Leading International Marathi News Daily
मंगळवार, २४ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

लोकसभा मतदानाची वेळ अद्यापि निश्चित नाही
जालना, २३ मार्च/वार्ताहर

 

लोकसभेच्या निवडणुकीसाठी मतदानाची वेळ नेहमीपेक्षा एक तास अधिक असावी, अशी ईशान्येतील राज्यांनी मागणी केली आहे. यासंदर्भात विचार चालू असल्याने केंद्रीय निवडणूक आयोगाने या निवडणुकीसाठी मतदानाची वेळ अद्यापि जाहीर केलेली नाही. नेहमी मतदानाची वेळ सकाळी ७ ते सायंकाळी ५ असते; ती ७ ते ६ असावी, अशी मागणी आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हधिकारी आर. डी. शिंदे यांनी आज पत्रकार बैठक घेतली. या वेळी त्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, पूर्वी शाळांच्या मैदानावर उमेदवारांना सभा घेता येत नव्हती. आता मात्र शाळेच्या कामात व्यत्यय येत नसेल तर संबंधित शाळेच्या परवानगीने अशा सभा घेता येतील. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उमेदवारासह पाचजणांनाच जिल्हाधिकारी कार्यालयापासून १०० मीटरच्या आत प्रवेश दिला जाईल. अर्ज भरण्याच्या वेळी उमेदवारांना तीनच वाहने आणता येतील. प्रचारासाठी वाहने किती असावीत यावर बंधन नाही; परंतु प्रत्येक वाहनावर निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेली परवानगी मूळ प्रतीत चिकटविणे आवश्यक आहे. उमेदवाराच्या खर्चाची मर्यादा २५ लाख रुपये असून दैनंदिन खर्चाचा अहवाल देणे बंधनकारक आहे.
श्री. शिंदे म्हणाले की, जालना मतदारसंघातील ६६.५६ टक्के मतदारांची ओळखपत्रे तयार झालेली आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिनांकापर्यंत म्हणजे ४ एप्रिल रोजीपर्यंत मतदारांना नावनोंदणी करता येईल. नाव मतदारयादीत आहे की नाही हे पाहण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कक्ष उघडण्यात येणार आहे. नवीन मतदारांची ओळखपत्रे तयार झाली नाहीत तरी पुरवणी यादीत त्यांची नावे आणि छायाचित्रे असतील. मतदानाच्या वेळी ओळखपत्र अनिवार्य असेल की नाही याबाबत अद्यापि कोणतीही सूचना नसली तरी मतदारांनी ओळखपत्रे तयार करण्यासाठी प्रतिसाद दिला पाहिजे.
जालना मतदारसंघात १ हजार ७२२ मतदान केंद्रे असतील. एकूण ७ हजार ५६७ अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, असे सांगून श्री. शिंदे म्हणाले की, वाहतुकीसाठी १६३ विभाग निश्चित केले आहेत. एकूण १६३ विभागीय अधिकाऱ्यांना शेवटच्या आठवडय़ात दंडाधिकाऱ्यांचे अधिकार देण्यात येतील.
मागील निवडणुकीत ७५ टक्क्य़ांपेक्षा अधिक मतदान झालेली मतदान केंद्रे, ज्या ठिकाणी एकाच उमेदवारास ७५ टक्क्य़ांपेक्षा अधिक मते पडली आहेत अशी केंद्रे, २० टक्क्य़ांपेक्षा कमी छायाचित्रे काढली गेलेली मतदान केंद्रे, गैरप्रकार झालेली केंद्रे, सामाजिक किंवा जातीयदृष्टय़ा प्रश्न निर्माण करणारी पोलिसांनी निश्चित केलेली मतदान केंद्रे इत्यादी मतदान केंद्रे संवेदनशील ठरविली जातात, असेही श्री शिंदे यांनी सांगितले.

* शाळांच्या मैदानावर सभा घेता येणार
* मतदान केंद्र प्रतिनिधी त्या भागातीलच हवा
* ३३ टक्के मतदारांची ओळखपत्रे बाकी
* मतदारनोंदणी ४ एप्रिलपर्यंत