Leading International Marathi News Daily
मंगळवार, २४ मार्च २००९

नगरमध्ये गांधी-कर्डिले, तर शिर्डीत आठवले-वाकचौरे
नगर, २३ मार्च/प्रतिनिधी

मतदारसंघांच्या पुनर्रचनेवर शिक्कामोर्तब झाल्यानंतर याच पाश्र्वभूमीवर गेले सुमारे वर्षभर असलेली अनिश्चितता अखेर आज संपुष्टात आली. नगर लोकसभा मतदारसंघात माजी केंद्रीय राज्यमंत्री दिलीप गांधी (भाजप) विरुद्ध आमदार शिवाजी कर्डिले (राष्ट्रवादी)यांची लढत निश्चित झाली असून शिर्डी लोकसभा मतदारसंघात (अनुसूचित जातींसाठी राखीव) रामदास आठवले (इंदिरा काँग्रेस पुरस्कृत आरपीआय) विरुद्ध भाऊसाहेब वाकचौरे (शिवसेना) अशी लढत अपेक्षित आहे.

प्राथमिक शिक्षण विभागातील अनागोंदीवरून सभेत गदारोळ
बेकायदा सेवावर्ग प्रकरणी कारवाईचे आश्वासन
नगर, २३ मार्च/प्रतिनिधी
प्राथमिक शिक्षण विभागातील अनागोंदीविषयी जिल्हा परिषदेच्या आजच्या सर्वसाधारण सभेत सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत गदारोळ केला. शिक्षकाच्या बेकायदा सेवावर्गाबाबत चर्चा सुरू असतानाच संबंधित शिक्षकावर कारवाई झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा देणारे निवेदन थेट सभागृहातच देऊन एक प्रकारे आव्हान दिले गेल्याने सदस्यांचा भडका उडाला. निवेदन आणून देणारा लिपीक व संबंधित शिक्षकावर आठ दिवसांत कारवाईचे आश्वासन मिळाल्यानंतरच सदस्य शांत झाले.

भोसे खिंडीतून मराठवाडय़ास कुकडीचे पाणी देण्याचा घाट!
संजय काटे
श्रीगोंदे, २३ मार्च

कुकडी धरणाचे पाणी ऐन उन्हाळ्यात भोसे खिंडीतून मराठवाडय़ात नेण्याचा घाट घातला जात आहे. खिंडीजवळील उघडय़ा कालव्यातील काही बांधकामे अपूर्ण असतानाही बायपासद्वारे पुणे, नगर व सोलापूर जिल्ह्य़ांचे हक्काचे पाणी चाचणीसाठी खिंडीतून सीना धरणात सोडण्याचा हा खटाटोप केवळ राजकीय फायद्यासाठी सुरू असल्याचे समजते. उन्हाळी हंगामात या तीन जिल्ह्य़ांना दुसऱ्या आवर्तनात या चाचणीमुळे अडसर येणार असला, तरी मराठवाडय़ातील मतदारांना आकर्षित करण्यासाठी विशिष्ट यंत्रणा राबत असल्याचे समजले.

वटवाघूळ पुराण
श्रीगोंदे येथील महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात व्याख्याता म्हणून कार्यरत असताना माझे तेव्हाचे प्राचार्य पी. ई. शिरसाठ (दादा) यांनी मला विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे काम पाहण्यास सांगितले होते. या केंद्रांतर्गत विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेबद्दल माहिती देणे, मार्गदर्शन करणे व त्यासाठी त्यांना प्रोत्साहित करणे आदी कामे मी व माझे सहकारी करत असू.
सामान्यत पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेले विद्यार्थी या केंद्रात मार्गदर्शनासाठी येत.

लोकसंग्राहक नेते शंकरराव कोल्हे
सन १९६१ ते १९७२ एवढय़ा प्रदीर्घ काळ सहकारी साखर कारखान्यात यशस्वी कार्य केल्यानंतर १९७२ मध्ये शंकरराव कोल्हे अपक्ष उमेदवार म्हणून विधिमंडळात निवडून आले. त्यानंतर त्यांनी सातत्याने कोपरगावच्या जनतेचे प्रतिनिधी म्हणून कार्य केले. आपल्या प्रदीर्घ कार्यामध्ये त्यांनी मंत्रिपद स्वीकारले आणि महाराष्ट्राच्या महसूल मंत्रिपदापर्यंत त्यांनी कार्य करून आपल्या कार्याचा ठसा उमटवला.

असभ्य शेरेबाजी, खडाजंगी, सभात्याग..
जि. प. सभेतील चर्चेवर आचारसंहितेचे सावट
नगर, २३ मार्च/प्रतिनिधी
जिल्हा परिषदेच्या आज झालेल्या सर्वसाधारण सभेतील चर्चा आचारसंहितेच्या सावटाखाली झाली. आचारसंहितेचे कारण देत अध्यक्ष शालिनीताई विखे व मुख्य कार्यकारी अधिकारी राजाराम माने यांनी काही विषयांवरील चर्चा थोपवून धरली, तरीही असभ्य शेरेबाजी, त्यामुळे उडालेली खडाजंगी, भाजपचे बाळासाहेब सोनवणे यांचा सभात्याग, बाराव्या वित्त आयोगाच्या निधीच्या व्याजातून घेतलेल्या कामांचा विषय वेगळ्याच मार्गाने समोर येणे यामुळे सभा गाजली. जिल्हा परिषदेच्या मालकीच्या मोकळ्या जागांवर होत असलेल्या अतिक्रमणांबद्दल सदस्यांनी प्रशासनास धारेवर धरले.

नगरच्या मार्सेला डिसोझा यांना क्योटो जागतिक जल पारितोषिक
नगर, २३ मार्च/प्रतिनिधी

येथील वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट (वॉटर) या स्वयंसेवी संस्थेच्या कार्यकारी संचालिका मार्सेला (मनीषा) डिसोझा यांना ‘क्योटो वर्ल्ड वॉटर ग्रँड प्राईज’ हे सुमारे १४ लाख रुपयांचे मानाचे पारितोषिक मिळाले. इस्तंबूलमधील टर्की येथे झालेल्या पाचव्या जागतिक पाणी परिषदेच्या समारोपप्रसंगी काल हे पारितोषिक प्रदान करण्यात आले. हे पारितोषिक ३० लाख येन (सुमारे २८ हजार अमेरिकन डॉलर) इतक्या रकमेचे आहे. पाणलोटाच्या माध्यमातून तळागाळातील महिलांच्या विकासासाठी श्रीमती डिसोझा यांनी ‘वॉटर’ संस्थेच्या माध्यमातून केलेल्या प्रयत्नांबद्दल त्यांची पारितोषिकासाठी निवड करण्यात आली. दर तीन वर्षांनी हे पारितोषिक दिले जाते. ‘वॉटर’ संस्थेची स्थापना डिसेंबर १९९३मध्ये झाली. या संस्थेच्या माध्यमातून नगर जिल्ह्य़ातील अनेक गावांत, तसेच विविध राज्यांतील अवर्षणग्रस्त भागात पाणलोटाचा, तसेच त्या अनुषंगाने मागास लोकांच्या र्सवकष विकासाची कामे करण्यात येतात. यात महिलांचा सहभाग लक्षणीय आहे. महिला सक्षमीकरणाचे मोठे उद्दिष्ट ‘वॉटर’ने साध्य केले आहे. आपल्याला मिळालेल्या या पारितोषिकाची रक्कम संस्थेचे काम आणखी पुढे नेण्यासाठी वापरण्यात येईल, असे श्रीमती डिसोझा यांनी सांगितले. पारितोषिक वितरणप्रसंगी ‘वॉटर’चे व्यवस्थापकीय संचालक क्रिस्पिनो लोबो उपस्थित होते.

शंकरराव गडाख यांचा आज ‘राष्ट्रवादी’त प्रवेश
नेवासे, २३ मार्च/वार्ताहर
ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या पाठोपाठ त्यांचे पुत्र, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष शंकरराव गडाख व मुळा शिक्षण संस्थेचे सचिव प्रशांत गडाख हजारो समर्थकांसह उद्या (मंगळवारी) ‘राष्ट्रवादी’त प्रवेश करणार आहेत. जलसंपदामंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होणार आहे.प्रदेशाध्यक्ष आर. आर. पाटील, राष्ट्रीय सरचिटणीस गोविंदराव आदिक, पालकमंत्री दिलीप वळसे, वनमंत्री बबनराव पाचपुते, खासदार तुकाराम गडाख, आमदार नरेंद्र घुले आदी या वेळी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात शंकरराव गडाख यांना विधानसभेची उमेदवारी घोषित होण्याचे संकेत आहेत. आमदार गडाख यांच्या ताब्यात मुळा साखर कारखाना, मुळा शिक्षण संस्था, मुळा बाजार, तालुका दूध संघ, पंचायत समिती, बाजार समिती, आपल्या गटाचे जि. प. सदस्य, अनेक ग्रामपंचायती, सेवा संस्था अशी विविध सत्तास्थाने आहेत. मुळा व तालुक्यातीलच ज्ञानेश्वर साखर कारखाना, दोन आमदार, खासदार ‘राष्ट्रवादी’चेच असून, या सर्व सत्ताकेंद्रांमुळे सर्व तालुका आता ‘राष्ट्रवादी’मय झाला आहे. लोकसभेसाठी नेवासे तालुका शिर्डीस जोडला गेला आहे. तसेच पुनर्रचनेत तालुक्याचा स्वतंत्र मतदारसंघ झाला आहे. गडाख पिता-पुत्र व समर्थकांच्या प्रवेशामुळे तालुक्यात ‘राष्ट्रवादी’ची ताकद वाढली आहे.

हरेगावच्या मतमाऊलीस तीर्थक्षेत्र म्हणून मान्यता
श्रीरामपूर, २३ मार्च/प्रतिनिधी

हरेगाव येथील मतमाऊली धार्मिक स्थळास क वर्ग तीर्थक्षेत्र म्हणून मान्यता मिळाली आहे. हरेगावला गेल्या ६० वर्षांपासून मतमाऊली यात्रा साजरी केली जाते. यात्रेस देशभरातून मोठय़ा संख्येने भाविक येतात. तीर्थक्षेत्र विकासांतर्गत भक्तनिवास, स्वच्छतागृह, बगीचा सुधारणा, रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरणासाठी अंदाजे एक क ोटी रुपये खर्च येणार आहे. वरील कामाची अंदाजपत्रके निधी मागणीसाठी मंत्रालयाकडे सादर करण्यात आली आहेत. या संदर्भातील पत्र हरेगावचे बी. आर. चेडे यांना नुकतेच प्राप्त झाले. तीर्थक्षेत्र म्हणून मान्यता मिळाल्यामुळे भक्तांनी आनंद व्यक्त केला.

मालुसरे वस्तीवरील मारहाणीत दाम्पत्य जखमी
शेवगाव, २३ मार्च/वार्ताहर
शहरातील नेवासे रस्त्यावरील धूत जिनिंग, प्रेसिंगच्या मागील बाजूस असलेल्या मालुसरे वस्तीवर अज्ञात चोरटय़ांनी केलेल्या मारहाणीत चांगदेव बाजीराव घोडके व त्यांची पत्नी हिराबाई घोडके हे दाम्पत्य जखमी झाले. ही घटना रविवारी रात्री घडली. या संदर्भात राजू घोडके याने पोलिसांत तक्रार दिली. रविवारी (दि. २२) रात्री तीनच्या सुमारास अज्ञात तीन ते चार व्यक्तींनी आपल्या वस्तीवर येऊन हत्याराने आपल्या आई-वडिलास जबर मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. जखमी दाम्पत्याच्या मुलाचे या महिन्यातील एक तारखेस लग्न झाले. त्याची पत्नी दोनच दिवसांपूर्वी माहेरी गेली असून, घटना घडली त्यावेळी मुलगा बाहेरगावी गेला होता. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक भास्कर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार जे. एन. सय्यद पुढील तपास करीत आहेत.

राज्यस्तरीय रंगभरण स्पर्धेत मढेवडगावच्या विद्यार्थिनींचे यश
श्रीगोंदे, २३ मार्च/वार्ताहर
अखिल महाराष्ट्र राज्य शैक्षणिक कला संघाच्या (जळगाव) वतीने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय रंगभरण स्पर्धेत मढेवडगाव येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या सहा विद्यार्थिनींनी गुणवत्ता पुरस्कार पटकाविले. राज्यभरातून या स्पर्धेसाठी विद्यार्थी सहभागी झाले होते. स्पर्धेतील ५१ विद्यार्थ्यांना गुणवत्ता पुरस्कार जाहीर झाले. त्यातील मढेवडगाव विद्यालयातील तेजश्री देवीदास जाधव, निलोफर महंमदशकुर खान, मोनिका बाळासाहेब मांडे, प्रेरणा राजाराम गोरे, प्रियंका सुभाष सरोदे व स्नेहल तुकाराम कुरुमकर यांनी हे गुणवत्ता पुरस्कार मिळविले. राज्यात एकाच विद्यालयातील सहा विद्यार्थिनींनी पुरस्कार मिळविणारे हे एकमेव विद्यालय आहे. विद्यालयाचे तत्कालीन मुख्याध्यापक के. एम. टापरे व कला शिक्षक डी. डी. तुपे यांना उपक्रमशील पुरस्कार जाहीर झाला. या दोन शिक्षकांव्यतिरिक्त ए. पी. काशीद, एस. एस. शिंदे या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. मुख्याध्यापक चंद्रकांत लंके व ग्रामस्थांनी अभिनंदन केले.

शिवमहापुराण कथा ज्ञानयज्ञ आजपासून
राहुरी, २३ मार्च/वार्ताहर
वांबोरी येथे राष्ट्रीय संत इंद्रदेवमहाराज यांचा शिवमहापुराण कथा ज्ञानयज्ञ व शिवयाग सोहळा उद्यापासून (दि. २४) सुरू होत असून, तो दि. ३०पर्यंत चालणार आहे. येथील श्रीवृद्धेश्वर सेवा मंडळाने हा कार्यक्रम आयोजित केला आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती (वांबोरी) येथे सायंकाळी ५ ते ९ या वेळेत कार्यक्रम होईल. तसेच शिवयाग यज्ञाचे प्रधानाचार्य श्री. शेखर गुरू वांबोरीकर यांच्या उपस्थितीत सकाळी ९ ते १२ या वेळेत शिवयाग यज्ञ होणार आहे. या शिवयाग यज्ञात वांबोरी व परिसरातील भाविक सहभागी होणार आहेत. कार्यक्रमाचा समारोप दि.३१ रोजी जंगलेमहाराज शास्त्री (डोंगरगण) यांच्या काल्याच्या कीर्तनाने होईल. पंढरीनाथमहाराज उंबरेकर, कर्नल अमरसिंह सावंत (नगर), चंद्रकांत कमलापूरकर (नगर) यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन होईल.

हरेगावच्या मतमाऊलीस तीर्थक्षेत्र म्हणून मान्यता
श्रीरामपूर, २३ मार्च/प्रतिनिधी

हरेगाव येथील मतमाऊली धार्मिक स्थळास क वर्ग तीर्थक्षेत्र म्हणून मान्यता मिळाली आहे. हरेगावला गेल्या ६० वर्षांपासून मतमाऊली यात्रा साजरी केली जाते. यात्रेस देशभरातून मोठय़ा संख्येने भाविक येतात. तीर्थक्षेत्र विकासांतर्गत भक्तनिवास, स्वच्छतागृह, बगीचा सुधारणा, रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरणासाठी अंदाजे एक कोटी रुपये खर्च येणार आहे. वरील कामाची अंदाजपत्रके निधी मागणीसाठी मंत्रालयाकडे सादर करण्यात आली आहेत. या संदर्भातील पत्र हरेगावचे बी. आर. चेडे यांना नुकतेच प्राप्त झाले. तीर्थक्षेत्र म्हणून मान्यता मिळाल्यामुळे भक्तांनी आनंद व्यक्त केला.

समाजातील श्रमजिवींचा ‘रोटरी सेंट्रल’तर्फे सन्मान
नगर, २३ मार्च/प्रतिनिधी
प्रामाणिकपणा, साधेपणा ही जीवनमूल्ये कालबाह्य़ होण्याचा धोका वाढत असताना संस्कृती जतन करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन आकाशवाणीचे सहायक केंद्र संचालक गोपाळ अवटी यांनी केले. रोटरी क्लब ऑफ अहमदनगर सेंट्रलच्या २०व्या वर्धापनदिनानिमित्त रस्त्यावर काम करणारे कारागीर व श्रमजिवी व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी अवटी बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून रोटरीचे उपप्रांतपाल डॉ. रवींद्र साताळकर, नियोजित प्रांतपाल शिरीष रायते, सेंट्रलचे अध्यक्ष राजेश परदेशी, सचिव निर्मल गांधी उपस्थित होते. परदेशी यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन गौरी जोशी यांनी केले. परिचय विनोद बोरा यांनी केला. आभार निर्मल गांधी यांनी मानले.

राहुरीत वकिलांच्या बहिष्कारामुळे न्यायालयाचे कामकाज ठप्प
देवळाली प्रवरा, २३ मार्च/वार्ताहर
राहुरीचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी स. र. ताठे यांच्यावर कारवाई करून त्यांची बदली करावी, यासाठी तालुका वकील संघटनेने बहिष्कार टाकल्याने न्यायालयाचे कामकाज होऊ शकले नाही. मात्र, सहदिवाणी न्यायाधीश डी. एस. खेडेकर यांचे कामकाज चालू होते. या संदर्भात जिल्हा न्यायाधीशांनी चौकशीसाठी पाठवलेल्या अतिरिक्त न्यायाधीश तिवलीकर यांनी आज राहुरीतील न्यायालयातील बाररूममध्ये वकील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली. त्या वेळी वकिलांनी न्यायाधीश ताठे यांच्याविरोधात गंभीर तक्रारी केल्या. नंतर तिवलीकर यांनी ताठे यांच्याशी स्वतंत्र चर्चा केली. तालुका बार असोसिएशनने महाराष्ट्र व गोवा बार असोसिएशनला ताठे यांच्या विरोधात फॅक्स पाठवला होता. त्यामुळे असोसिएशनने आज वकील चांगदेव डुबे यांना राहुरीला पाठवले. डुबे यांनी वकील संघटनेशी चर्चा केली. जोपर्यंत ताठे यांची बदली होत नाही. तोपर्यंत बहिष्कार चालूच राहील, असा निर्धार वकिलांनी व्यक्त केला.

बलात्काराच्या अफवेमुळे पोलिसांची धावपळ
नगर, २३ मार्च/प्रतिनिधी
चांदबिबी महाल परिसरात तरुणीवर बलात्कार झाल्याच्या अफवेने आज नगर तालुका पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली. पोलीस पथक तातडीने तेथे पोहोचले, परंतु असा प्रकार घडलाच नव्हता. चांदबिबी महाल परिसरात एका तरुणीवर दुपारी बलात्कार झाल्याचा दूरध्वनी नगर तालुका पोलिसांना आला. उपनिरीक्षक रजपूत लगेच पथकासह तेथे गेले. त्यांनी परिसर पिंजून काढला. परंतु कोणीच आढळले नाही. पोलीस आता दूरध्वनी करणाऱ्याचा शोध घेत आहेत.चांदबिबी महाल हे पर्यटनस्थळ असल्याने तेथे पर्यटकांची नेहमी ये-जा असते. सुट्टीच्या दिवशी तेथे गर्दी असते. हा परिसर निवांत असल्याने प्रेमीयुगूल येत असतात. त्यामुळे या भागात गैरप्रकार वाढले असल्याच्या तक्रारी आहेत.

पुण्याच्या सीटी क्लबला प्रेसिडेंट फुटबॉल करंडक
नगर, २३ मार्च/प्रतिनिधी
कॅन्टोन्मेंट बोर्ड व जिल्हा फुटबॉल संघटनेच्या वतीने किल्ला मैदानावर नुकत्याच घेण्यात आलेल्या प्रेसिडेंट चषक २००९ फुटबॉल स्पर्धेत पुण्याचा सीटी क्लब अजिंक्य ठरला. अंतिम सामन्यात या संघाने महाराष्ट्र पोलिसांना पराभूत केले. पुरस्कार वितरण समारंभ कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडिअर चंद्रमुकेश, सदर्न कमांड डिफेन्स इस्टेटचे उपसंचालक राजेंद्र जगताप, मुख्य कार्यकारी अधिकारी आर. पी. भेगडे, डॉ. प्रकाश कांकरिया, व्ही. एल. अ‍ॅबट, रिश्पालसिंह परमार, गॉडविन डिक, सुनील पतके, प्रकाश फुलारी, कलीम शेख आदींच्या उपस्थितीत झाले. अंतिम सामन्याच्या वेळी पंच म्हणून भूपेंद्रसिंह, जावेद इराणी, गोपीचंद परदेशी, रमेश परदेशी यांनी काम पाहिले. सामन्याचे धावते वर्णन व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरविंद कुडिया व रोहित परदेशी यांनी केले.

कळसपिंप्री मारामारीतील तीन महिला आरोपी शरण
नगर, २३ मार्च/प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील कळसपिंप्री गावाजवळ झालेल्या मारामारी प्रकरणातील तीन महिला आरोपी आज न्यायालयात शरण आल्या. त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली.
जिल्हा न्यायाधीश आर. आर. कदम यांच्यासमोर या आरोपी हजर झाल्या. सुनावणीनंतर न्यायालयाने मंगल भाऊसाहेब भवार (वय ३२), श्यामाबाई सुधाकर भवार (५५), लीलाबाई नवनाथ भवार (३५) यांना न्यायालयीन कोठडी दिली. गेल्या वर्षी हा मारामारीचा प्रकार घडला होता. रामेश्वर दगडू मुखेकर यांनी फिर्याद दिली होती. ते आपल्या शेतात काम करत असताना शेतीच्या वादावरून नऊजणांनी त्यांच्यावर व त्यांच्या कुटुंबीयांवर हल्ला केला. त्यांच्यावर तलवारीने वार करण्यात आले होते. यातील वरील महिला आरोपींनी अटकपूर्व जामिनासाठी उच्च व सर्वोच्च न्यायालयात अर्ज केले होते. परंतु ते फेटाळण्यात आल्याने त्यांना शेवटी शरण यावे लागले.

पाणी पिण्याच्या बहाण्याने मंगळसूत्र लांबविले
नगर, २३ मार्च/प्रतिनिधी
पाणी पिण्याच्या बहाण्याने घरात आलेल्या महिलेने तीन हजार रुपयांचे मंगळसूत्र लांबविले. या प्रकरणी तोफखाना ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सचिन बबन कणगरे (२९ वर्षे, रा. भारस्कर कॉलनी) यांनी फिर्याद दिली आहे. कणगरे यांच्या घरात पाणी पिण्यासाठी लंका रोहिदास खुडे ही महिला आली. भांडय़ांच्या फडताळात ठेवलेले मणिमंगळसूत्र तिने लांबविले, अशी कणगरे यांची तक्रार आहे.

खडकीतील दारूअड्डय़ावर छापा; कच्चे रसायन जप्त
नगर, २३ मार्च/प्रतिनिधी
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने काल संध्याकाळी खडकी येथे छापा घालून ४ हजार ४०० रुपयांचे दारूचे कच्चे रसायन जप्त केले. या प्रकरणी संजय सूर्यभान पवार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. खडकी शिवारात गावठी दारूचा अड्डा सुरू असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी हा छापा घातला. अड्डा चालवणारा संजय पवार मात्र पसार झाला. उपनिरीक्षक गोविंद आधटराव, हवालदार गायकवाड, अरुण घोडके, सुनील चव्हाण, दीपक हराळ, जाकीर कुरेशी यांनी ही कारवाई केली.

छबूताई देशमुख यांचे निधन
राजूर, २३ मार्च/वार्ताहर

येथील सामाजिक कार्यकर्त्यां छबूताई सुराजी देशमुख यांचे आज दुपारी २ वाजता ८२व्या वर्षी निधन झाले. त्यांच्यामागे २ मुले, ३ मुली, नातवंडे असा परिवार आहे. सहकारी संस्थेचे अध्यक्ष सीताराम पाटील देशमुख यांच्या मातु:श्री व आमदार मधुकरराव पिचड यांच्या चुलती होत. त्या ‘ताईआजी’ या नावाने परिचित होत्या. आमदार पिचड म्हणाले की, ताई आदिवासी समाजाची नव्हे, तर राजूर भागातील सर्वाची समाजमाता होती. अंत्यसंस्कारावेळी हेमलता पिचड, काशिनाथ साबळे, यमाजी लहामटे, बापूसाहेब देशमुख, शशिकांत आहेर, मंजुषा काळे आदी उपस्थित होते.