Leading International Marathi News Daily
मंगळवार, २४ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

बसपच्या उमेदवाराकडे लक्ष
बीड, २३ मार्च/वार्ताहर

 

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस गोपीनाथ मुंडे यांच्याविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हा परिषदेचे सदस्य रमेश आडसकर यांची उमेदवारी निश्चित केली आहे. दोन्ही पक्षांच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. क्रांतिसेना व राष्ट्रीय समाज पक्ष यांनीही उमेदवार जाहीर केले. पण सर्वाचे लक्ष लागून असलेला बहुजन समाज पक्षाच्या उमेदवाराचा शोध सुरू असून भारिप-बहुजन महासंघही उमेदवाराच्या शोधात आहे.
लोकसभेच्या बीड मतदारसंघात श्री. मुंडे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने श्री. आडसकर यांची उमेदवारी जाहीर केली नसली तरी परळी वैजनाथ येथे उद्या (मंगळवारी) उमेदवाराच्या घोषणेबरोबरच पक्षाच्या प्रचाराचा प्रारंभही होत आहे. या वेळी प्रदेशाध्यक्ष आर. आर. पाटील, जलसंपदामंत्री अजित पवार यांच्यासह अनेक नेते उपस्थित राहणार आहेत.
प्रमुख दोन्ही पक्षांनी आपले उमेदवार मैदानात उतरविल्यानंतर आता सर्वाचेच लक्ष ब. स. प.च्या उमेदवाराकडे लागले आहे. ब. स. प.च्या नेत्यांनी सुरुवातीला माजी आमदार राजेंद्र जगताप यांच्याशी संपर्क साधला होता. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यामुळे ब. स. प.च्या नेत्यांनी खासदार जयसिंग गायकवाड यांना पक्ष उमेदवारी देणार नसल्याने त्यांच्याशी संपर्क ठेवला.
श्री. गायकवाड ‘हत्ती’वरून राष्ट्रवादी काँग्रेसला आव्हान देतील, अशी अटकळ बांधली गेली. पण त्यांनीही अचानक शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे ब. स. प.चे नेते नव्या उमेदवाराच्या शोधात आहेत.
मागील वर्षभरापासून एका मतदान केंद्रावर १० कार्यकर्त्यांची नियुक्ती करून ब. स. प.ने जिल्ह्य़ात चांगली बांधणी केली आहे. पण निवडणुकीत चेहरा आणि यंत्रणा राबवू शकेल अशी ताकद असणारा उमेदवार नसल्यामुळे इतर पक्षातून उमेदवार आयात करण्यावरच लक्ष केंद्रित केल्याचे दिसून येते. परिणामी इतर पक्षातील कोण नेता ‘हत्ती’वर स्वार होतो याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
भारिप-बहुजन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष हनुमंत उपरे जिल्ह्य़ातील असल्याने तेही पक्षाला उमेदवाराचा शोध घेत आहेत.