Leading International Marathi News Daily
मंगळवार, २४ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

परभणीत वरपूडकर ‘राष्ट्रवादी’चे उमेदवार
परभणी, २३ मार्च/वार्ताहर

 

लोकसभेच्या परभणी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसने आज सायंकाळी सुरेश वरपूडकर यांची उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे श्री. वरपूडकर पक्षांतर्गत विरोधकांना शह देण्यात यशस्वी झाल्याचे सिद्ध झाले. आता वरपूडकर व शिवसेनेचे गणेशराव दुधगावकर यांच्यात चुरशीचा लढत होण्याची शक्यता आहे. वरपूडकर यांना तिसऱ्यांदा पक्षाची उमेदवारी मिळाली आहे. यापूर्वीच्या दोन्ही निवडणुकांत त्यांचा शिवसेनेकडून पराभव झाला होता.
आघाडीतील तिढा सुटत नसल्यामुळे कार्यकर्त्यांची उमेदवारीबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली होती. आज दुपारी आघाडीची सोयरीक जमली. त्यानंतर सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेसने १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यामध्ये श्री. वरपूडकर यांचा समावेश होता. तीन महिन्यांपूर्वीच त्यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला. लोकसभेच्या निवडणुकीसाठी त्यांना ताकद देण्याच्या हेतूनेच मंत्रिपद दिले होते. त्यांना उमेदवारी मिळू नये यासाठी आमदार फौजिया खान यांच्या माध्यमातून जिंतूरचे विजय भांबळे यांनी उमेदवारीसाठी जोरदार प्रयत्न केले. त्यांच्या बाजूने जलसंपदामंत्री अजित पवार ठाम उभे होते, असे समजते. परंतु विजय मिळवायचा असेल तर वरपूडकरांशिवाय कोणी चालणार नाही याची खात्री असल्यामुळे पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी त्यांच्या नावाला संमती दिली.
वरपूडकर यापूर्वी १९९८च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून विजयी झाले होते. त्यानंतर १९९९ व २००४च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. आता त्यांना तिसऱ्यांदा पक्षाने उमेदवारी दिली. त्यांची राजकीय कारकीर्द दुधगावकर यांचे बोट धरूनच सुरू झाली. दुधगावकर व वरपूडकर यांच्यात गुरू-शिष्याचे नाते होते. या निवडणुकीत गुरु-शिष्य आमने-सामने असतील.