Leading International Marathi News Daily
मंगळवार, २४ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

मुख्यमंत्री नांदेडमध्ये कशासाठी आले?
नांदेड, २३ मार्च/वार्ताहर

 

काल सायंकाळनंतर अचानक नांदेडला आलेले व आज दुपारी येथून दिल्लीला रवाना झालेले मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी १८ तासांच्या वास्तव्यात नांदेडमधील नाजूक स्थिती आणि निवडणूकविषयक रणनीती यावर खलबते केली; पण पक्षाच्या उमेदवाराचे नाव गुलदस्त्यात ठेवल्यामुळे स्थानिक पदाधिकाऱ्यांसह काँग्रेस कार्यकर्तेही चकित झाले.
काल रात्री येथे दाखल झाल्या झाल्या मुख्यमंत्र्यांनी शहर व परिसरातील चार-पाच ठिकाणी बैठका घेत कार्यकर्त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून दिली. आज सकाळी आपल्या निवासस्थानानजीकच्या नई आबादी भागाला भेट देताना त्यांनी काँग्रेस व या पक्षाच्या सरकारच्या अधिपत्याखालील पोलीस यंत्रणेवर संतप्त असलेल्या मुस्लिम समाजाच्या रागावर फुंकर घालण्याचा प्रयत्न केला.दिल्लीला रवाना होण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी ओमप्रकाश पोकर्णा यांच्या घरी आजी-माजी नगरसेवकांचा ‘प्रबोधनवर्ग’ घेतला.
श्री. चव्हाण यांच्या या अचानक नांदेडभेटीचे प्रयोजन स्पष्ट झाले नाही. विरोधक आणि काही हितशत्रू आपल्याला आव्हान देत, काँग्रेस उमेदवाराला अडचणीत आणण्याच्या बेतात आहेत, याची जाणीव झाल्यामुळे एकंदर परिस्थितीचा अंदाज घेण्यासाठी त्यांना कर्मभूमीत यावे लागले, असे बोलले जाते.
जनसुराज्य पक्षाचे नेते व चव्हाण यांच्याच मंत्रिमंडळातील प्रभावशाली मंत्री विनय कोरे काल सकाळी मुख्यमंत्र्यांच्या कर्मभूमीत दाखल झाले होते. काँग्रेस, तसेच श्री. चव्हाण व श्री. खतगावकर यांच्या विरोधातील वेगवेगळे गट व प्रवाह श्री. कोरे यांच्या भेटीसाठी येत होते. हे सत्र आज सायंकाळपर्यंत सुरू राहिले. श्री. कोरे यांनीही आज दुपारी परिवर्तनाचा नारा देत आपल्या पक्षाच्या उमेदवार प्रीती शिंदे यांचा अर्ज भरला. शिंदे यांना इटालियन भाषा अवगत आहे, हे श्री. कोरे यांनी नमूद केले आणि पुढच्या काही दिवसांत स्थानिक सत्ताधाऱ्यांना आणखी काही धक्के देण्याचे सुतोवाचही त्यांनी केले.