Leading International Marathi News Daily
मंगळवार, २४ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

जनतेच्या हितासाठी समर्थ राजकीय पर्यायांची गरज - येचुरी
औरंगाबाद, २३ मार्च/खास प्रतिनिधी

 

जनतेच्या हितावर आधारित धोरण आखून काही राजकीय पर्याय उभे राहण्याची हीच वेळ आहे, असे मत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य सीताराम येचुरी यांनी व्यक्त केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या डॉ. आंबेडकर संशोधन केंद्रातर्फे आयोजित राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन खासदार येचुरी यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. ‘डॉ. आंबेडकरांचे राजकीय तत्त्वज्ञान व स्वातंत्र्योत्तर भारतातील बदलते राजकारण’ हा या चर्चासत्राचा विषय होता. अध्यक्षस्थानी कुलगुरु डॉ. नागनाथ कोत्तापल्ले हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार उषाताई दराडे या उपस्थित होत्या. खासदार येचुरी म्हणाले, भारत हा शब्द डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत जाणीवपूर्वक घातला आहे.
भावम, रागम आणि तालम यांचे मिलन म्हणजे भारत. या देशात धर्म, भाषा, संस्कृती, इतिहास यात विविधता आहे. या विविधतेमध्येच राष्ट्रीय एकात्मता आहे. अशा वेळी कोणी जात, धर्म, भाषा यावर भर देऊन राजकारण, समाजकारण करत असेल तर हा धोका अधिक आहे. धार्मिक राजकारणाला दूर करणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.
एक व्यक्ती एक मत हा अधिकार देण्यामागे डॉ. आंबेडकर यांना समानता अपेक्षित होती. आज आर्थिक, सामाजिक, राजकीय अशा विविध पातळ्यांवर असमानता दिसते आहे. शायनिंग इंडियाचा बोलबाला असताना दररोज २० रुपयांपेक्षाही अधिक उत्पन्न नसणाऱ्यांची संख्या अधिक आहे. ४५ टक्के मुले कुपोषित आहेत. ५० टक्के मुलांची वाढ खुंटली आहे. ७८ टक्के महिलांच्या शरीरात पुरेसे रक्त नाही. अशा स्थितीत काही धोरणे आखून राजकीय पर्याय उभे करण्याची गरज आहे. ही धोरणे लोकांच्या कल्याणाची असावीत. लोकांची क्रयशक्ती वाढली तरच मंदीतून मार्ग निघेल असेही खासदार येचुरी म्हणाले.
नकारात्मकपणे राजकारणाकडे बघू नका, असे आवाहन आमदार उषा दराडे यांनी केले. धर्म निरपेक्ष शक्ती एकत्र येणे ही काळाची गरज आहे. परिवर्तनाला गती देण्यासाठी सर्वसामान्यांचा राजकारणातील सहभाग वाढविणे गरजेचे आहे, असेही त्या म्हणाल्या. आचार आणि विचारात फरक असल्यामुळे समाजात काही प्रश्न निर्माण होत असल्याचे कुलगुरु डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी सांगितले.