Leading International Marathi News Daily
मंगळवार, २४ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

पाच वर्षांत १० हजार विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय - देशमुख
लातूर, २३ मार्च/वार्ताहर

 

आंतरराष्ट्रीय दर्जाचे के. जी. टू पी. जी.पर्यंतचे सर्व प्रकारचे शिक्षण शहरात ‘गोल्डक्रेस्ट हाय’ या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. आगामी पाच वर्षांत १० हजार विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय संस्थेमार्फत केली जाणार असल्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी आज सांगितले.
अतिरिक्त औद्योगिक वसाहतीत ११० एकर परिसरात सुरू होत असलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शैक्षणिक संकुलाचे भूमिपूजन विलासराव व वैशाली देशमुख यांच्या हस्ते आज करण्यात आले. या कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमास माजी खासदार डॉ. गोपाळराव पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष त्र्यंबकदास झंवर, नगराध्यक्ष व्यंकट बेद्रे, अमित देशमुख, आदिती देशमुख, रितेश देशमुख, हेमंत वैद्य, रोहित राऊत आदी उपस्थित होते.
श्री. देशमुख म्हणाले, ‘‘शहराची वाढती शिक्षणाची भूक भागविण्यासाठी आगळीवेगळी संकल्पना अमित आणि आदिती देशमुख यांनी प्रत्यक्षात उतरविण्याचे ठरविले आहे. बालवाडीपासून ते पदव्युत्तर शिक्षणापर्यंतच्या सर्व सोयी या संकुलात उपलब्ध राहतील. तांत्रिक, वैद्यकीय आदी बाबतीतील आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण या संकुलात मिळेल. लातूर पॅटर्नचा दर्जा डॉ. गोपाळराव पाटील यांनी काही बंधने पाळून वाढविला. तो आदर्श डोळ्यांसमोर ठेवून गुणवत्तेच्या बाबतीत कसलीही तडजोड न करता या संस्थेत काम होईल.’’
डॉ. गोपाळराव पाटील म्हणाले, ‘‘मी कोण आहे, याचा शोध घेण्याचे काम अनेक वर्षांपासून जगात सुरू आहे. कशासाठी शिकायचे, सर्वासोबत राहण्यासाठीचे शिक्षण, असे काही शिक्षणाचे आंतरराष्ट्रीय निकष आहेत. हे निकष डोळ्यांसमोर ठेवून संस्थेच्या कामाची सुरुवात होत आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचा विचार करून त्यानुसार आपल्या गावात कृती करण्यासाठीचे उचललेले हे पाऊल कौतुकास्पद आहे.’’
रितेश देशमुख म्हणाले की, आपल्या जीवनाचा पाया म्हणजे शिक्षण हे लहानपणापासून आपण ऐकत आलो. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्या वाक्याचा अर्थ कळू लागला आहे. ज्यांनी शिक्षण घेतले नाही त्यांना शिक्षणाचे खरे महत्त्व कळते. आजची पिढी ही उत्तम विचार करणारी आहे. पालकांनी मुलांना स्वप्ने पाहण्याची संधी द्यावी. त्यांना उंच उडू द्यावे व केवळ दिशा दाखविण्याचे काम करावे.
सर्वश्री. झंवर, व्यंकट बेद्रे, मोईज शेख यांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमित देशमुख यांनी केले. स्वागतगीत रोहित राऊत याने सादर केले. सूत्रसंचालन बाळकृष्ण धायगुडे यांनी केले. श्री. एस. डी. बोखारे यांनी आभार मानले.

नातवांसाठीची शाळा
विलासराव देशमुख म्हणाले, या नवीन शैक्षणिक संकुलात दर्जेदार शिक्षण दिले जाणार आहे. यात आपण किंवा आपल्याला मुलाला प्रवेश मिळाला तर चांगले झाले असते, असे आपल्याला वाटेल. मात्र ती संधी हुकल्यामुळे २०१० जूनपासून सुरू होणाऱ्या या संस्थेत आपल्या नातवाला प्रवेश देता येईल आणि भविष्यात त्याच्या सर्व शिक्षणाची सोय लातुरातच होईल!’’
मागच्या पिढीने आवरते घ्यावे
अमित व रितेश देशमुख या दोघांची भाषणे गाजली हे लक्षात घेऊन विलासराव देशमुख म्हणाले, पुढची पिढी काम योग्य बजावत असेल तेव्हा मागच्या पिढीने आवरते घ्यावे लागते, हे लक्षात घ्यावे लागेल. रितेशचांगला अभिनय करतो हे माहीत होते. त्याचे भाषण ऐकल्यानंतर राजकीय क्षेत्रातील उणीव तो भरून काढू शकेल, याचा अंदाज आल्याचे ते म्हणाले.
‘ऑटोग्राफ प्लीज!’
या कार्यक्रमात रितेश देशमुख यांनी रोहित राऊत याचा सत्कार केला. रितेशने आपल्या भाषणात सत्काराच्या वेळी रोहितने आपल्याला ऑटोग्राफ प्लीज असे म्हटले. मी त्याला सांगितले, आमचे अख्खे कुटुंब तुझा फॅन आहे तेव्हा मी तुला म्हणतो, ‘रोहित, ऑटोग्राफ प्लीज.’