Leading International Marathi News Daily
मंगळवार, २४ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

मनसेच्या जिल्हाध्यक्षापाठोपाठ तालुकाध्यक्षालाही हद्दपारीची नोटीस
निलंगा, २३ मार्च/वार्ताहर

 

नगरपालिकेच्या पाणीपुरवठा समि-तीचे सभापती व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष ईश्वर पाटील यांना ‘लातूर, उस्मानाबाद, नांदेड या तीन जिल्ह्य़ांतून हद्दपार का करण्यात येऊ नये?’ अशी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
निलंगा उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाने ही नोटीस बजावली आहे. त्यात म्हटले आहे की, म. न. से. कार्यकर्ता व तालुकाध्यक्ष म्हणून गैरकायदेशीर मार्गाने आंदोलन करून सामान्य जनतेच्या जीवितास व सार्वजनिक मालमत्तेस धोका निर्माण केला आहे. आपल्याविरुद्ध निलंगा पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल झाले आहेत. आपण सतत समाजविघातक कृत्ये करून गुंडगिरी व दादागिरी करता. आपल्या विरोधात शहरात असंतोष वाढला असून अनेक तक्रारींत वाढ होत आहे.
शहर व परिसर राजकीयदृष्टय़ा अतिसंवेदनशील मतदारसंघ असल्याने लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर गुंडगिरी व गैरकायदेशीर कृत्य करण्याच्या वृत्तीमुळे व घडलेल्या घटनेवरून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून आणि शांतता राखण्यासाठी लातूर, उस्मानाबाद व नांदेड या तीन जिल्ह्य़ांतून हद्दपार का करण्यात येऊ नये, अशी विचारणा नोटिशीत करण्यात आली आहे.
सूडबुद्धीने कारवाईचा आरोप
तालुक्यातील विविध कार्यकर्ते-पुढाऱ्यांवर सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, सरकारी अधिकाऱ्यावर हल्ला, दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार विविध गुन्हे दाखल झाले आहेत. त्यांच्यावर कोणतीही नोटीस न बजावता ग्रामीण भागात वेगाने होणारे म. न. से.ची वाढ थांबविण्यासाठी प्रस्थापित राजकीय पक्षांच्या पुढाऱ्यांनी प्रशासनास हाताशी धरून म. न. से.च्या जिल्हाध्यक्ष व तालुकाध्यक्ष यांच्यावर सूडबुद्धीने व हेतुपुरस्सर लक्ष्य करून कारवाई केली जात असल्याचा आरोप पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. नरसिंह भिकाणे यांनी पत्रकार बैठकीत केला. कारणे दाखवा नोटिशीमुळे म. न. से. कार्यकर्त्यांमध्ये असंतोष असल्याचे त्यांनी सांगितले.