Leading International Marathi News Daily
मंगळवार, २४ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

नांदेडमध्ये भाजपची पाटलांना डावलून पवार यांना उमेदवारी
नांदेड, २३ मार्च/वार्ताहर

 

लोकसभेच्या नांदेड मतदारसंघात विद्यमान खासदाराला उमेदवारी नाकारण्याची नामुष्की भारतीय जनता पक्षावर आली आहे. पक्षातर्फे संभाजी लक्ष्मणराव पवार यांना उमेदवारी देण्याचा ‘प्रयोग’ करण्यात आला आहे. या पाश्र्वभूमीवर काँग्रेसचा संभाव्य उमेदवार बदलला जाण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे!
भा. ज. प.मध्ये मागील आठ-दहा दिवसांपासून उमेदवार निवडीवरून घोळ चालला होता. खासदार पाटील यांच्यासह पाच जण इच्छुक होते. पण पक्षनेतृत्वाने गोपीनाथ मुंडे यांच्या विश्वासातील संभाजी पवार यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ घालून आर्थिक व सांपत्तीकदृष्टय़ा एक तगडा उमेदवार दिला आहे. श्री. पवार १९८५ ते १९९० या काळात मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे निकटवर्ती होते. काँग्रेसच्याच अन्य एका नेत्याशी त्यांचे व्यावसायिक संबंध असले तरी मागील काही वर्षांपासून ते कट्टर भा. ज. प.वाले म्हणूनच ओळखले जातात.
श्री. पवार यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आज सायंकाळी येथे आल्यानंतर भा. ज. प.च्या कार्यकर्त्यांमधील अस्वस्थता दूर झाली. श्री. पाटील यांना उमेदवारी नाकारण्याचे नेमके कारण स्पष्ट झाले नसले, तरी ते स्वत:ही फार इच्छुक नव्हते, असे सांगितले जात आहे.