Leading International Marathi News Daily
मंगळवार, २४ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

सांस्कृतिक सभागृहे आणि चकचकीत रस्ते
प्रमोद माने
औरंगाबाद, २३ मार्च

 

आधी आमदार आणि मग खासदार असलेल्या चंद्रकांत खैरे यांनी गेल्या पाच वर्षांत आलेला संपूर्ण निधी पाणीपुरवठा, आरोग्य, सांस्कृतिक सभागृह, रस्ते, पूल आणि संगणक यावरच खर्च केला. औरंगाबाद, वैजापूर, गंगापूर, पैठण आणि कन्नड या शिवसेनेच्या प्रभाव असलेल्या विधानसभा मतदारसंघांमध्ये त्यांनी आपल्या निधीचा विनियोग केला. विशेषत: त्यांनी लक्ष घातले ते औरंगाबादच्या विकासकामांमध्ये.
शहरात पाणीटंचाई आहे. समांतर जलवाहिनीचा प्रश्न तडीस लावण्यासाठी खासदार म्हणून श्री. खैरे यांनी प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले नाही. पाण्याचा प्रश्न सोडविला गेला नाही, तर औरंगाबादकरांवर मोठे संकट येणार आहे. औरंगाबादमध्ये एकूण ५७ कामांवर त्यांनी आपल्या निधीतून ३ कोटी ६७ लाख ४७ हजार रुपये खर्च केले आहेत. त्यात प्रामुख्याने सभागृह आणि मलनिस्सारण, स्वच्छतागृह यावरच खर्च झाला आहे. शहरात त्यांच्या निधीतून ८९ विंधन विहिरी झाल्या. शहरात पाण्याची निकड आहे, हे ध्यानात घेऊन त्यांनी त्यावर २२ लाख रुपये खर्च केले आहेत.
मूलभूत सोयींपासून वंचित असलेल्या अनेक तालुक्यांना श्री. खैरे यांनी आपल्या निधीतील वाटा दिला खरे; परंतु हाच वाटा फुलंब्री आणि खुलताबाद तालुक्यांना मिळाला नाही. फुलंब्री आता नव्याने विधानसभा मतदारसंघ झालेला आहे. या भागातून कामाची मागणीच नसल्यामुळे फुलंब्री तालुक्यात कामे झाली नाहीत, असे श्री. खैरे यांचे म्हणणे आहे. केवळ चार कामांवर २० लाख ८८ हजार रुपये खर्च झाले आहेत. खुलताबादलाही त्यांनी सापत्न वागणूक दिली आहे. तेथे ५ कामांवर २९ लाख ४९ हजार रुपये खर्च झाले आहेत.
श्री. खैरे यांनी जवळपास १० कोटींपैकी २२ टक्के रक्कम जिल्ह्य़ातील सांस्कृतिक सभागृहांवर खर्च केली आहे. जिल्ह्य़ातील दळण-वळण सुकर व्हावे या हेतूने त्यांनी रस्त्याचे जाळे मोठय़ा प्रमाणावर निर्माण केले. डांबरीकरण, मजबुतीकरण यावर भर त्यांनी दिला. त्यावर तब्बल साठ टक्के निधी वापरण्यात आला आहे. एवढे होऊनही जिल्ह्य़ातील अनेक रस्ते डांबरीकरण आणि मजबुतीकरणापासून दूर आहेत. संपूर्ण जिल्हाच चकचकीत आणि सुंदर झाला असे म्हणता येणार नाही. त्यांचे विरोधक उपाहासाने विचारतात, ‘हा निधी त्यांनी वापरला कुठे?’ त्यांनी वापरलेला निधी दिसत नसल्याचाही आरोप करण्यात आला आहे.खुलताबाद, पैठण आणि रेडक्रॉस सोसायटी यांना श्री. खैरे यांनी रुग्णवाहिका दिल्या. अनेक ठिकाणी रस्त्यांचे मजबूत जाळे विणले. शिक्षण, पाणी असे काम या विकास निधीतून करण्यात आले. ग्रामीण भागामध्ये संगणकाची सोय नाही. म्हणून त्यांनी ग्रामीण भागात ५६ लाख रुपयांची संगणके दिली.
त्याशिवाय औरंगाबाद शहरातील महिला कला महाविद्यालय, मौलाना आझाद महिला महाविद्यालय नवखंडावाला या शिक्षण संस्थांनाही त्यांच्या निधीतून संगणक देण्यात आले. या शिवाय २० लाख रुपयांच्या चार व्यायामशाळा बांधण्यात आल्या. विकास निधी हा जनतेच्या उपयोगी पडावा हाच प्रयत्न सदैव राहिला असल्याचे श्री. खैरे यांनी सांगितले. पायाभूत सोयींसाठीच हा निधी वापरला असे ते म्हणाले.