Leading International Marathi News Daily
मंगळवार, २४ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

मकबरा परिसरातील महिला पाण्यासाठी पालिकेवर
पंधरा दिवसांपासून पाणीच नाही
औरंगाबाद, २३ मार्च/प्रतिनिधी

 

गेल्या काही दिवसांपासून अतिशय कमी दाबाने पाणी येत असताना नंतर पाणीच येणे बंद झाले. काही दिवस वाट पाहिल्यानंतर संतप्त झालेल्या बीबी का मकबरा परिसरातील महिलांनी आज सकाळी महानगरपालिका कार्यालयावर मोर्चा नेला. अधिकाऱ्यांना घेराव घालण्याबरोबरच घोषणांनी परिसर दणाणून सोडला. पाणी मिळाले नाही तर अधिकाऱ्यांना काळे फासण्यात येईल, असा इशाराही या महिलांनी दिला आहे.
बेगमपुरा, पहाडसिंगपुरा, गुरुगणेशनगर आणि त्या लगतच्या भागात गेल्या काही महिन्यांपासून कमी दाबाने पाणी येत आहे. पाण्याचा दाब वाढावा यासाठी काही महिन्यांपूर्वी याच महिलांनी पालिकेवर मोर्चा काढला होता. लवकरच यातून मार्ग काढून पुरेशा दाबाने पाणी देण्यात येईल, असे आश्वासन महापौर विजया रहाटकर यांनी त्यांना दिले होते. मात्र त्यानंतर पाण्याच्या दाबात वाढ झाली नाही. उलट गेल्या पंधरा दिवसांपासून नळांना पाणीच येणे बंद झाले. येथील कुंभात पुरेसे पाणी येत नसल्यामुळे पाण्याचा दाब कमी आहे. याचे काम सुरू असून लवकरच पुरेशा दाबाने पाणी येईल, असे अधिकाऱ्यांकडे विचारणा केल्यानंतर सांगण्यात येत होते. मात्र पंधरा दिवस प्रतीक्षा केल्यानंतर येथील महिलांचा संयम संपला आणि त्यांनी नगरसेवक गणू पांडे यांच्या घरी धाव घेतली. संतप्त महिला त्यांनाच याबद्दल जाब विचारत होत्या.
श्री. पांडे यांनी या महिलांना घेऊन पालिका मुख्यालय गाठले. महापौरांसह अन्य पदाधिकारी नव्हते. त्यामुळे त्यांनी प्रचंड घोषणाबाजीत अधीक्षक अभियंता भगवान म्हस्के यांच्या दालनाकडे धाव घेतली आणि घेराव घालत त्यांच्याच दालनात ठिय्या आंदोलन केले. पाणी मिळाल्याशिवाय येथून जाणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. त्यानंतर प्रशासकीय पातळीवर विचारणा सुरु झाली. जलकुंभच पूर्ण क्षमतेने भरत नसल्यामुळे नळाच्या पाण्याला दाब येणे शक्य नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. शहरातच पाणी येत नाही तर उंचावरील त्या कुंभात पाणी सोडणार कोठून असाही प्रश्न अधिकाऱ्यांनी उपस्थित केला.येत्या आठ दिवसांत यातून मार्ग काढण्यात येईल असे आश्वासन आंदोलक महिलांना देण्यात आले. मात्र आठ दिवसात पाणी येण्यास सुरुवात झाली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.