Leading International Marathi News Daily
मंगळवार, २४ मार्च २००९

‘अमृताची पाच बोटे’ नववर्षांच्या आगमनाप्रित्यर्थ महाल नागरिक मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘अमृताची पाच बोटे’ या सुमधूर गीतांच्या कार्यक्रमात उजवीकडून सुप्रसिद्ध गायक व संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर, राधा मंगेशकर, रवींद्र साठे, सुवर्णा माटेगावकर आणि उगवती गायिका केतकी माटेगावकर.

पहिल्या दिवशी प्रकाश आंबेडकर, प्रताप जाधव यांचे अर्ज
लोकसभा निवडणूक

नागपूर, २३ मार्च/ प्रतिनिधी

पंधराव्या लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाच्या पहिल्या टप्प्याची अधिसूचना जारी होताच सोमवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली. आज पहिल्या दिवशी अकोल्यातून भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर आणि बुलढाण्यातून शिवसेनेचे आमदार प्रतापराव जाधव या दोन प्रमुख उमेदवारांसह विदर्भात एकूण पाच उमेदवारांनी अर्ज दाखल केले.

उन्हाच्या तडाख्यात गॉगल्सचा दिलासा
नागपूर, २३ मार्च / प्रतिनिधी

उन्हाचा तडाखा व रस्त्यावरील धुळीपासून बचावासाठी दुचाकी वाहन चालकांना किमान उन्हाळ्याततरी गॉगलची आवश्यकता भासते. त्यामुळे उन्हाळ्याची चाहूल लागताच शहरातील विविध भागात गॉगल्सची दुकाने थाटली आहेत. उन्हाचा तडाखा जसा वाढतो आहे, तशी गॉगल्सची विक्री मोठय़ा प्रमाणात होत असताना दिसून येत आहे. गॉगल वापरणे ही इतर वेळा फॅशन असली तरी उन्हाळ्यात ती निकड राहते.उन्हाळ्यात डोळ्यांना त्रास होऊ नये म्हणून गॉगल्सची मागणी वाढत असल्यामुळे शहरात गॉगल्सचे विक्रेते मुख्य मार्गाने दिसतात.

मुख्यमंत्र्यांच्या मेळाव्यातील मंत्र्यांच्या अनुपस्थितीचे प्रकरण तापू लागले
नागपूर, २३ मार्च / प्रतिनिधी

नागपूरच्या उमेदवारीवरून असंतोष; मुख्यमंत्र्यांची कबुली
उमेदवार पराभूत झाल्यास संबंधितांवर कारवाई -प्रदेशाध्यक्ष
काँग्रेसचे नागपूरमधील संभाव्य उमेदवार केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार आणि रामटेक लोकसभा मतदारसंघातील संभाव्य उमेदवार राष्ट्रीय सरचिटणीस मुकुल वासनिक यांच्या प्रचारार्थ रविवारी आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्याकडे पाठ फिरवणाऱ्या आजी-माजी मंत्र्यांच्या अनुपस्थितीचे प्रकरण तापू लागले आहे.

सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने रेल्वे खोळंबल्या, प्रवासी संतप्त
नागपूर, २३ मार्च/ प्रतिनिधी

चार गाडय़ांच्या वेळा बदलल्या
नागपूर-पुणे गाडीचा ३ तास खोळंबा
नागपूरच्या मुख्य रेल्वे स्थानकावरील सिग्नल यंत्रणेत (रुट रिले सिग्नल) आज सायंकाळी अचानक बिघाड झाल्याने नागपूरहून जाणाऱ्या आणि नागपूरला येणाऱ्या अनेक रेल्वे स्थानकाबाहेरच खोळंबल्या. या गोंधळामुळे चार गाडय़ांच्या वेळापत्रकात बदल करून त्या निर्धारित वेळेपेक्षा उशिरा सोडण्यात आल्या.

बांधकाम खात्याच्या लाचखोर महिला अभियंत्यास अटक
नागपूर, २३ मार्च / प्रतिनिधी

एका कंत्राटदाराकडून दीड हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी केंद्रीय सार्वजनिक बांधकाम खात्याच्या एका महिला कनिष्ठ अभियंत्याला सीबीआयच्या पथकाने सोमवारी पकडले.
अरुणकुमार या कंत्राटदाराचे केंद्रीय सार्वजनिक बांधकाम खात्यात १८ हजार रुपयांचे देयक मंजूर झाले. मात्र, ही रक्कम त्यांना मिळत नव्हती. त्यासाठी त्यांनी काटोल मार्गावरील ‘सीपीडब्लूडी’च्या कार्यालयातील कनिष्ठ अभियंता मनीषा हेडाऊ यांची भेट घेतली. या रकमेचा धनादेश हवा असेल तर दहा टक्के म्हणजे १ हजार ८०० रुपये द्यावे लागतील, अशी मागणी त्यांनी केली. मात्र, दीड हजार रुपये घेऊन त्यांनी सोमवारी दुपारी कार्यालयात बोलावले. अरुणकुमार यांनी ‘सीबीआय’चे कार्यालय गाठून तक्रार केली. या तक्रारीवरून ‘सीबीआय’चे पोलीस निरीक्षक राजविक्रम ऋषी, आर.एच. कुजूर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सापळा रचला. अरुणकुमार यांच्याकडून दीड हजार रुपये स्वीकारताच मनीषा हेडाऊ यांना या पथकाने पकडले.

मतदार ओळखपत्रावरील फोटो : चर्चेचा विषय
ब्रह्मपुरी, २३ मार्च / वार्ताहर

पंधराव्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघात निवडणूक आयोगाच्यावतीने देण्यात आलेल्या ओळखपत्रांवरील छायाचित्र त्याच मतदाराचे आहे किंवा नाही, हा येथे एक चर्चेचा विषय झाला आहे. निवडणुकीची पूर्वतयारी म्हणून मतदारांना आयोगाकडून ओळखपत्राचे वितरण करण्यात येत आहे. ब्रह्मपुरी मतदारसंघातदेखील त्याची जोरदार तयारी सुरू आहे. पण ज्या यंत्रणेकडे फोटो काढण्याचे कंत्राट देण्यात आले आहे, ती यंत्रणा केवळ यांत्रिकपणे त्यांचे काम करीत आहे. फोटो योग्य की अयोग्य, याची काळजी घेण्याची तयारी नसल्याचे एकूण चित्र आहे. त्यामुळे मतदारांमध्ये नाराजी पसरली आहे.अधिकृत सूत्रानुसार येथील फोटोचे कंत्राट जिल्हा सेतू विभागाच्यावतीने नागपूर येथील चौरसिया नावाच्या कंत्राटदाराला देण्यात आले आहे. मात्र फोटो काढणाऱ्या यंत्रणेतच बिघाड असल्याने फोटो कसे चांगले निघणार असा प्रश्न चर्चिला जात आहे. या संदर्भात ब्रह्मपुरी मतदारसंघातील निवडणूक अधिकारी बोरकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत काहीही बोलण्यास नकार दिला. छायाचित्राबाबत शंका घेऊन मतदान अधिकारी मतदानाचा हक्क नाकारतील की काय, अशी शंका मतदारांना वाटत आहे.

मते मिळाली नाहीत तरी चालेल -मोरारजी देसाई
आठवणी निवडणुकीच्या
भंडारा, २३ मार्च / वार्ताहर

निवडणूक प्रचारातील भाषणे बहुतेक आर्जवाची असतात. १९७९ च्या भंडारा लोकसभा मतदारसंघाकरिता भंडारा येथे प्रचाराला आलेले व रोखठोक बोललेले माजी पंतप्रधान मोरारजी देसाई काहींना तत्त्वनिष्ठ तर काहींना तऱ्हेवाईक वाटले. दि. १४ डिसेंबर १९७९ ला भर थंडीत सकाळी भंडारा येथील चिचबन मैदानावर मोरारजी देसाई यांची सभा होती. सभेला उपस्थिती प्रचंड होती, परंतु वेळेची सवय नसल्यामुळे शेवटपर्यंत श्रोत्यांचे लोंढे येतच होते. मोरारजी अगदी ठरल्या वेळेवर आले आणि भाषणाला प्रारंभ केला. तत्पूर्वी मोरारजी भंडारा विश्रामगृहात असताना श्रीमती नागदेवे त्यांच्या महिला कार्यकर्त्यांसह मोरारजींना भेटल्या. त्यांनी गराडा घालून मोरारजींना रोखलेच आणि ‘जयभीम’ म्हणण्यास सांगितले. स्पष्टवक्ते मोरारजी म्हणाले, मी जय राम म्हणेन, जय भारत म्हणेन पण, जय भीम म्हणणार नाही. कोणत्याही व्यक्तीचा आग्रहास्तव जयजयकार करणार नाही. महात्मा गांधींची जय देखील म्हणणार नाही, असे मोरारजी रोखठोकपणे म्हणाले. याचा निवडणुकीवर परिणाम होईल, असे सांगता मोरारजी म्हणाले: मला निवडणुकीची तुमच्यापेक्षा अधिक काळजी आहे. विदर्भाच्या प्रश्नाबाबत गजाननराव रंभाड यांनी लहान राज्य म्हणून विदर्भाचा विचार व्हावा असे म्हणता, मी लहान राज्यांच्या विरुद्ध आहे, असे मोरारजींनी स्पष्ट शब्दात ठासून सांगितले. मोठय़ा राज्याचे लोक मोठे असतात, पुढारी पण तेथील असतात. छोटय़ा राज्यासाठी मत देणार असाल तर तुमची मते नकोत, असे सांगण्यासही त्यांनी कमी केले नाही.

भवरलाल मालू स्मृतीप्रित्यर्थ पॅथॉलॉजीचे उद्घाटन
नागपूर, २३ मार्च / प्रतिनिधी

दिवं. बद्रीनारायण मनियार स्मृतीप्रित्यर्थ श्री माहेश्वरी युवक संघ सार्वजनिक दवाखान्याच्या नामफलकाचे अनावरण व दिवं. भवरलाल मालू यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पॅथॉलॉजीचे उद्घाटन रविवार, डॉ. राजेश अटल व स्वाती अटल यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बडी मारवाड पंचायतचे अध्यक्ष राधेश्याम सारडा होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध उद्योगपती श्रीकांत सारडा, बालकिशन मनियार, वासुदेव मालू उपस्थित होते. कृषी उत्पन्न बाजारसमितीचे माजी अध्यक्ष द्वारकाप्रसाद कांकानी, व्यंकटेश देवस्थान ट्रस्टचे सचिव गोविंदलाल सारडा, ब्रजकिशोर मनियार, विनोद माहेश्वरी, रमेश रांधड, श्रीनिवास कांकानी, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन नंदकिशोर काबरा यांनी केले. अरूण सारडा यांनी आभार मानले.

अग्निशिखा महिला कर्तृत्व गौरव पुरस्काराने २१ महिला सन्मानित
नागपूर, २३ मार्च / प्रतिनिधी

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून प्रतिकूल परिस्थितीत तळागाळातील लोकांच्या सर्वागिण विकासाची अग्निशिखा प्रज्वलित करणाऱ्या २१ महिलांना ‘अग्निशिखा महिला कर्तृत्व गौरव पुरस्कार २००९’ ने सन्मानित करण्यात आले. मातृसेवा संघाच्या रंजन सभागृहात शनिवार, २१ मार्चला संस्थेच्या अध्यक्ष विजयालक्ष्मी दिवाळे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आंतरराष्ट्रीय ख्यातीचे स्वयंरोजगार प्रशिक्षक डॉ. झाकीर हुसेन व कवी ज्ञानेश वाकूडकर उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. झाकीर हुसेन यांनी महिलांना स्वयंरोजगाराच्या म्हणजेच आत्मनिर्भरता, आत्मप्रतिष्ठा तसेच समतेच्या हक्कासाठी जागृत केले. ज्ञानेश वाकूडकर यांनीही महिलांचे प्रबोधन केले. अग्निशिखाच्या या पुरस्काराने अलंकृत झालेल्यांमध्ये सुलभाक्षी शिरसाट, परवीन अफजल, विद्या बोरकर, मिनाक्षी दीक्षित, विशाखा राव-जठार यांचा समावेश होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मीरा घटवाई यांनी केले. अॅड. वैजयंती डोणगावकर यांनी आभार मानले.

‘कोशीश’चे उपक्रम सुरूच राहतील -देशमुख
नागपूर, २३ मार्च / प्रतिनिधी

कोशीश फाउंडेशनच्या माध्यमातून आजपर्यंत शहरात वयोवृद्ध, निराधार, गरजू, व जनसामान्यांकरिता अनेक शिबिरे घेण्यात आली आहेत. यापुढेही हे उपक्रम सुरूच राहील, अशी माहिती कोशीश फाउंडेशनचे अध्यक्ष सलील देशमुख यांनी दिली. धरमपेठेतील दुर्गामाता मंदिरात कोशीश फाउंडेशन, अखिल भारतीय वाल्मिकी सभा व महात्मे नेत्रपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नेत्रतपासणी शिबिरात ते बोलत होते. शिबिरात महाराष्ट्र प्रदेश अखिल भारतीय वाल्मिकी सभेचे अध्यक्ष सुरजीतसिंह चव्हाण, सुनिल हिरणवार, महात्मे नेत्र पेढीचे डॉ. घोरपडे, मोहन खराबे, सचिन बादल उपस्थित होते. भविष्यातसुद्धा असेच समाजोपयोगी कार्य सुरू राहील, असे देशमुख म्हणाले. या शिबिरात दोन हजाराहूनअधिक नागरिकांची तपासणी करण्यात आली तर, ६४७ नागरिकांना चष्मे देण्यात आले. येत्या २९ मार्चला पांढराबोडी येथे नेत्रशिबीर आयोजित करण्यात आल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. नेत्रशिबिराकरिता योगेश ठाकरे, विनय शुक्ला, सचिन मोहोड, सचिन निघुट, पवन अग्रवाल, हेमंत चौरसिया, रोशन गवरे, मनिष हिरणवार, शिव गवरे, आशिष मेश्राम, प्रदीप नेवारे आदींनी सहकार्य केले.

न्यू इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वास्तूचे उद्घाटन
उमरेड, २३ मार्च / वार्ताहर

न्यू इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने नवीन वास्तूचे वास्तूपूजन व उद्घाटन सोहोळा नुकताच झाला. याप्रसंगी गोविंदराव वासुरकर स्मृती रोग निदान केंद्र व डॉ. गंगाधर मेहेर सभागृहाचे उद्घाटन करण्यात आले. वास्तुपूजन डॉ. डी.बी. मुद्गल यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी डॉ. श्रावण पराते होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. अरुण पावडे, डॉ. कुलकर्णी, डॉ. शशिकांत जायस्वाल, डॉ. के.बी. सुरकर, डॉ. प्रदीप बाकडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. कुलकर्णी यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाद्वारे करण्यात आले.या कार्यक्रमात रामभाऊ वासुरकर, डॉ. गंगाधर मेहेर, पुरुषोत्तम भिवापूरकर, दिलीप पलांदुरकर, कानजी वेगड, पी.एन. गांधी, एस. एन. पनपालिया यांचा सत्कार करण्यात आला. संचालन अल्का रेवतकर व डॉ. सतीश वंजारी यांनी केले तर आभार डॉ. बाकडे यांनी मानले.

इंटेरियर डिझाईनिंगच्या प्रदर्शनाचे उद्घाटन
नागपूर, २३ मार्च/प्रतिनिधी

इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियन इंटेरियर डिझायनरतर्फे जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीमध्ये तीन दिवसाच्या प्रदर्शनाचे खासदार विजय दर्डा यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या प्रदर्शनात राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या छायाचित्रांचा समावेश करण्यात आला. यावेळी विजय दर्डा म्हणाले, निर्माण ही कला असून त्याचे महत्त्व वाढले आहे. नागपूर प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत असून देशात नागपूरची एक वेगळी ओळख इंटेरियर डिझाईनिंगद्वारे निर्माण होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यामुळे अशाप्रकारच्या प्रदर्शनांचे वेळोवेळी आयोजन होणे काळाची गरज असल्याचे दर्डा यांनी सांगितले. प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी काँग्रेसचे शहराध्यक्ष जयप्रकाश गुप्ता, नंदकिशोर मानकर, सुप्रसिद्ध इंटेरियर डिझाईनर हबीब खान, संस्थेचे अध्यक्ष महेश मोखा, सचिव किशोर चिद्दरवार, प्रकाश बेतावार, पूजा पाठक, प्रार्थना नांगिया, शिबू मेथो, हरीश चंदानी, त्रिलोक ठाकरे आदी मान्यवर उपस्थित होते.

निवेदिता भिडे यांची आठवडाभर प्रवचने
नागपूर, २३ मार्च / प्रतिनिधी

श्रीराम नवमीनिमित्त धंतोलीतील देवी अहल्याबाई स्मारक समितीतर्फे २७ मार्च ते २ एप्रिल दरम्यान विवेकानंद केंद्र कन्याकुमारीच्या निवेदिता भिडे यांची प्रवचने आयोजित करण्यात आली आहेत. ‘धर्मपालनाकरिता आजच्या युगात रामायण’ या विषयावर आयोजित करण्यात आलेली प्रवचने रामनवमीपर्यंत दररोज सायंकाळी ६.३० ते ८ या वेळेत होणार आहेत. वंदनीय मावशी केळकर यांच्या प्रेरणने सुरू झालेल्या श्रीराम जन्मोत्सवाचे यंदा ४३ वे वर्ष आहे. रामनवमीला जन्मोत्सवाचे कीर्तन गौरी पत्की करणार आहेत. ९ एप्रिलला हनुमान जन्माचे कीर्तन बालकीर्तनकार सुश्रृत रानडे करणार आहे. निवेदिता भिडे मूळच्या विदर्भातील वर्धेच्या आहेत. १९७७ मध्ये कन्याकुमारीमधील विवेकानंद केंद्रात त्यांनी काम सुरू केले. सध्या त्या केंद्राच्या अखिल भारतीय उपाध्यक्ष आहेत. जीवनव्रतींना प्रशिक्षित करणाऱ्या विवेकानंद केंद्र कल्चरल इन्स्टिटय़ूटच्या त्या समन्वयक आहेत. १९७८ ते ८५ पर्यंत तामिळनाडूतील चार जिल्ह्य़ांमध्ये खेडय़ात ग्रामीण विकासाचे काम त्यांनी केले आहे.

योग शिक्षकांकरिता प्रशिक्षण शिबीर
नागपूर, २३ मार्च / प्रतिनिधी

पतंजली योग समितीच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात नवीन सहाय्यक योग शिक्षकांकरिता एक महिन्याचे प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या प्रशिक्षण शिबिरात वरिष्ठ योगतज्ज्ञ मनोहर नरेटे यांनी, योगशिक्षकांना योगदर्शन, अष्टांगयोग, प्राणायाम रहस्य, योगचिकित्सा रहस्य यावर मार्गदर्शन केले. चित्त एकाग्र करण्याच्या दीर्घकालापर्यंत केलेल्या साधनेतून सत्याचा अनुभव येत असून, अशा माणसालाच योगी म्हणतात. आपल्यापैकी प्रत्येकजण योगाच्या या ध्येयापर्यंत पोहचू शकतो. हे कार्य फार कठीण असले तरीही, अशक्य नाही. सत्यापर्यंत जर आपल्याला पोहोचायचे असेल तर, सत्संग, प्रवचने, प्राणायाम, योगासने आवश्यक आहे, असे प्रतिपादन मनोहर नरेटे यांनी केले. प्रशिक्षण कार्यक्रमाकरिता नामदेवराव फटिंग, मार्गेश्वर रंगारी, माया रंगारी, छाजूराम शर्मा, हंसराज मिश्रा यांनी सहकार्य केले.