Leading International Marathi News Daily
मंगळवार, २४ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

२६-२२ वर तिढा सुटला!
दोन महिने आणि डझनभर चर्चेच्या फेऱ्यानंतर राष्ट्रवादीच्या वाटय़ाला केवळ अमरावतीची अतिरिक्त जागा
नवी दिल्ली, २३ मार्च/खास प्रतिनिधी

 

राज्यातील लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसदरम्यानचा जागावाटपाचा अखेर आज सुटला. तब्बल दोन महिने जोरदार घासाघीस केल्यानंतर आज काँग्रेसकडून राष्ट्रवादी काँग्रेसला अनुसूचित जातींसाठी राखीव अमरावती ही एकमेव जास्तीची जागा पदरी पाडून घेणे शक्य झाले. राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेस २६, तर राष्ट्रवादी काँग्रेस २२ जागांवर लढणार आहे. उभय पक्षांनी समविचारी मित्रपक्षांसाठी आपल्या कोटय़ातून जागा सोडण्याचे ठरविले आहे. २००४ साली काँग्रेसने २७, तर राष्ट्रवादीने २१ जागा लढविल्या होत्या.
आज दुपारी संरक्षण मंत्री आणि प्रदेश काँग्रेसचे प्रभारी ए. के. अँटनी यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागावाटपाची घोषणा करण्यात आली. राज्यात आपली ताकद वाढल्यामुळे २४-२४ अशी बरोबरीची वाटणी व्हावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली होती. पण दोन महिने चाललेल्या किमान डझनभर फेऱ्यांच्या चर्चेअंती राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ एकाच अतिरिक्त जागेवर समाधान मानावे लागले.
गेल्यावेळी विदर्भात राष्ट्रवादीच्या कोटय़ात चिमूर-गडचिरोली मतदारसंघ होता. त्याऐवजी काँग्रेसने यंदा राष्ट्रवादीला बुलढाण्याची जागा दिली आहे. अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेला अमरावती मतदारसंघ ही एकमेव अतिरिक्त जागा राष्ट्रवादीला मिळाली आहे. या जागेवर राष्ट्रवादीच्या कोटय़ातून केरळचे राज्यपाल आणि रिपाइं नेते रा. सू. गवई यांचे पुत्र अ‍ॅड्. राजेंद्र गवई लढण्याची शक्यता आहे. दुसरीकडे शिर्डी मतदारसंघ राष्ट्रवादीसाठी न सोडता रिपाइंचे विद्यमान खासदार रामदास आठवले यांना या मतदारसंघातून तिकीट देण्यावर काँग्रेस विचार करीत आहे. राज्यातील अनुसूचित जातींच्या ५ आणि अनुसूचित जमातींच्या ४ राखीव जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेस प्रत्येकी एक जागा लढविणार आहे. काँग्रेस अनुसूचित जातींच्या ४, तर अनुसूचित जमातींच्या ३ जागांवर लढणार आहे.