Leading International Marathi News Daily
मंगळवार, २४ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

‘समांतर’च्या सर्वेक्षणास केंद्राचा हिरवा कंदील
औरंगाबाद, २३ मार्च/प्रतिनिधी

 

‘क्रिसील’ या जगप्रसिद्ध संस्थेमार्फत नियोजित समांतर जलवाहिनी प्रकल्पासाठी सर्वेक्षण करण्यास केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखविला आहे. येत्या काही दिवसांत हे सर्वेक्षण सुरू होणार असून सहा महिन्यांत पालिका आणि सरकारकडे सविस्तर अहवाल अपेक्षित आहे.
सर्वेक्षणासाठी एक कोटी २० लाख रुपये खर्च येणार असून त्यातील एक पैशाचाही भार पालिकेवर पडणार नाही. सर्वेक्षणाचा ७५ टक्के खर्च केंद्र सरकारच्या भारतीय मुलभूत सुविधा विकास योजनेतून अर्थ खात्याकडून करण्यात येणार आहे तर उर्वरित २५ टक्के रक्कम एशियन डेव्हलपमेंट बँक करणार आहे.
दिल्लीत केंद्रीय सचिवांच्या उपस्थितीत गेल्या आठवडय़ात पालिकेच्या वतीने या प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले. या प्रकल्पाची गरज आणि अन्य बाबी त्यांच्यासमोर मांडण्यात आल्यानंतर या प्रकल्पाचे सर्वेक्षण करण्यास क्रिसील या संस्थेची नियुक्ती करण्यात आली.
येत्या सहा महिन्यांत हे सर्वेक्षण करण्यात येणार असून प्रकल्प कसा असावा, कोठे काय समस्या येऊ शकतात, त्यावर काय उपाययोजना करणे गरजेचे आहे, याबरोबरच जगातील कोणती संस्था हे काम करू शकेल आणि निविदा व निविदेतील अटी, शर्थी काय असाव्यात असे सर्वच या क्रिसील संस्थेने तयार करून द्यायचे आहे.
जलसपंदामंत्री अजित पवार यांनी या प्रकल्पाची सूत्रे आपल्या हाती घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला होता. त्यांच्या प्रयत्नांमुळेच प्रारंभीचे ३ अब्ज ६० कोटी रुपये देण्याचे शासनाने मान्य केले होते. मध्येच आचारसंहिता आल्यामुळे मंत्रीपातळीवर याची पुढे प्रक्रिया होऊ शकली नाही. मात्र प्रशासकीय आणि तांत्रिक कामे सध्या सुरू आहेत. या संस्थेला मान्यता मिळणे हा त्याच कामांचा एक भाग असल्याचे सांगण्यात येत आहे.