Leading International Marathi News Daily
मंगळवार, २४ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

पत्रकारभवनाच्या परिसरातील हिरवळ गेली कोणीकडे?
अधिकाऱ्यांकडून शोध सुरू
औरंगाबाद, २३ मार्च/प्रतिनिधी

 

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातील माजी आमदार श्रीकांत जोशी यांच्या निधीतून आणि महापालिकेच्या सहकार्याने भाग्यनगरात उभारण्यात आलेल्या भव्य पत्रकारभवनाचे उद्घाटन भारतीय जनता पक्षाचे नेते गोपीनाथ मुंडे यांच्या हस्ते मागील महिन्यात झाले. उद्घाटनानंतर येथे अद्यापि एकही जाहीर कार्यक्रम झालेला नाही. तोच या भवनाच्या परिसरातील हिरवळ (लॉन) मात्र गायब झाल्याचे समोर आले आहे.
ती चोरीला गेल्याचे प्रथम सांगण्यात येत होते. नंतर ही हिरवळ उद्यानात नेऊन ठेवण्यात आल्याचे सांगितले जात आहे. प्रत्यक्षात ही हिरवळ नेमकी कोठे आहे, हे सध्यातरी कोणालाच माहिती नाही.
येथील हिरवळ गायब झाल्याचे काल निदर्शनास आले. प्रारंभी संबंधित अधिकाऱ्यांकडे विचारणा करण्यात आली असता येथील हिरवळ बहुतेक चोरीला गेली असावी, असे उत्तर देण्यात आले. त्यानंतर ही बातमी महापौर विजया रहाटकर यांच्या कानी गेली. त्यांनाही सुरुवातीला तसेच उत्तर देण्यात आले होते. नंतर मात्र वेगळीच माहिती त्यांना देण्यात आली. पत्रकारभवनाच्या परिसरात ही हिरवळ वाळून जाईन म्हणून ती उद्यानात सुरक्षित ठेवण्यात आली असल्याचे त्यांना सांगण्यात आल्याचे श्रीमती रहाटकर यांनी सांगितले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ती हिरवळ ठरवून एका व्यावसायिकाला देण्यात आली आहे. उद्घाटन समारंभाच्या तिसऱ्याच दिवशी तेथून हिरवळ काढण्यात आली होती. या भवनाकडे कोणीच न फिरकल्याने ही बाब कोणाच्याही लक्षात आली नाही. कालौघात हिरवळ चोरीला गेल्याचे सांगण्यात येणार होते. त्यामुळेच सुरुवातीला तसा प्रयत्न झाला. मात्र आता हा प्रकार समोर आल्याने सिद्धार्ध उद्यानातून दुसरी हिरवळ तेथे आणण्यात येणार आहे. हिरवळ गायब झाल्याचे पत्रकारांच्या नजरेतून सुटेल, असा कयास अधिकाऱ्यांचा असावा. मात्र तसे घडायचे नव्हते. हा प्रकार वेळीच समोर आला.