Leading International Marathi News Daily
मंगळवार, २४ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

तिसऱ्या आघाडीचा राज्यात परिणाम नाही - अशोक चव्हाण
नांदेड, २३ मार्च/वार्ताहर

 

तिसऱ्या आघाडीचा राज्यात कोणताही परिणाम होणार नाही, असे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काल स्पष्ट केले. दिल्लीहून नागपूरमार्गे रात्री नांदेडमध्ये आलेल्या श्री. चव्हाण यांची काही पत्रकारांनी भेट घेतली. त्या वेळी ते बोलत होते.
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागावाटपाचा घोळ संपला आहे. राष्ट्रवादी काँग्रेससह रिपब्लिकन पक्षाच्या आठवले व गवई गट यांच्याशी आमची युती झाली आहे. प्रकाश आंबेडकर यांनाही आम्ही विनंती केली होती; परंतु ते तिसऱ्या आघाडीसोबत जाणार असल्याचे आपण वृत्तपत्रांतून वाचले आहे, असे श्री. चव्हाण म्हणाले.
आम्ही क्रीडाप्रेमी आहोत, आजपर्यंत आम्ही खेळांना प्रोत्साहन दिले आहे. त्यामुळे आय. पी. एल. सामन्यांना आमचा विरोध नाही. मात्र लोकसभा निवडणूक व आय. पी. एल.चे सामने एकाच वेळी आल्याने दोन्ही ठिकाणी पोलीस बळ उपलब्ध करून देणे शक्य नाही. क्रिकेट सामन्यांपेक्षा नागरिकांच्या सुरक्षेला आमचे प्राधान्य आहे, असेही श्री. चव्हाण म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार काँग्रेसशी दगाफटका करतील काय, असे काही पत्रकारांनी विचारले. त्यावर श्री. चव्हाण म्हणाले की, आपल्याला तसे काही वाटत नाही. नांदेडमध्ये झालेली दंगल, त्यानंतर वाटण्यात आलेले प्रक्षोभक पत्रक या दोन्ही प्रकरणांची चौकशी करण्यात येईल व दोषींविरुद्ध कारवाई करण्यात येईल. इतर समाजाच्या भावना दुखावणाऱ्या ‘मंदिर वही बनाएंगे’ व ‘मस्जिद वही बनाएंगे’ या दोन्ही गाण्यांवर बंदी घालण्याचे त्यांनी सूचित केले.
नांदेड महसूल आयुक्तालयाबाबत एका सदस्याची नेमलेली समिती म्हणजे दावे, हरकतीचा एक भाग आहे. कोणाच्या दडपणामुळे हा निर्णय झाला नाही.
अनेक जण न्यायालयात गेले आहेत. त्यामुळे सर्वाचे म्हणणे ऐकून घेतले जात आहे, असे श्री. चव्हाण म्हणाले. या वेळी शाम दरक, मुन्ना अब्बास उपस्थित होते.