Leading International Marathi News Daily
मंगळवार, २४ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

नऊ महिन्यांच्या तान्हुल्याच्या आक्रोशाने गहिवरले रुग्णालय
औरंगाबाद, २३ मार्च/प्रतिनिधी

 

स्वयंपाक करताना भाजलेल्या २२ वर्षांच्या विवाहितेचा आज दुपारी मृत्यू झाला. त्यांना अवघ्या ९ महिन्यांचे मूल आहे. सकाळी साडेदहा वाजता ही घटना घडली होती. तेव्हापासून तो आईपासून दूर आहे. पोटाला भूक लागल्याने त्याने रुग्णालयात टाहो फोडला. त्या कोवळ्या जीवाची समज काढण्यात आजीलाही अपयश आले. मृत्युमुखी पडलेली आई आणि आईसाठी टोहो फोडणारे तान्हुले हे दृश्य पाहून उपस्थित सर्वच हेलावून गेले.
जयश्री सचिन मुगीवेल्हाळ (इसारवाडी, पैठण) असे मृत्युमुखी पडलेल्या या मातेचे नाव आहे. सकाळी साडेदहा वाजता स्वयंपाक करताना भाजल्यावर तिला सरकारी रुग्णालयात हलविण्यात आले. दुपारी दोन वाजता तिची प्राणज्योत मालवली.
सकाळी साडेदहा वाजता ही घटना घडली तेव्हा त्यांची आजी नातवंडाला झोपवत होती. त्याच वेळी भाजलेल्या जयश्रीच्या ओरडण्याने हे बाळ झोपले नाही. नंतर त्याला नातेवाईक सांभाळत होते. हे बाळ आजारीही होते.
जयश्री यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी दुपारी २ वाजता सांगितले आणि त्यांच्या नातेवाईकांनी आक्रोश केला. त्यामुळे त्या मुलानेही रडण्यास सुरुवात केली. मोठी माणसे एकमेकांचे सांत्वन करत होती. त्या अजाण बालकाचे सांत्वन कोण करणार होते! आईजवळ जाण्यासाठी त्याचा आक्रोश सुरू होता आणि इकडे त्याच्या आईचे पार्थिव उत्तरीय तपासणीसाठी शवागारात नेण्यात येत होते. या बाळाकडे बघून नातेवाईकांसह तेथील रुग्ण, अधिकारी आणि कर्मचारीही हेलावून गेले.