Leading International Marathi News Daily
मंगळवार, २४ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

उस्मानाबादमध्ये पंचरात्र महासोमयज्ञ सुरू
उस्मानाबाद, २३ मार्च/वार्ताहर

 

व्रतमध्ये पंचरात्र महासोमयज्ञाच्या प्रधान सवन कार्यक्रमास उस्मानाबाद शहरात प्रारंभ झाला आहे. हा यज्ञ गुढी पाडव्याच्या पहाटेपर्यंत अहोरात्र सुरू राहणार आहे. या यज्ञात भाविकांचा प्रचंड सहभाग मिळत आहे.
प्रधान सवन यज्ञात औषधी रसाचे महाकुंड हवन उभारले जाते. त्यात तूप व औषधी गुण असलेल्या समिधांचे हवन केले जाते. यजुर्वेद व ऋग्वेदातील ऋचा पठणामुळे नैसर्गिक शक्तींना आवाहन केले जाते. त्यामुळे पर्यावरणास पोषक वातावरण निर्मिती होते.
सामवेदिय नियमाप्रमाणे सामगायन केले जाते. त्या सर्व ऋचा निसर्गातील विविध शक्तींची ओळख, गौरव, स्तुती, प्रशंसा करतात आणि त्या निसर्गातील दैवी शक्तीप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा भक्तभाव सामगायनातून विकसित होतो आणि प्रत्यख हवन क्रिया युजर्वेदीय मंत्रांनी होते. अर्थात यजुर्वेदीय मंत्रांच्या माध्यमातून कार्यप्रतिष्ठा, ऋग्वेदीय ऋचा पाठातून ज्ञान प्रतिष्ठा आणि सामवेदीय गायनातून भक्तीप्रतिष्ठा समाजात दृढ करण्याचे कार्य या सवनयागातून होते.
या सवन यागाचे विशेष आकर्षण म्हणजे सवन यागाच्या काळात प्रतिदिन संध्याकाळी ८ वाजेच्या सुमारास आकाशाला भिडणाऱ्या उंच उंच ४० ते ५० फूट महाज्वालाचे दर्शन होते. या दरम्यान दररोज तीन तास सवन होतात. प्रात: सवन, माध्यंदिन सवन आणि तृतीय सवन. गुढीपाडव्याच्या पहाटेपर्यंत अहोरात्र हा प्रधान सवन याग चालणार आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी अवभृथ स्थान होऊन या ऐतिहासिक महासोमयज्ञाची सांगता होणार आहे. भाविकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन यज्ञ समितीच्या वतीने करण्यात आले आहे.