Leading International Marathi News Daily
मंगळवार, २४ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

गंगाखेडमधील उपाहारगृहांचा दर्जा ढासळला!
प्रमोद साळवे
गंगाखेड, २३ मार्च

 

शहरात चालणाऱ्या सुमारे अडीचशे उपाहारगृहांमध्ये स्वच्छतेविषयक सुविधांची तीळमात्र काळजी न घेण्याच्या वृत्तीने ग्राहकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तहसील प्रशासन, नगरपालिका प्रशासन तसेच जिल्हा अन्न व भेसळ प्रतिबंधक विभाग कार्यालयाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना आरोग्यविषयक तक्रारींना सामोरे जावे लागत आहे.
शहरात उपाहारगृहांची संख्या सुमारे अडीचशेच्या घरात आहे. उपाहारगृह चालविण्यासाठी प्रशासकीय पूर्तता पूर्ण करीत ग्राहकांच्या आरोग्याची व पदार्थाच्या दर्जासाठी काळजी घेणे गरजेचे असते. मात्र प्रत्यक्षात परिस्थिती उलटी असल्याचे दिसून येते. नगरपालिकेचे प्रभारी कार्यालयीन अधीक्षक सुरेश कुलकर्णी यांनी उपाहारगृहांच्या नोंदणीबाबत पालिकेत नोंद नसल्याचे सांगितले.तहसील प्रशासनाचे या विभागाचे कर्मचारी श्री. मुंडे यांनी शहरात केवळ १९ हॉटेल्स परवानाधारक असल्याचे सांगितले. परवानाधारक चालकांची नावे देण्यास मात्र नकार दिला.
तालुका तहसील प्रशासन हॉटेल्सच्या नोंदणी व नूतनीकरणाबाबत गैरजबाबदार असल्याचे श्री. मुंडे यांच्या वर्तणुकीवरून स्पष्ट जाणवले. तहसीलदार के. जी. कदम यांनी मात्र सध्या आचारसंहितेच्या कामातून नागरिकांच्या भेटी व कामास वेळच नसल्याचे सांगून वेळ मारून नेली.
उपाहारगृह व हॉटेल्समध्ये वापरण्यात येणारे पिण्याचे पाणी, अन्नाचा दर्जा व स्वच्छतेबाबत कुठेच दक्षता घेतली जात नाही. कुठलीही प्रशासकीय यंत्रणा याबाबतीत दक्ष असल्याचे दसत नाही. ग्राहकांना सोयीसुविधा न देता अस्वच्छता व दर्जाहीन अन्न यामुळे हजारो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.