Leading International Marathi News Daily
मंगळवार, २४ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

‘राष्ट्रवादी’तर्फे पद्मसिंह?
उस्मानाबाद, २३ मार्च/वार्ताहर

 

लोकसभेच्या उस्मानाबाद मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांचे नाव जाहीर झाल्याची बातमी आली आणि उत्सुकता संपली. तथापि अधिकृत यादीत त्यांचे नाव नाही.
उस्मानाबादची जागा काँग्रेसला की राष्ट्रवादी काँग्रेसला, असे प्रत्येक जण एकमेकांना विचारत होता. अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे पारडे जड झाले. डॉ. पाटील यांची उमेदवारी जाहीर झाल्याच्या बातमी नंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
उस्मानाबाद मतदारसंघ खुला झाल्यानंतर गेल्या वर्षी गुढीपाडव्याच्या दिवशी डॉ. पद्मसिंह पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत उतरणार असल्याचे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात जाहीर केले होते. तेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेसने ही जागा मिळविण्यासाठी कंबर कसली होती. त्यात काँग्रेसकडून बऱ्याच अडचणी आणल्या गेल्या. लातूर मतदारसंघ राखीव झाल्यामुळे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख व माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या नावाची चर्चा सुरू होती. काँग्रेस आघाडीत उस्मानाबादच्या जागेमुळे पेच निर्माण होतो की काय अशी शक्यता निर्माण झाली होती. अखेर ही जागा डॉ. पद्मसिंह पाटील यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला, असे समजते.
गेली काही दिवस उस्मानाबादच्या जागेवरून निर्माण झालेल्या वादात मतदारांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. ज्याच्या त्याच्या तोंडी हीच चर्चा होती. त्या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. उस्मानाबादमध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना अशीच लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रा. रवींद्र गायकवाड यांची उमेदवारी शिवसेनेने पूर्वीच जाहीर केली आहे.