Leading International Marathi News Daily
मंगळवार, २४ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

आणि ग्रंथोपजीविये..

 

फक्त एक वर्षांपूर्वी तिथली जागा एकदम सपाट आणि मोकळी होती. वसतिगृहाच्या इमारतीतून ती जागा ठळकपणे दिसायची. नियोजित वाचनालयाची इमारत त्या जागी बांधून होणार होती. वाटलं की, आता पाच-सात वर्षे तरी घोर नाही. खडीचे-वाळूचे ढीग, यंत्रांचा खडखडाट, कामगारांची वर्दळ, त्यांच्या तात्पुरत्या झोपडय़ा, सिमेंटमुळे उडणारी आणि हवेत कायमच असणारी धूळ या सगळ्या गोष्टी आता परिसरात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना सोसायला लागतील. विद्यापीठाच्या परिसराला लागूनच असलेल्या मोठय़ा तलावामुळे विद्यार्थ्यांना मोठा वळसा घालून गावात यावे लागे. त्यासाठी दूरचा प्रवास (अर्थातच पैसासुद्धा जास्त) करण्यात बराच वेळ मोडत असे. त्यामुळे विद्यार्थी अगदी तातडीचे काम असल्याशिवाय गावात यायचा कंटाळा करीत. वाचनालयाची जुनी इमारत होती. त्यामुळे अभ्यासाची गैरसोय होण्याचा धोका तरी नव्हता.
चीनमधल्या सुझाऊ शहराच्या सुचू विद्यापीठात जणू काही एक गावच वसवलं गेलं आहे. या १०० वर्षे जुन्या विद्यापीठाचं विस्तारीकरण अजूनही चालूच आहे. नवीन विषय, येणारे अधिकाधिक विद्यार्थी यामुळे अनेक नवी संकुलं बांधून पूर्ण झालीत. परवा या विद्यापीठाला भेट देण्याचा योग आला आणि आश्चर्याला पारावर उरला नाही. दोन्ही बाजूंना झाडं असलेले स्वच्छ आणि रुंद रस्ते, कचरा कुठेही न टाकण्याच्या शिस्तीची कडक अंमलबजावणी यामुळे परिसरात गेल्यावरच एकदम ताजंतवानं वाटतं. परिसराच्या मध्यभागी एक सुंदर कमळाच्या अर्धोन्मिलित कळीच्या आकाराची भव्य इमारत लक्ष वेधून घेत होती. उंची असेल अंदाजे १३० फूट! बाहेरील भाग संपूर्ण काचेचा बनवलेला. (बांधकामाच्या अत्याधुनिक फॅशननुसार) त्यामुळे सूर्याचे किरण परावर्तित करणारे काचेचे गुळगुळीत भाग उन्हात चमकत होते आणि इमारतीला एक झळाळी प्राप्त करून देत होते. थोडय़ा उंचावर असलेली ही इमारत विद्यापीठाच्या कुठल्याही कोपऱ्यातून सहज लक्ष वेधून घेते. ही वाचनालयाची नवी इमारत!
आत गेल्यावर वाचनालयात असते तशीच गाढ शांतता! खालच्या मजल्यावर प्रशासकीय दालने. मध्यभाग एखाद्या प्रांगणासारखा मोकळा आणि छत असे नसल्यामुळे शेवटच्या मजल्याच्या वर पाहिलं की, नजर अगदी टोकापर्यंत पोहोचणार. वर्तुळाकार रचनेच्या अनेक मजली गॅलऱ्यांभोवती वेगवेगळ्या विषयानुसार वाचनकक्ष आणि पुस्तकालये. त्या त्या विषयाची पुस्तके अगदी काटेकोरपणे लावलेली. बाहेर बसून वाचण्याची आणि अभ्यास करण्याची सोय. तिथेच बसून वाचत राहण्याचा मोह झाला. पण वेळेअभावी ते शक्य नव्हतं. ग्रंथपालांची वागणूकसुद्धा अतिशय सहकार्याची. आमचं तिथलं काम झाल्यावर सर्वात वरच्या मजल्यावर गेलो. संपूर्ण विद्यापीठाच्या परिसराचं विहंगम दृश्य दिसत होतं. सगळीकडून पारदर्शक काच असल्यामुळे कुठेही गेलं तरी चित्रासारखं देखणं दृश्यच दिसत होतं. एकदम विद्यार्थीदशेतले दिवस आठवले आणि वाचनप्रपंचाच्या अनेक आठवणी उफाळून आल्या. तिथल्या उपाहारगृहात गेल्यानंतर कॉफीचा वास दरवळला. छान वाटलं. कॉफी, कोक, सँडविच, बर्गर आणि काही चायनीज पदार्थ खाण्यासाठी उपलब्ध होते. आमच्या कॅन्टीनमध्ये ८० पैशाला प्लेट मिळणाऱ्या बटाटेवडय़ाची व ३० पैशांना एक कप चहाची अपरिहार्यपणे आठवण झाली. तिथेसुद्धा कॉलेजमध्ये असतात तशी काही पडीक मंडळी होतीच. इतक्या कमी वेळात अशी देखणी आणि दृष्ट लागण्याजोगी इमारत बांधून पूर्ण करणे म्हणजे आश्चर्यच आहे. तीच गोष्ट तलावाच्या खालून शहरापर्यंत जाणाऱ्या बोगद्याची! चक्क दीड वर्षांत ५ किलोमीटरचा बोगदा विद्यापीठ ते शहर हे अंतर कमी करण्यासाठी सुझाऊ नगरपालिकेने तळ्याखालून बांधून काढला. कुठलीही गोष्ट करायची तर ती भव्यदिव्य आणि पराकोटीच्या समर्पणभावाने (dedication) ही वृत्ती चीनमध्ये सगळीकडेच दिसून आली. रस्त्याच्या दुतर्फा पूर्ण वाढ झालेली झाडं दोन दिवसांत लावण्यात येतात. त्यामुळे रुक्ष असलेल्या रस्त्याचे संपूर्ण चित्र दोन दिवसांत हिरवेगार दिसू लागते.
हे तंत्रसुद्धा चिनी लोकांनी उत्तम प्रकारे आत्मसात केले आहे. ऑलिम्पिकचे ‘बर्डस नेस्ट’ असो की, ‘वॉटर क्यू’ असो की साधी वाचनालयाची इमारत. त्यात सगळीकडे चिनी स्पर्श (chinese touch). दरम्यान, सगळ्या जगाने हा चिनी फॉम्र्युला दूरचित्रवाणीवर पाहिलाच आहे. तो प्रत्यक्ष अनुभवता आला. वर्षांनुवर्षे चाललेले रस्त्याचे बांधकाम, तेही त्याच रस्त्याचे अनेक वेळा, ही किमया आपण भारतात सर्वत्र अनुभवलेली!
वाचनालयातून खाली आल्यानंतरही लिफ्टने पुस्तक-श्रीमंत इमारत परत एकदा नजरेतून मनात साठविण्याचा प्रयत्न केला. ग्रंथपालांशी चायनीज इंग्रजीतून थोडासा संवाद साधला आणि त्यांचे आभार मानले. कॅमेऱ्याच्या झडपेने या इमारतीची अनेक छायाचित्रे त्याच्या ‘मेमरी’त कैद केली. त्यापेक्षा कित्येक पटीने जास्त ते ग्रंथालय आमच्या मनात रुतून बसले.
परतीच्या वाटेवर भारतातल्या काही समर्पित ग्रंथपालांच्या आठवणी आल्याशिवाय राहिल्या नाहीत. त्यात औरंगाबादच्या वैद्यकीय महाविद्यालयातले श्री. बडवे होते. जे कधीही ‘कुजबुजणे’ या आवाजाच्या उंचीपलीकडच्या आवाजात बोलत नसत आणि वाचनालयाची शांतता उंच आवाजाने ढवळलेली त्यांना अजिबात आवडत नसे. त्यांच्यासमोर कुणीही आलं तरी त्यांच्या दबदब्यामुळे हळू आवाजातच बोलू लागे.
नांदेडच्या प्रतिभा निकेतन महाविद्यालयाच्या उषा मॅडम होत्या. ग्रंथालय छोटंसं होतं. अगदी अडचणीच्या जागेत कसंबसं उभं केलेलं. परंतु त्यातली सगळी पुस्तकं, संदर्भ त्यांना अगदी कॉम्प्युटरसारखी तोंडपाठ होती.
तसंच स. भु. महाविद्यालयाच्या ओळंबेसरांचीही आठवण होती. त्यांची माझी तर प्रत्यक्ष भेटसुद्धा नाही. केवळ फोनवरच्या संपर्काने मला या गृहस्थांची ‘ग्रंथ परिवारा’ची आवड उमगली. पाहिजेत ते नेमके संदर्भ सहज उपलब्ध! वाटलं अशी ग्रंथांची लाडक्या अपत्यांसारखी काळजी घेणारी ही मंडळी आणि सुचू विद्यापीठातल्यासारख्या सुसज्ज इमारती यांचा संगम झाला तर विद्यार्थ्यांसाठी तो केवढा मणिकांचन योग ठरेल!