Leading International Marathi News Daily
मंगळवार, २४ मार्च २००९
प्रादेशिक

बहुचर्चित नॅनोचे दिमाखदार समारंभात उद्घाटन
मुंबई, २३ मार्च / प्रतिनिधी

बहुचर्चित नॅनोचे आज मरिन ड्राईव्हच्या पारशी जिमखान्यावर आयोजित दिमाखदार समारंभात व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले. भव्य रंगमंचावर तीन श्रेणीतील नॅनो आपले हेडलॅम्प व पार्किंग लॅम्प लावत सर्वाचे लक्ष वेधून घेत अवतीर्ण झाल्या. आणि सुमारे पाच-सहा वर्षांंपूर्वी रतन टाटा यांनी पाहिलेले स्वप्न आज अखेर साकार झाले. जगातील विविध प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी, मुंबईतील अनेक मान्यवर, विविध क्षेत्रातील नामवंत या समारंभाला उपस्थित होते.

माथाडींच्या मेळाव्यातही पवार यांच्यावर भावी पंतप्रधानपदाचे ओझे!
नवी मुंबई, २३ मार्च/प्रतिनिधी

मुंबईतील गिरणी कामगार, गोदी कामगारांच्या जबरदस्त संघटना एकीकडे लयास जात असताना दुसरीकडे माथाडी कामगारांनी महाराष्ट्रभर आपल्या संघटनेचा विस्तार केला. आज राज्यातील सर्वात मोठी कामगार संघटना म्हणून माथाडी संघटनेकडे पहावे लागेल. असे असले तरी गेल्या काही वर्षांत गुंम्ड टोळ्यांच्या मदतीने या कामगारांवर सातत्याने हल्ला होत असून, माथाडींच्या संरक्षणासाठी गृह मंत्रालयाने कठोर पाउले उचलावीत, असा सूचना केंद्रीय कृषीमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज वाशी येथे केली.

अपुऱ्या निधीची तरतूद केल्याने आठ लाख शिक्षकांचे पगार थकित
शालेय शिक्षण व वित्त विभागामध्ये सुसंवादाचा अभाव
मुंबई, २३ मार्च / प्रतिनिधी
राज्य सरकारने मंजूर केलेल्या सुधारित अंदाजपत्रकात शिक्षकांच्या वेतनासाठी अपुऱ्या निधीची तरतूद केली आहे. फेब्रुवारी महिन्यातील वेतन देण्यासाठी तर निधीच उरलेला नाही. त्यामुळे मार्च महिना संपत आला तरी शिक्षकांना फेब्रुवारी महिन्याचा पगार अद्याप मिळाला नसल्याचे शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. सुधारित अंदाजपत्रकात वित्त विभागाने शिक्षकांच्या पगारासाठी ८८१ कोटी ८३ लाख ५९ हजार रूपयांची तरतूद केली आहे.

मालमत्ता कर सुधारणेचा ७० टक्के मुंबईकरांना फायदा
मुंबई, २३ मार्च / प्रतिनिधी

संपूर्ण मुंबईत या पुढे बाजारपेठीय मूल्यावर आधारीत मालमत्ताकर आकारणी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून प्रामुख्याने उपनगरातील लाखो रहिवाशांना या निर्णयामुळे दिलासा मिळणार आहे. त्याच प्रमाणे दक्षिण मुंबईतील मालमत्तांकराची फेररचना करण्यात येणार असली तरी जुन्या चाळातील रहिवाशांना पुढील किमान पाच वर्ष मालमत्ताकरात सवलत मिळणार आहे. मालमत्ताकर वसुलीच्या नियमांत सुधारणा करणाऱ्या एका विधेयकाला विधीमंडळाने नुकतीच मंजूरी दिली आहे.

बीएमएमच्या मराठीकरणाला मंजुरी मिळाल्यानंतरही अंमलबजावणीस टाळाटाळ
मुंबई, २३ मार्च / प्रतिनिधी

मुंबई विद्यापीठाच्यावतीने चालविण्यात येत असलेल्या ‘बॅचलर इन मास मीडिया’ (बीएमएम) या अभ्यासक्रमाच्या मराठीकरणाला विद्वत परिषदेमध्ये मान्यता मिळाली असली तरी या सुधारीत अभ्यासक्रमाला मंजुरी देण्यास टाळाटाळ केली जात आहे. आगामी शैक्षणिक वर्षांपासून हा अभ्यासक्रम सुरू करण्यास विद्वत परिषदेने मान्यता दिली आहे. त्यासाठी सुमारे १६ महाविद्यालयांनी हा अभ्यासक्रम सुरू करण्याची तयारीही दर्शविली आहे.

‘सेन्सेक्स’ने घेतली ४५७ अंशांची महाझेप
मुंबई, २३ मार्च/व्यापार प्रतिनिधी

जगभरात आर्थिक हालहवालाबद्दल निर्माण झालेला आश्वासक सूर आणि परिणामी विदेशी वित्तसंस्थांकडून मिळालेले खरेदीचे पाठबळ यापायी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ‘सेन्सेक्स’ने विलक्षण झेप घेताना , ४५७.३४ अंश अशी वर्षांतील सर्वात मोठी कमाई आज केली. बाजार बंद झाला तेव्हा सेन्सेक्सने ९,४२४.०२ अशा पाच आठवडय़ांपूर्वीच्या पातळीवर पुन्हा झेप घेतली होती. बहुप्रतिक्षित ‘नॅनो’चे लाँचिंग करणाऱ्या टाटा मोटर्सच्या समभागाने आजच्या तेजीत भावात आठ टक्क्यांहून अधिक वाढ नोंदविली.

कसाब आणि न्यायमूर्ती यांच्यातील संभाषण
मुंबई, २३ मार्च / प्रतिनिधी

कसाब आणि न्या. तहलियानी यांच्यातील व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेले संभाषण.
न्या.- नाव काय आहे?
कसाब- मोहम्मद अजमल मोहम्मद अमीर कसाब.
न्या.- कुठला राहणारा आहेस?
कसाब- पाकिस्तान, देश (हसून).
न्या.- कुठून?

पालिकेच्या विविध समित्यांच्या निवडणुकांसाठी चुरस
मुंबई, २३ मार्च / प्रतिनिधी

महानगरपालिकेच्या विविध समित्यांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून सत्ताधारी सेना-भाजपमध्येच समित्यांच्या अध्यक्षपदासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. स्थायी समितीच्या अध्यक्षपदी या वेळी कोणाची वर्णी लागणार या विषयी उत्सुकता आहे. सध्या रवींद्र वायकर स्थायी समितीचे अध्यक्ष आहेत. पालिकेत सेना-भाजपची सत्ता असली तरी स्थायी समिती मात्र कायम सेनेच्याच ताब्यात आहे. पालिकेचे आर्थिक सत्तेचे केंद्र असलेल्या स्थायी समितीवर या वर्षी उद्वव ठाकरे कोणाची वर्णी लावणार, या विषयी सेनेच्या वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरू आहे. शिक्षण, सुधार, बेस्ट, विधी, आरोग्य, महिला बाल कल्याण, स्थापत्य (शहर आणि उपनगरे) आणि प्रभाग समित्यांच्या निवडणुका एप्रिलमध्ये होणार आहेत.

मुंबई विद्यापीठाची अधिसभा अर्थसंकल्पाशिवाय
मुंबई, २३ मार्च / प्रतिनिधी

मुंबई विद्यापीठाची अधिसभा बैठक येत्या २५ मार्च रोजी होणार आहे. मात्र, या बैठकीत अर्थसंकल्प सादर न करता केवळ लेखानुदान मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे. शिवाय कोणताही स्थगन प्रस्तावही मांडण्यात येणार नाही. विद्यापीठाच्या आज झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीमुळे लागू झालेल्या आचारसंहितेच्या पाश्र्वभूमीवर विद्यापीठाने निवडणुक आयोगाला पत्र लिहिले होते. त्यावर आयोगाने केलेल्या सुचनेनुसार व्यवस्थापन परिषदेने हा निर्णय घेतला आहे. अर्थसंकल्पासाठी जून-जुलैमध्ये स्वतंत्र अधिसभा बैठक घेण्यात येईल. विद्यापीठाच्या या निर्णयावर अधिसभा सदस्यांनी मात्र संताप व्यक्त केला आहे. विद्यापीठाने निवडणूक आयोगाला पत्र लिहिण्याची गरजच नव्हती. यापूर्वीही विद्यापीठाने आचारसंहितेच्या काळात अर्थसंकल्प मांडला होता. विविध कारणांवरून विद्यापीठ सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. त्यामुळेच विद्यापीठाने आचारसंहितेचा बागुलबुवा उभा केल्याची नाराजी पराग वेदक यांनी व्यक्त केली आहे.

सफाई मजदूर संघाच्या अध्यक्षपदी मृणाल गोरे
मुंबई, २३ मार्च / प्रतिनिधी

महानगरपालिकेतील सफाई कामगारांची युनियन असलेल्या सफाई मजदूर संघाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ नेत्या मृणाल गोरे यांची निवड करण्यात आली आहे. ही माहिती संघाचे सरचिटणीस उत्तम गाडे यांनी दिली. उत्तम गाडे पूर्वी शरद राव यांच्या युनियनमध्ये कार्यरत होते. मात्र त्यांनी काही प्रश्न उपस्थित केल्यामुळे त्यांचे शरद राव यांच्याशी जमले नाही. तेव्हा गाडे यांनी आपली स्वतंत्र युनियन स्थापन केली. त्यांच्या युनियनला मान्यताही मिळाली आहे. सफाई कामगारांच्या प्रश्नांवर ही युनियन कार्य करणार आहे. संघाच्या उपाध्यक्षपदी दिपक नाकते, खजिनदार म्हणून सुरेश पिंपळकर, चिटणीसपदी जयसिंग गोहिल, सुनील चौहाण, दिलीप अढांगळे यांची निवड करण्यात आली आहे. संघाच्या सर्वसाधारण सभेत मृणाल गोरे यांचे नेतृत्व स्वीकारण्याचा निर्णय घेण्यात आला.

चेंबूर येथे सात मजली इमारतीवर हातोडा
मुंबई, २३ मार्च / प्रतिनिधी

चेंबूर, टिळक नगर येथे एका सात मजली इमारतीवर आज पालिकेने हातोडा चालवला. ही इमारत बेकायदेशीर होती, असे पालिकेचे म्हणणे आहे. इमारत पाडण्याचे काम दोन दिवस चालणार आहे.
टिळक नगर येथे भारत गृहनिर्माण सहकारी संस्थेची एक इमारत आहे. या इमारतीतील ‘ए’ आणि ‘बी’ विंग अधिकृत आहेत. मात्र या इमारतीच्या मालकाने सी विंग बांधण्याचे काम हाती घेतले. गेल्या वर्षी पालिकेने हे काम थांबविण्याची नोटीस दिली होती. मात्र आपल्याकडे म्हाडाची परवानगी आहे, असा दावा मालकाने केला होता. परवानगीची कागदपत्रे सादर करण्यासाठी पालिकेने या मालकाला मुदत दिली होती. मात्र तरीही त्याने कागदपत्रे सादर केली नाहीत, म्हणून आज ही इमारत तोडण्याचा निर्णय घेतला, असे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले. ही कारवाई करण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. तसेच राज्य राखीव दलाची एक तुकडीही तैनात करण्यात आली होती. टिळक नगरचे वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच पालिकेचे अधिकारी घटनास्थळी हजर होते. नगरसेवक राजा चौगुले यांनी या इमारतीबाबत तक्रार केली होती.

पूर्ववैमनस्यातून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर हल्ला
बेलापूर, २३ मार्च/वार्ताहर
पूर्ववैमनस्यातून दिवाळे गावातील एका गुंम्डाने काँग्रेसच्या कार्यकर्त्यांंवर चॉपरने जीवघेणा हल्ला केल्याची घटना आज दुपारी सीबीडी येथे घडली. काँग्रेसने जिल्हाध्यक्ष नामदेव भगत यांच्या जावयाच्या कार्यालयातील रखवालदारास संजय कोळी याने काही दिवसांपूर्वी बेदम मारहाण केली होती. रखवालदाराने मिथुन पाटील यांच्या मदतीने याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार केली. या तक्रारीचा राग मनात ठेवून कोळी याने सहा साथीदारांसह पाटील यांच्या कार्यालयावर सशस्त्र हल्ला केला. या हल्ल्यात नरेश पाटील व चंदन कोळी गंभीर जखमी झाले. मिथुन पाटील हल्ल्यापूर्वी नुकतेच बाहेर गेल्याने या हल्ल्यातून बचावले. याप्रकरणी विशाल पांचाळ याला पोलिसांनी अटक केली असून हप्तेखोरीवरून हा हल्ला झाल्याचे बोलले जाते.

इमारत कोसळून एकजण ठार
मुंबई, २३ मार्च / प्रतिनिधी

सुमारे १०० वर्षे जुनी असलेल्या गिरगाव येथील राणी इमारतीचा काही भाग आज कोसळला. या दुर्घटनेत प्रथमेश चव्हाण (२०) हा तरूण ठार झाला. ही दुर्घटना सायंकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास घडली. म्हाडाच्या वतीने राणी इमारतीच्या दुरूस्तीचे काम चालू होते. हे काम चालू असतानाच इमारतीच्या शौचालयाच्या बाजूचा संपूर्ण भाग आज अचानक कोसळला. त्यात तिसऱ्या माळ्यावर राहणारा प्रथमेश चव्हाण हा ढिगाऱ्याखाली गाडला गेला. रहिवाशांनी त्याला ढिगाऱ्याखालून बाहेर काढून हरकिसनदास रूग्णालयात भरती केले. परंतु, उपचार चालू असतानाच रात्री ८.३० वाजता त्याचे निधन झाले. प्रथमेश हा लाला लजपतराय महाविद्यालयात द्वितीय वर्षांमध्ये शिकत होता. दुर्घटनेनंतर खासदार मोहन रावले व खासदार मिलिंद देवरा यांनी घटनास्थळाला भेट देवून रहिवाशांची विचारपूस केली. या घटनेनंतर इमारतीमधील सर्व रहिवाशांच्या निवासाची तात्पुरती सोय करण्यात आली आहे.