Leading International Marathi News Daily
मंगळवार, २४ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

बायोमिमिटीकमुळे औषधांच्या किंमती कमी - डॉ. केशव देव
औरंगाबाद, २३ मार्च/खास प्रतिनिधी

 

मानवाचे राहणीमान उंचाविण्यासाठी विविध पातळ्यांवर सातत्याने संशोधन होत आहे. त्याचाच एक भाग म्हणून औषध निर्मितीत बायो मिमिटीक (प्रतिकृती) तयार करून किंमती कमी करण्याची प्रक्रिया सुरू आहे. येत्या काही वर्षांत या पद्धतीचे महत्त्व वाढत जाणार आहे, असे मत वोखार्ड या औषध उत्पादन करणाऱ्या कंपनीचे अध्यक्ष डॉ. केशव देव यांनी व्यक्त केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागातर्फे ‘बायो कॅटॅलिसीस अ‍ॅण्ड बायोमिमिटीक कॅटॅलिसीस इन ऑर्गनिक सिंथेसीस’ या राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या चर्चासत्राचे उद्घाटन डॉ. देव यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरु डॉ. नागनाथ कोत्तापल्ले होते.
डॉ. देव म्हणाले की, रसायनशास्त्रामध्ये २१ व्या शतकात विविध संशोधन होत आहे. बायोमिमिटीक तयार करून किंमती कमी करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पुढच्या शतकात तर केमोवरून बायोसिंथेसीसकडे प्रवास सुरू होईल. औषध निर्मितीत प्रतिकृतीमुळे मोठा फरक पडला आहे. कमी किमतीत औषध मिळणार आहे असेही त्यांनी सांगितले.
या क्षेत्रात संशोधनासाठी खूप वाव आहे. आंतरविद्याशाखीय चर्चा या निमित्ताने व्हावी अशी अपेक्षा कुलगुरु डॉ. कोत्तापल्ले यांनी बोलून दाखविली. विज्ञान विद्या शाखेचे अधिष्ठाता डॉ. डी. आर. माने यांनी मनोगत व्यक्त केले. विभागप्रमुख डॉ. सी. एच. गिल यांनी विभागाची माहिती दिली. या वेळी प्रा. एस. आर. सोनोने, डॉ. एम. एस. िशगारे, डॉ. टी. के. सौंढेकर, प्रियंका मानधने, आदी उपस्थित होते