Leading International Marathi News Daily
मंगळवार, २४ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

आयकॉन्सची कौंटीजसाठी ‘पसंद अपनी अपनी’
इंग्लंड कॉलिंग
विनायक दळवी
मुंबई, २३ मार्च

 

भारताच्या किनाऱ्यावरून निघालेले आयपीएल क्रिकेटचे तारू इंग्लंडच्या किनाऱ्यावर स्थिरावण्याची शक्यताोहे. त्या दृष्टीने हालचालींना रातोरात वेग आला असून आयपीएल संघाच्या आयकॉन्सनी आपल्या पसंतीच्या कौंटीज्ची फर्माईश पेश केली आहे. सचिन तेंडुलकरने मुंबई इंडियन्सना आपला डेरा इंग्लंडच्या दक्षिणेकडील भागात टाकावा असे सुचविले आहे. मुंबईच्या खेळाडूंना इंग्लंडच्या उत्तर भागातील थंड हवामानापेक्षा दक्षिणेकडील उष्ण हवामान लाभदायक ठरू शकेल, असे सचिन तेंडुलकरला वाटते. युवराजसिंग या पंजाब संघाच्या आयकॉनला आपल्या संघाचे बस्तान लिस्टरशायरमध्ये बसवावे असे वाटते. प्रीती झिंटा या पंजाब संघाच्या मालकिणीचेही तेच मत आहे. याचे कारण लिस्टरमधील पंजाबी भाषिकांची प्रचंड संख्या हे आहे. चेन्नई सुपरकिंग्जच्या धोनीचे मत मात्र वेगळे आहे. फलंदाजीसाठी पोषक असलेल्या ट्रेंट ब्रीजमध्ये चेन्नई संघाने वास्तव्य करावे, असे त्याने सुचविले आहे. कोलकाता नाईट रायडर्सचा मालक शाहरूख खान ‘मोहब्बते’च्या शूटिंगदरम्यान स्कॉटलंडच्या एवढय़ा प्रेमात पडला की, त्याला आपल्या संघाचे वास्तव्याचे स्थान तेथेच असावे असे वाटते. इशांत शर्मा आदी वेगवान गोलंदाजांना तेथे अधिक मदत होईल, असा शाहरूख खानचा कयास आहे. विविध फ्रॅन्चायझींनी इंग्लंडमध्ये स्पर्धा होणार हे जवळजवळ निश्चित झाल्यामुळे मोर्चेबांधणीसाठी सुरुवात केली आहे. ३० जणांचा संपूर्ण चमू घेऊन भारतात फिरणाऱ्या सर्व संघांनी आपल्या खेळाडूंची संख्या १४ वर आणण्याचा निर्णय घेतला आहे. सपोर्ट स्टाफच्या संख्येलाही कात्री लावण्यात आली आहे. रिबॉक, नायके आदी आयपीएल स्पर्धेच्या संघाचे गणवेश करणाऱ्या कंपन्यांच्या समस्या मात्र वेगळ्या आहेत. भारतातील उष्ण हवामान लक्षात घेऊन या संघांनी जाळीदार व घाम शोषून घेणारे गणवेश तयार केले होते. इंग्लंडमध्ये थंड हवेत खेळावे लागणार असल्याने ते गणवेश वाया गेले आहेत. या कंपन्यांना आत्ता घाईगडबडीत इंग्लंडमधील थंड हवामानाला अनुकूल ठरणारा गणवेश तयार करावा लागणार आहे.
निवडणुकीच्या हंगामाचा फटका बसलेल्या आयपीएलला इंग्लंडच्या थंडीत हुडहुडी भरण्याची ही चिन्हे आहेत.