Leading International Marathi News Daily
मंगळवार, २४ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

राखीव जागांची नुसतीच चर्चा; अंमलबजावणी शून्य - ढोबळे
उस्मानाबाद, २३ मार्च/वार्ताहर

 

नेते स्वार्थासाठी सातत्याने राखीव जागांची चर्चा घडवून आणतात. त्याची अंमलबजावणी मात्र होताना दिसत नाही. त्यामुळे समाजातील इतर गंभीर विषयांची कोंडी निर्माण होते. शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि ‘सेझ’सारख्या विषयांवर चर्चा करून पुढाऱ्यांना जाब विचारण्याची गरज असल्याचे मत सामाजिक कार्यकर्ते विष्णू ढोबळे यांनी व्यक्त केले.
लोकप्रतिष्ठान संघटनेने ‘सामाजिक आरक्षणाची गरज’ या विषयावर आयोजित व्याख्यानमालेत श्री. ढोबळे बोलत होते. अध्यक्षस्थानी श्री. सयाजी शिंदे होते.
सवलत आणि राखीव जागा यातील फरक लक्षात घेण्याची गरज आहे, असे सांगून श्री. ढोबळे म्हणाले की, घटनेतील तरतुदीनुसार राखीव जागा मिळूनही अशा घटकांचा फारसा फायदा झाला नाही. नव्याने काही समाज राखीव जागा मागत आहेत. विशेषत: मराठा समाजाला राखीव जागा द्याव्यात, ही मागणी गेल्या दोन-तीन वर्षांत प्रामुख्याने पुढे आली. कोकण आणि विदर्भात पूर्वीच मराठा जातीला ‘कुणबी’ असे नोंदवून इतर मागासवर्गीय सदरात आरक्षण दिले आहे. उर्वरित मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षण मिळण्यास काहीच हरकत नाही. तथापि आरक्षण न देता त्याची चर्चा घडवून आणायची आणि गंभीर विषयाची चर्चाच होऊ द्यायची नाही, हा पुढाऱ्यांचा डाव आहे.
उद्योगांना दिल्या जाणाऱ्या सवलती आरक्षणाचाच भाग नाही का, असा सवाल करीत श्री. ढोबळे म्हणाले की, पिचलेल्या, सामाजिकदृष्टय़ा मागास समाजाला आरक्षण देण्याची गरज आहे. भांडवली अर्थव्यवस्थेत नेते भांडवलदारांचे हस्तक झाले आहेत. त्यामुळे त्यांना आरक्षणाचे फायदे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावेत, असे वाटत नाही. म्हणून नुसतीच राखीव जागांची सातत्याने चर्चा घडवून आणायची आणि मूळ विषयावर चर्चा न करता त्याची कोंडी तयार करायची, अशी रचना निर्माण केली जात आहे. आरक्षणाचा मुद्दा घटनात्मकदृष्टय़ा सातत्याने सामाजिक न्यायाच्या बाजूने होता. हा सामाजिक न्याय संपू नये यासाठी सामाजिक आरक्षणाची गरज आहे.
श्री. शिंदे म्हणाले की, शिक्षणात जातीपातीच्या व्यवस्था घुसलेल्या आहेत. त्याचा लहान मुलांच्या मनावरही परिणाम होतो. त्यामुळे जातीव्यवस्था नष्ट व्हावी यासाठी दुर्बल घटकांसाठी राखीव जागांची गरज आहेच. सवर्णानी समजून घ्यावे आणि नव्या जातीविरहीत समाजरचनेसाठी चळवळी बांधाव्यात.
लोकप्रतिष्ठान संघटनेने जॉन मलेलू चर्चसमोरच्या मैदानात दोन विषयांवर व्याख्याने आयोजित केली होती. व्याख्यानमालेची एक साखळी भगतसिंग पुण्यतिथीनिमित्ताने आयोजित करण्यात आली. महाराष्ट्र दिनीही एका विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संघटनेच्या अध्यक्ष डॉ. स्मिता शहापूरकर यांनी दिली.