Leading International Marathi News Daily
मंगळवार, २४ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

वसमत येथे आगीत तीन मुलींचा मृत्यू
सात मुलांसह बारा गंभीर भाजले
वसमत, २३ मार्च/वार्ताहर

 

शहरातील शुक्रवार पेठेत लग्नाच्या मांडवाला मध्यरात्री १ वाजता अचानक आग लागून तीन मुली मृत्युमुखी पडल्या. बारा जण गंभीर भाजले आहेत. जखमींमध्ये सात मुलांचा समावेश आहे. सर्व जखमींवर वसमत उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना नांदेड येथील सरकारी रुग्णालयात हलविण्यात आले. शुक्रवार पेठेत राहणाऱ्या सय्यद हसन सय्यद मीर यांच्या मुलीचे लग्न काल सायंकाळी ५ वाजता पार पडले. वऱ्हाड रवाना झाल्यावर नातेवाईकांनी लग्नघरी मुक्कामी राहिले. या मांडवाला मध्यरात्री अचानक आग लागली. त्यात मदिना सय्यद हसन (वय १३) होरपळून जागीच मृत्युमुखी पडली. नांदेडच्या रुग्णालयात उपचार चालू असताना रुखिया बेगम स. अन्वर (वय १४) व आसिया बेगम स. अन्वर (७) यांचे आज निधन झाले. या दोघी बहिणी आहेत.
अंजुम सय्यद करीम (वय ७), अजमेरी बेगम स. करीम (२५), स. कौसर स. अन्वर (८), सानिया कौस अ. गफुर (११), मालनबी स. समद (७०) हे सारे ७० ते ९० टक्के भाजले. रहीन बेगम स. अन्वर (३०), महेबुबा बेगम शे. युनूस (३८), स. इब्राम स. करीम (वय ५), स. मुख्तार (वय ९), स. वसिम स. करीम (वय ५), स. सत्तार स. अन्वर (वय ४) ४० ते ५० टक्के भाजले. सर्वावर नांदेड येथील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मीर यांच्या घराच्या परिसरातील पराटय़ांना आग लागल्यामुळे आगीने रौद्र रूप धारण केले. घराला एकच दरवाजा असल्याने घरात झोपलेल्यांना बाहेर पडण्यास रस्ता नव्हता. आगीच्या झळेने घरातील जवळपास १४-१५ महिला आणि लहान मुले भाजली.
आग लागताच परिसरातील नागरिकांनी विझविण्याचा प्रयत्न केला. पण आगीचे स्वरूप पाहता अग्निशामक दलाला बोलाविण्यात आले. माहिती मिळताच पोलिसांनीही घटनास्थळाकडे धाव घेतली. घराच्या मागील बाजूला छिद्र पाडून आतील महिला व लहान मुलांना बाहेर काढण्यात आले. घरासमोरील दोन दुचाकी जळून खाक झाल्या. या आगीत अंदाजे दोन लाखांचे नुकसान झाल्याचे पोलिसांनी सांगितले.