Leading International Marathi News Daily
मंगळवार, २४ मार्च २००९

पालिकेचा शंभर कोटींचा ‘टेट्रा संपर्क प्रकल्प’ वादाच्या भोवऱ्यात
खास प्रतिनिधी

मुंबईकरांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असलेले अनेक प्रकल्प रखडले आहेत, तसेच नागरी कामांचा दर्जा व गती याबाबत जनतेपासून लोकप्रतिनिधींपर्यंत बहुतेक सर्वच जण नाराज असताना महापालिका आयुक्त डॉ. जयराज फाटक यांना मात्र सुमारे १०० कोटी रुपये खर्चाच्या ‘टेट्रा संदेश दळणवळण प्रकल्पा’ला मान्यता मिळविण्याची घाई लागली आहे. या प्रकल्पाच्या आड निवडणूक आचारसंहिता येऊ नये व या कामाला मंजुरी मिळावी अशी मागणी त्यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे. ज्या प्रकल्पाचे काम यंदा पावसाळ्यात पूर्ण होणे शक्य नाही, अशा प्रकल्पासाठी आयुक्त एवढे उतावीळ का, असा सवाल पालिका वर्तुळात करण्यात येत आहे.

पीयूसी सेंटर्सच्या बेबंदशाहीला लगाम
परिवहन विभागाकडून अनेक सेंटर्सचे परवाने निलंबित

प्रतिनिधी

वाहनांमधून बाहर पडणाऱ्या धुरातील प्रदूषणकारी घटकांचे मूल्यमापन करून वाहनधारकांना त्याबाबतचे प्रमाणपत्र देणाऱ्या पीयूसी सेंटर्सच्या बेबंदशाही कारभाराला लगाम लावण्यासाठी परिवहन विभागाने जोरदार मोहीम हाती घेतली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत अनेक पीयूसी सेंटर्सचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. पीयूसी सेंटर्सविरुद्ध वाहनधारकांनी केलेल्या तक्रारींची दखल घेवून परिवहन विभागाने ही मोहीम हाती घेतली आहे.

आवश्यकता नसताना मुलुंड पूर्वेला स्कायवॉकचा घाट..
विकास नाईक

‘एमएमआरडीए’ आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या संगनमतामुळे आवश्यकता नसताना मुलुंड (पूर्व) येथे कोटय़वधी रुपये खर्च करून पोलिसांच्या उपस्थितीत स्कायवॉकचे काम सुरू असल्यामुळे स्थानिक रहिवासी त्रस्त झाले आहेत. स्थानिकांच्या मतांना केराची टोपली दाखविल्यामुळे लोकक्षोभ पराकोटीला गेला असून स्कायवॉक कसा आवश्यक आहे हे मुलुंड (पूर्व)च्या नागरिकांना समजावून सांगण्यासाठी ठेकेदार कंपनी आणि ‘एमएमआरडीए’च्या अधिकाऱ्यांनी एका बैठकीचे आयोजन केले होते.

चित्रमय श्रद्धांजली!
प्रतिनिधी

नोव्हेंबर महिन्यात मुंबईवर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली तसेच ज्यांचे जीवन या हल्ल्यानंतर उद्वस्त झाले त्यांच्या मदतीसाठी मान्यवर तसेच नवोदित चित्रकार नेहरू सेंटर येथे त्यांच्या कलाकृतींचे सामुहिक प्रदर्शन भरवीत असून २४ ते ३० मार्च दरम्यान सकाळी ११ ते संध्याकाळी ७ दरम्यान रसिकांना ते पाहता येणार आहे. या प्रदर्शनात विकल्या गेलेल्या सर्व चित्रांचे उत्पन्न मुंबई हल्ल्यात बाधीत झालेल्या कुटुंबियांच्या मदतीसाठी दिले जाणार आहे.

चक्रव्यूह
आई-वडिलांचे छत्र हरविल्याने पोरकी झालेल्या अस्मितावर (नाव बदलले आहे) तसा कुणाचाच अंकुश नव्हता. या षोडशवर्षीय युवतीचे हे वय कुठेतरी फसण्याचेच. प्रेमात पडण्याचे वा त्याद्वारे आयुष्य उद्ध्वस्त करून घेणारे हे वय. मात्र या सर्वांपासून ती दूर होती. तरीही ती एका वेगळ्याच चक्रव्यूहात अडकली ती आता बाहेर न पडण्यासाठीच!

मुंबईत साकारणार प्रतिवैष्णोदेवी
प्रतिनिधी

जम्मूमधील कटरा येथे वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी जाण्यासाठी किमान सात दिवस सुट्टी घ्यावी लागते. परंतु घडाळ्याच्या काटय़ावर धावणाऱ्या मुंबईतील जीवनात सलग सात दिवस रजा मिळणे अनेकांना कठीण होते. त्यामुळे वैष्णोदेवीच्या दर्शनाची इच्छा केवळ मनातच राहून जाते. मात्र आता मुंबईतील भुलाभाई देसाई मार्गावर प्रतिवैष्णोदेवी मंदिर साकारण्यात येत असल्याने मुंबईकरांना येथेच आदीशक्तीचे दर्शन घेणे शक्य होणार आहे. महालक्ष्मी मंदिराच्या शेजारील धाकलेश्वर मंदिराच्या पुढील बाजूस प्रतिवैष्णोदेवी मंदिर उभारण्यात येणार आहे. तुलसीदास गोपालजी चॅरिटेबल अ‍ॅण्ड टेम्पल ट्रस्ट या संस्थेतर्फे हे मंदिर साकारण्यात येणार आहे. यासाठी ट्रस्टतर्फे वास्तूरचनाकार आणि प्रकल्प सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली आहे. ही जागा मुंबई हेरिटेज कन्झव्‍‌र्हेटिव्ह कमिटीच्या अखत्यारित येत असल्यामुळे वैष्णोदेवी मंदिराची वास्तूरचना या समितीपुढे सादर करण्यात आली आहे. त्यास सदर समितीने मंजुरीही दिली आहे. या वैष्णोदेवी मंदिराचे काम सुरू करण्यापूर्वी पालिकेकडून आवश्यक ती परवानगी घेण्यात येणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.

शरद ना. पाटील यांचा १० एप्रिल रोजी अमृतमहोत्सव
प्रतिनिधी

चेंबूर हायस्कूल, स्वामी मुक्तानंद हायस्कूल, सुभाषनगर आणि कुमूद विद्यामंदिर येथे ३६ वर्षे अध्यापन करणारे अध्यापक शरद ना. पाटील यांचा अमृतमहोत्सव साजरा करण्यात येणार आहे. येत्या १ एप्रिल रोजी पाटील वयाची ७४वर्षे पूर्ण करून ७५व्या वर्षांत पदार्पण करीत आहेत.
शिक्षक म्हणून विशेषत: संस्कृत विषयाची गोडी वाढवून अंत्यत सोप्या भाषेत अध्यापन करणारे पाटील सर चेंबूर, देवनार परिसरात हजारो विद्यार्थी, पालकांत प्रिय आहेत. पाटील ९३ मध्ये सेवानिवृत्त झाले, मात्र आजही ते शाळेत जात असतात. विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी नवनवीन संकल्पना मांडून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी धडपडत असतात. पाटील सराचे असंख्य विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात उत्तम कामगिरी करीत आहेत. पाटील यांचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आलेली आहे. येत्या १० एप्रिल रोजी संध्याकाळी ४ वाजता कुमुद विद्या मंदिर देवनार येथे पाटील यांचे अभिष्टचिंतन करण्यासाठी आजी, माजी विद्यार्थी, पालक, नागरिकांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी पाटील यांना ओळखणाऱ्यांनी निमंत्रणाची वाट न पाहता कार्यक्रमाला उपस्थित राहावे आणि कार्यक्रमाबाबत काही सूचना असतील तर कळवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे. संपर्क- आनंद सांडू- ९८२१०७१९८५, अर्चना म्हापणकर ९८२०२२६३२२, चंद्रकांत जाधव २५५६५६५१, विलास कांबळे-९८९२४४३६४४, अ‍ॅड. सुबोध आचार्य - ९३२२६५०९६९

अंधेरी-घाटकोपर रस्ता : प्रकल्पग्रस्तांवर अन्याय
प्रतिनिधी

अंधेरी -घाटकोपर जोड रस्त्यातील प्रकल्पग्रस्तांवरांची घरे तोडताना त्यांच्यावर अन्याय होत असल्याची तक्रार प्रकल्पग्रस्तांनी केली आहे. आधी ठरविण्यात आलेल्या रेषेच्या आतील बांधकामे तोडण्यात येत आहेत, असे प्रकल्पग्रस्तांचे म्हणणे आहे. अंधेरी घाटकोपर जोड रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. यासाठी असल्फा येथील घरे तोडताना संबंधित अभियंत्याने एमएमआरडीएने आधी ठरविलेली रेषा (आरएल लाइन) ओलांडली असून रेषेच्या आतील बांधकामे तोडली जात आहेत. या ठिकाणच्या एका रहिवाशाने एमएमआरडीएच्या अभियंत्या विरोधात न्यायालयात धाव घेतली होती. त्यामुळे आता हे अधिकारी आकसाने तोडू कारवाई करीत आहेत, असे प्रकल्पग्रस्त समितीचे म्हणणे आहे. याप्रकरणी एमएमआरडीएचे आयुक्त रत्नाकर गायकवाड यांना एक निवेदन देण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. माहितीच्या अधिकाराखाली मिळविलेल्या माहितीनुसार आधीची रेषा न पाळता बांधकामे तोडली जात असल्याचे स्पष्ट होते, असा रहिवाशांचा दावा आहे.