Leading International Marathi News Daily
मंगळवार, २४ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

‘युवक काँग्रेसने आक्रमकपणे प्रचारात उतरावे’
लातूर, २३ मार्च/वार्ताहर

 

लोकसभेच्या निवडणुकीत विरोधकांकडून होणारा अपप्रचार थांबविण्याची आणि त्यांना उघडे पाडून त्यांचा खरा चेहरा जनतेसमोर आणण्याची जबबादारी युवक काँग्रेसवर आहे. कार्यकर्त्यांनी हे काम आक्रमकपणे व प्रभावीपणे करावे, असे आवाहन जिल्ह्य़ाचे पालकमंत्री दिलीप देशमुख यांनी केले.
लोकसभेच्या लातूर मतदारसंघातील काँग्रेसच्या प्रचाराची पूर्वतयारी करण्यासाठी श्री. देशमुख यांनी मागच्या तीन दिवसांपासून विविध संस्था, तसेच पक्षाचे पदाधिकारी, महिला आघाडी यांच्या वेगवेगळ्या बैठका घेतल्या. राहीचंद्र मंगल कार्यालयात काल युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यात श्री. देशमुख बोलत होते. अध्यक्षस्थानी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष त्र्यंबकदास झंवर होते. जिल्हा बँकेचे अध्यक्ष एस. आर. देशमुख, व्यंकट बेंद्रे, जि.प. सभापती टी. एन. कांबळे, मन्मथ किडे, मोईज शेख, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विद्यासागर शेरखाने, विजय देशमुख, सुनीता आरळीकर आदी उपस्थित होते.
श्री. देशमुख म्हणाले की, केंद्र आणि राज्य सरकारने मागच्या पाच वर्षांत घेतलेले निर्णय आणि राबविलेल्या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवून लोकसभा निवडणुकीत मते तर मागायचीच आहेत. परंतु विजय मिळविण्यासाठी विरोधकांचे आक्रमण परतवून लावणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. ही कामगिरी तरुण कार्यकर्ते चांगल्या प्रकारे पार पाडू शकतात.
विरोधकांकडून होणाऱ्या अपप्रचारामुळे बचवात्मक भूमिकेत न जाता त्यांचा हल्ला त्यांच्यावरच उलटविण्याची तयारी ठेवली पाहिजे. अमित देशमुख यांच्या काळातील कामाचे नियोजन चांगले केले आहे. हे नियोजन प्रभावीपणे राबवावे.
या वेळी सर्वश्री. झंवर, एस. आर. देशमुख, उपनगराध्यक्ष मोईज शेख, जीवन सुरवसे, राजासाहेब सवई, अनिल चव्हाण, मारोती पांडे, हृदयनाथ डांगे, हरिभाऊ गोणे, प्रा. धनंजय बेडदे, प्रा. सुधीर अनवले यांचीही भाषणे झाली. प्रास्ताविक विद्यासागर शेरखाने यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. सचिन सूर्यवंशी यांनी केले. श्री. जब्बार पटेल यांनी आभार मानले.