Leading International Marathi News Daily
मंगळवार, २४ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

आई देवाघरी, वडील तुरुंगात, मुले उघडय़ावर!
लोहा, २३ मार्च/वार्ताहर

 

पप्पा, आपण इथं का आलो.. पोलीस का बोलतायेत, किती वेळ थांबायचं,चला ना घरी,आई कुठंय, भाऊ रडू नको रं, आता आपण घरी जाऊ, आई येईल तिथं,असे हृदयाला पाझर फुटणारे बोल त्या नऊ-सहा वर्षांच्या बहीण-भावाचे.
आईचा जळून मृत्यू झाला. वडील पोलीस ठाण्यात. सुखी संसाराच्या बागेतील वेलीवर खेळणारी- बागडणारी ही चिमुकली मुलं उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबातील. लोहा तालुक्यात दोन वेगवेगळ्या घटनेत जळून मरण पावलेल्या विवाहित महिलांच्या घरची ही कहाणी.
लोहा परिसरातील चार घटना. तीन विवाहितांचा जळून मृत्यू झाला. एका घटनेत शिक्षकाने पत्नीला जाळले. धर्मापुरी येथील सुनीता नावाच्या विवाहितेला जाळून मारण्याची घटना घडली. तिला एक मुलगा, एक मुलगी आहे. सासरच्या लोकांनी छळ केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल झाला आहे. आई मरण पावली.आजी-आजोबा तुरुंगात. ही चिमुकली मुलं माहेरच्यांकडे. अशाच प्रकरणात नणंदेवर गुन्हा दाखल झाला. तिचे नाव मीना. तिला तीन लेकरं. एक तान्हुलं. दुसरा दोन वर्षांचा तर मोठा पाच वर्षांचा. या तीनही लेकरांसह मीना तुरुंगात. लहान लेकराची काळजी घ्यावी असा आदेश न्यायालयाने या लेकरांना पाहून दिला. सांभाळायला कोणी नाही आईसोबतच ही लेकरं तुरूंगात.
दुसरी घटना घुगेवाडी येथील शिक्षक संजय नागरगोजे याच्या कुटुंबाची. पत्नी कौसल्या हिला पती मानसिक, शारीरिक त्रास देत असल्याने कंटाळून तिने शुक्रवारी जाळून घेतले. त्यातच तिचा मृत्यू झाला. तिला नऊ वर्षांचा मुलगा, सहा वर्षांची मुलगी, दोन वर्षांचं चिमुकलं सारे पोलीस ठाण्यात वडिलांसोबत. लहान भावाला कडेवर घेऊन दुडूदुडू पोलीस ठाण्यात धावणारा नऊ वर्षांचा पोरगा ‘पप्पा.. चला ना घरी’, आई कुठंय, म्हणून टाहो फोडणारी पोरगी. आई गेली, वडील गजाआड.
माळाकोळीचा रहिवासी पण भोकर येथे शिक्षक असलेला बालाजी मस्के यांने पत्नीला मारले. त्याला दोन मुले. ही लेकरं उघडय़ावर अशाच परिस्थितीचे शिकार झालेली. बनवस येथील आणखी तीन लेकरं. विजयमाला (नाव बदलून)चा अनैसर्गिक मृत्यू झाला. तिने दिलेल्या जबाबात सासू-सासरे, दीर यांचे नाव घेतले. तिची एक वर्षांची मुलगी नातेवाईकांकडे तर दोन मुली दुसऱ्या नातेवाईकांकडे. आजी-आजोबा, काका तुरुंगात.
या चार घटनेत मरण पावलेल्या विवाहितांच्या मरणास कारणीभूत असलेल्यांवर पोलीस कारवाई झाली. ते तुरुंगात गेले. अशा घटनेत अनेक बालकांच्या नशिबी यातना येतात. विवाहितेच्या मृत्युला कारण ठरलेल्या दोषींना न्यायालय शिक्षा देईल पण काही निरापराधांनाही तुरुंगावी हवा खावी लागते. चिमुकल्यांना पाहून आपले हृदयही भरून येत. डोळ्यांतून धारा गळतात पण ‘वर्दी’मुळे हृदयावर दगड ठेवून गुन्हेगारांना शिक्षा झाली पाहिजे यासाठी कर्तव्य बजवावे लागते असे एका पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
महिलाच अत्याचाराच्या बळी पडतात असे नव्हे तर पत्नीच्या जाचामुळे पुरुषांचेही जीवन उद्ध्वस्त होत असते. सुखी संसाराचा गाडा पती-पत्नीने एकजीवाने ओढला तरच आयुष्याच्या टोकापर्यंत जाते अन्यथा हा गाडा रुततो, बाग सुकते, त्याचा परिणाम चिमुकल्यांना सोसावा लागतोय!