Leading International Marathi News Daily
मंगळवार, २४ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

नरेंद्र मोदी, जेटली, शशांक मनोहर यांच्यावर
चिदंबरम यांचा हल्लाबोल
नवी दिल्ली, २३ मार्च/खास प्रतिनिधी

 

भारतात क्रिकेट हा कमालीचा लोकप्रिय खेळ असला तरी आयपीएलची ट्वेंटी-२० स्पर्धा म्हणजे केवळ क्रिकेट नव्हे. खेळ आणि व्यवसाय यांचे ते ‘धूर्त’ मिश्रण आहे. त्यात राजकारणाची भर पडण्याचे काही कारण नाही, असा आक्रमक पवित्रा घेत आज केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी ही स्पर्धा भारताबाहेर खेळवावी लागत असल्याबद्दल होणाऱ्या अनावश्यक टीकेला खरमरीत प्रत्युत्तर दिले.
आयपीएलच्या सुधारित वेळापत्रकावर अंतिम निर्णय होण्यापूर्वीच ही स्पर्धा भारताबाहेर घेऊन जाण्याचा निर्णय घेताना बीसीसीआयने घाई तर केलीच, शिवाय सुरक्षेच्या मुद्यावर दुटप्पीपणा दाखविल्याचा आरोप चिदंबरम यांनी केला. आयपीएलच्या मुद्यावरून राजकारण करणारे भाजपचे नेते नरेंद्र मोदी आणि अरुण जेटली यांचाही त्यांनी खरपूस समाचार घेतला.
आयपीएलच्या वतीने १७ मार्च रोजी गृहमंत्रालयाला सुधारित वेळापत्रक सादर करण्यात आले होते. सर्व संबंधित राज्यांची मते व अभिप्राय जाणून घेण्यासाठी हे वेळापत्रक त्याच दिवशी पाठविण्यात आले होते. पण आजपर्यंत केवळ आंध्र प्रदेश, कर्नाटक, पंजाब आणि चंदिगढनीच प्रतिसाद दिला आणि अन्य राज्यांनी कोणतेही मतप्रदर्शन केलेले नाही, असे चिदंबरम म्हणाले. हा आयोजकांचा निर्णय असून त्यावर आपल्याला काहीही बोलायचे नाही. पण, आयपीएल स्पर्धा भारताबाहेर हलविण्यासाठी अप्रत्यक्षपणे केंद्र सरकारची प्रवृत्ती कारणीभूत ठरल्याचा ठपका ठेवणारे बीसीसीआयचे अध्यक्ष शशांक मनोहर यांच्या विधानाचे त्यांनी खंडन केले. आपण आयपीएलच्या निर्णयाविषयी अनेक विधाने वाचली. अशा अनावश्यक टिप्पणी खोडून काढणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले. जर मनोहर यांना महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश सरकारांना दोष द्यायचा असेल तर कायदा आणि सुव्यवस्था तसेच सुरक्षा प्रदान करण्याची जबाबदारी राज्यांची असते आणि राज्य सरकारांच्या भूमिकेचा आदर करायचा असतो, असे ते म्हणाले. १६ एप्रिल ते १३ मे दरम्यान पाच टप्प्यांमध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांमध्ये २१ लाख सुरक्षा कर्मचारी गुंतले असताना आपण आयपीएल स्पर्धेसाठी सुरक्षा पुरवू शकत नाही, असे चिदंबरम यांनी सुरुवातीलाच स्पष्ट केले होते. आयपीएल स्पर्धा भारताबाहेर हलविण्याच्या निर्णयाचे ‘राष्ट्रीय शरम’ असे वर्णन करणारे गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना चिदंबरम यांनी शाब्दिक तडाखे लगावले. राष्ट्रीय शरम काय असते? गुजरातमध्ये २००२ साली झालेल्या जातीय दंगली राष्ट्रीय शरम असल्याचे अनेकांना वाटते. सर्वोच्च न्यायालयाला या दंगलींची चौकशी करणाऱ्या गुजरात पोलिसांचा निष्कर्ष फेटाळून १४ प्रकरणांसाठी विशेष चौकशी पथक स्थापन करावे लागले. ही गुजरातसाठी राष्ट्रीय शरम नव्हे काय, असा सवाल चिदंबरम यांनी केला. भारतात आयपीएल स्पर्धा होऊ शकत नाही, असा जगभर नकारात्मक संदेश गेल्याची टीका करणाऱ्या अरुण जेटली यांचाही त्यांनी समाचार घेतला. जेटली यांना अतिशयोक्ती करण्याची सवयच आहे आणि त्यात ते दिल्ली क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष असल्यामुळे यावेळी त्यांच्या अतिशयोक्तीला पारावरच उरला नाही, असा टोला चिदंबरम यांनी लगावला.