकवरून उत्तरे देण्यास कसाब उत्सुक असल्याचे दिसले. गडद हिरव्या रंगाचा टी-शर्ट परिधान केलेल्या आणि बारीकशी दाढी वाढलेल्या कसाबला न्या. तहलियानी यांनी नंतर तू कुठला राहणारा आहेस, तुला आरोपपत्राची प्रत मिळाली की नाही या प्रश्नांसोबतच तुझा वकील आहे का आणि तुला वकिलाची गरज आहे का, असे प्रश्न विचारले. त्यावर हिंदी आणि इंग्रजीतून उत्तर देताना कसाबने आपण पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील फरीदकोट गावचे असल्याचे सांगून आपला कोणीही वकील नसून वकिलाची गरज असल्याची इच्छा न्यायालयाकडे व्यक्त केली. तसेच आपल्यासाठी पहिल्यांदा जो वकील हजर झाला तो किंवा सरकारी खर्चाने देण्यात येणाऱ्या वकिलाला आपली काहीच हरकत नसल्याचे न्यायालयाला सांगितले. न्या. तहलियानी आणि कसाब यांच्यात १० मिनिटे चाललेल्या संभाषणात न्यायाधीशांनी त्याला जेव्हा ‘मी कोण आहे’, असे विचारले. त्या वेळी कसाबने ‘आय डोन्ट’ असे इंग्रजीमध्ये उत्तर दिले व न्यायाधीशांनी त्याला आपण न्यायाधीश असल्याचे सांगितल्यावर लगेचच त्याने त्यांना ‘नमस्ते’ म्हटले. एवढेच नाहीतर न्यायालयाने त्याला जेव्हा जाण्यास सांगितले त्यावर हसून कसाबने त्यांना ‘थँक्यू सर’ म्हणाला आणि निघून गेला.