Leading International Marathi News Daily
मंगळवार, २४ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

अखेर उस्मानाबाद ‘राष्ट्रवादी’कडेच जालना काँग्रेसच्या ताब्यात
औरंगाबाद, २३ मार्च/खास प्रतिनिधी

 

उस्मानाबाद मतदारसंघावरून अडलेले काँग्रेस आघाडीचे जागावाटपाचे घोडे आज मार्गी लागले. उस्मानाबाद मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडेच कायम राहिला. जालना मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसने दावा केला होता. ती जागा आपल्याकडेच कायम ठेवण्यात काँग्रेसने यश मिळविले. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसने उस्मानाबाद वगळता केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री सूर्यकांता पाटील (हिंगोली), रमेश आडसकर (बीड) आणि राज्यमंत्री सुरेश वरपूडकर (परभणी) या उमेदवारांची नावे घोषित केली आहेत.
माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यासाठी काँग्रेसने उस्मानाबाद मतदारसंघाची मागणी केली होती. हा मतदारसंघ सोडण्यास राष्ट्रवादी काँग्रेसने नकार दिला. गेल्या आठवडाभरापासून याच जागेवरून उभय पक्षात तिढा होता.
जालना मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसने दावा केला होता. तो काँग्रेसने फेटाळला. माजी खासदार अंकुशराव टोपे किंवा उच्च व तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने ही जागा मागितली होती. ही जागा गेल्या वेळी काँग्रेसनेच लढविली होती. गेल्या तीन लोकसभा निवडणुकीपासून काँग्रेस भारतीय जनता पक्षाचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्याकडून पराभूत होत आहे.
निवडणूक लढविणार नाही -विलासराव
विलासराव देशमुख यांच्या उमेदवारीसाठी उस्मानाबादच्या जागेवर काँग्रेसने दावा केला होता. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने हक्क सांगितल्यामुळे त्यांनी लोकसभा निवडणूक लढविणार नसल्याचे स्पष्ट केले. ‘‘माझ्याकडे राज्यातील काँग्रेसच्या प्रचाराची जबाबदारी आहे; त्यामुळे मी निवडणूक लढविणार नाही’’, असे त्यांनी स्पष्ट केले.