Leading International Marathi News Daily
मंगळवार, २४ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

काँग्रेसच्या विजयासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करा - मुख्यमंत्री
नांदेड, २३ मार्च/वार्ताहर

 

मतांचे विभाजन करून गेल्या निवडणुकीत विरोधकांनी यश मिळविले होते. तशी चूक न करता काँग्रेसच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी सर्वानी प्रामाणिक प्रयत्न करावेत, असे आवाहन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी विविध बैठकांमध्ये केले.
जागावाटपाचा घोळ, वेगवेगळ्या पक्षांशी युती यासह अनेक घडामोडींतून वेळ काढून कोणतीही पूर्वकल्पना न देता श्री. चव्हाण काल रात्री ७.३० वाजता विमानाने आले. विमानतळावरून ते थेट देगलूर नाका येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत पोहोचले. तेथे ते बोलत होते. मुख्यमंत्र्यांनी देगलूर नाका, पाटनूरकर नगर, तरोडा (खु.) व तरोडा (बु.) या चार ठिकाणी मतदार व कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
नांदेड मतदारसंघाकडे संपूर्ण देशाचे लक्ष असते. यापूर्वी (कै.) शंकरराव चव्हाण यांनाही विरोध झाला होता. आता मुख्यमंत्र्याचा जिल्हा म्हणून काँग्रेस उमेदवाराला पाडण्याचा कट विरोधकांनी आखला आहे, असे सांगून श्री. चव्हाण म्हणाले की, मतांचे विभाजन करून तसेच जाती-धर्मात तेढ निर्माण करून शिवसेना-भारतीय जनता पक्ष युतीचे नेते मंदिर-मशिदीसारख्या विषयांना चर्चेत आणत आहेत. कायदा सर्वासाठी समान आहे. गुन्हेगारी प्रवृत्ती समाजात वाढता कामा नये. गुन्हेगार कोणत्याही जाती-धर्माचा नसतो त्यामुळे त्यांना शिक्षा झाली पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. नांदेडमध्ये घडलेली दंगल सरकारला बदनाम करण्याचा डाव आहे, त्यामुळे मतदारांनी अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी काँग्रेसच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे.
गुरू-ता-गद्दी सोहळ्याच्या निमित्ताने शहराचा कायापालट झाला आहे. अनेक भागांतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. विकासकामात कोणतीही त्रुटी राहिली नाही. तुम्ही काँग्रेसला ताकद देऊन विकासाचे आमच्यावर सोडा, अशा शब्दांत श्री. चव्हाण यांनी मतदारांना आश्वासन दिले. भा. ज. प.-शिवसेनेच्या अपप्रचाराकडे लक्ष देऊ नका. चुकीचा प्रचार करणे हे त्यांचे कामच आहे. महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे. येथे सामाजिक संघर्ष होऊ नये अशीच आमची भूमिका आहे. गेल्या निवडणुकीत जी चूक झाली त्याचे परिणाम तुम्हाला माहीत आहेत. पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग व काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांचे हात बळकट करण्यासाठी सर्वानी काँग्रेस उमेदवाराच्या विजयासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.
मुख्यमंत्र्यांसमवेत प्रदेश सरचिटणीस अमर राजूरकर, महापौर बलवंतसिंग गाडीवाले, नगरसेवक मुन्ना अब्बास, मसूद खान, अब्दुल सत्तार, ओमप्रकाश पोकर्णा, डी. पी. सावंत, प्रा. केशव आराध्ये आदींची प्रमुख उपस्थिती होती. भावसार चौकातील सोनवणे कॉम्प्लेक्सवर रात्री १२ वाजता शेवटची बैठक झाली.