Leading International Marathi News Daily
मंगळवार, २४ मार्च २००९
नवनीत

जी व न द र्श न
नाही मी एकला. .
.

 

रेव्हरंड नारायण टिळक यांचे एक भक्तिगीत आहे-
नाही मी एकला कुठेही वसता कुठेही हिंडता पृथ्वीवरी।
तू माझा सांगाती अगा माझ्या माता माझा संगोपिता माझ्यासवे।
काय मी चिंतावे तूच माझे चित्त माझे उक्त कृत तुझे सारे।
सुखाचा दु:खाचा कालवीला काला तुझ्या संगे झाला गोड सारा।
दास म्हणे बाप जवळ लेकरा कितीही इतरा दूर वाटो।
जीवनातील सर्वात दाहक वेदना एकाकीपणाची असते. गजबजलेल्या गर्दीत, भरल्या घरात, नांदत्या संसारात माणूस एकटा असू शकतो. कधी कधी एकमेकांच्या कवेत असूनही पती-पत्नीला एकाकी वाटण्याची शक्यता नाकारता येत नाही. सर्व प्राणिमात्रात माणूस बुद्धिमान आहे. परंतु तो तितकाच दुर्बल आहे. त्याला निसर्गत: सहवासाची आवड आहे. ती त्याच्या आत्म्याची भूक आहे. माणसामध्ये चैतन्यतत्त्व (Spirit) आहे. दोन व्यक्ती जेव्हा एकमेकांना भेटतात तेव्हा दोन चैतन्यतत्त्वात संवाद सुरू होतो. भेटलेली व्यक्ती जितकी सात्त्विक आणि निष्काम तितकी भेटीची गुणवत्ता मोठी असते. त्यामुळे आपल्याला संतांचा सहवास हवाहवासा वाटत असतो. त्याचे दुरून झालेले दर्शनही दिलासा देणारे असते. सर्वात सुंदर सहवास असतो परमेश्वराचा. त्या सहवासाची अनुभूती घेण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. तो सर्वसाक्षी, सर्वव्यापी, सर्वसंचारी आहे. त्याचे स्वर सर्वत्र लहरत असतात. त्यासाठी मनात अध्यात्माचा ‘अँटिना’ लावावा लागतो. बायबलमधील स्तोत्रकाराला परमेश्वराच्या सहवासाची सतत जाणीव होत होती. १३९ व्या स्तोत्रात तो म्हणतो, ‘‘हे परमेश्वरा, तू मला पारखले आहे. तू मला ओळखत आहेस. माझे बसणे, उठणे, विहरणे, निजणे तू जाणतोस. माझ्या अवघ्या जीवनक्रमाची तुला खडान्खडा माहिती आहे.’’ संघर्षांच्या वेळी शिष्य आपल्याला सोडून जातील, याची जाणीव ख्रिस्ताला होती म्हणून त्याने त्यांना पूर्वसूचना देऊन ठेवली. ‘अशी वेळ येत आहे, किंबहुना आली आहे की तुमची दाणादाण होऊन, तुम्ही सर्व आपापल्या घरी निघून जाल आणि मला एकटे सोडाल तरी मी एकटा नाही, कारण परमपिता माझ्याबरोबर आहे.’’जेव्हा सारे सोडून जातात, तेव्हा जो बरोबर राहतो त्याला मित्र म्हणतात.
फादर फ्रान्सिस दिब्रिटो
francisd43@gmail.com

कु तू ह ल
वसतियोग्य पट्टा

पृथ्वी ही ‘वसतियोग्य पट्टय़ात’ वसली असल्याचं म्हटलं जातं, हा वसतियोग्य पट्टा म्हणजे काय?
वसतियोग्य पट्टा म्हणजे ताऱ्याभोवतालचा असा पट्टा की जेथे ग्रह किंवा उपग्रहांच्या पृष्ठभागावर पाणी द्रवरूपात आढळते. हा पट्टा ताऱ्याभोवती किती अंतरावर असेल हे अनेक घटकांवर अवलंबून असते. ग्रह वा उपग्रहांचे तापमान हा या बाबतीत सर्वात महत्त्वाचा घटक आहे. हे तापमान या ग्रहांचे वा उपग्रहांचे पितृताऱ्यापासूनचे अंतर, पितृताऱ्याची दीप्ती, तसेच ते ग्रह वा उपग्रह मिळालेली किती ऊर्जा शोषतात व किती ऊर्जा परावर्तित करतात यावर अवलंबून असते. किती ऊर्जा शोषली जाईल हे ग्रह वा उपग्रहाच्या वातावरणातील कार्बन डाय ऑक्साईड, मिथेन, पाण्याची वाफ व नायट्रस ऑक्साईड यासारख्या विविध वायूंच्या प्रमाणावर अवलंबून असते. अनेक दृष्टींनी पृथ्वीसदृश असणारा शुक्रासारखा ग्रह या वसतियोग्य पट्टय़ाबाहेर असल्यामुळे तिथे जीवसृष्टी निर्माण होऊशकली नाही.
सूर्यासारख्या ताऱ्याची दीप्ती त्यांचे एकूण जीवनचक्र लक्षात घेता बदलत जाते. अर्थातच त्यामुळे सूर्याभोवतीच्या वसतियोग्य पट्टय़ाचे अंतरदेखील बदलत गेले आहे. यापैकी जो भाग सदैव वसतियोग्य राहिला, त्याला ‘अखंड वसतियोग्य पट्टा’ म्हटले जाते. वरील घटक गृहीत धरून जेम्स कास्टिंग व त्याच्या सहकाऱ्यांनी मांडलेल्या सूत्रांप्रमाणे सूर्याभोवतीचा अखंड वसतियोग्य पट्टा हा सूर्यापासून ०.९५ ख.ए. ते १.१५ ख.ए. या अंतरादरम्यान आहे. (एक ख.ए. म्हणजे पृथ्वी व सूर्य यादरम्यानचे सरासरी अंतर) या पट्टय़ात सध्या पृथ्वीव्यतिरिक्त कुठलाही ग्रह नाही. फार पूर्वी मंगळदेखील वसतियोग्य पट्टय़ात असल्याची शक्यता आहे. या घटकांखेरीज पितृताऱ्याचे वस्तुमान, ग्रहमालेचे दीर्घिकेतील स्थान, तेथील हेलियमपेक्षा जड मूलद्रव्यांचे प्रमाण यावरसुद्धा वसतियोग्य पट्टय़ाचे अस्तित्व, अंतर, विस्तार व आयुष्य अवलंबून असते. काही ताऱ्यांच्या ग्रहमालेतील गुरूसारख्या ऊर्जा उत्सर्जित करणाऱ्या महाकाय ग्रहांच्या उपग्रहांवरदेखील वसतियोग्य परिस्थिती असू शकते.
सुजाता देशपांडे
मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, वि. ना. पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी (पूर्व), मुंबई ४०००२२
दूरध्वनी - (०२२)२४०५४७१४ , २४०५७२६८

दि न वि शे ष
अ‍ॅग्रिकोला जॉर्जिअस
‘खनिजविज्ञानाचे जनक’ अशी उपाधी मिळालेल्या अ‍ॅग्रिकोला जॉर्जिअस यांचे खरे नाव गेओख बाऊचर, परंतु त्या काळात लॅटिन नाव धारण करण्याचा रिवाज असल्याने त्यांनी जॉर्जिअस अ‍ॅग्रिकोला हे नाव धारण केले. त्यांचा जन्म २४ मार्च १४९४ रोजी झाला. बी. ए.ची. पदवी प्राप्त केल्यावर एका शाळेत त्यांनी ग्रीक व लॅटिन भाषा शिकवल्या. त्यांनी निसर्गविज्ञान, वैद्यक व तत्त्वज्ञान या विषयाचाही अभ्यास केला. काही काळ वैद्यकीय व्यवसायात रमल्यावर राजकारणातही त्यांनी यश संपादन केले. मृत्यू होईपर्यंत केमनिट्झ शहराच्या महापौरपदी ते होते. परंतु राजकारणापेक्षा त्यांना खाणकामात विशेष रस होता. खाणकामाच्या पद्धती, खाणमजुरांचे प्रश्न यांचा त्यांनी शास्त्रशुद्ध अभ्यास त्या काळात केला. खनिजविज्ञानावर आधारित ‘De Matura Sossilium’ हा त्यांचा महत्त्वपूर्ण ग्रंथ. शेकडो खनिजांच्या गुणधर्माचे वर्गीकरण या ग्रंथातून केले आहे. या विषयावर त्यांचे दुसरे पुस्तक म्हणजे ‘मेटलिका’. यात त्यांनी खाणकाम, धातू गाळण्याची क्रिया यांचे तपशीलवार विवेचन केले आहे. धातू व खाण उद्योजक व्यवस्थापकांना हे पुस्तक अगदी एकोणिसाव्या शतकापर्यंत मार्गदर्शक म्हणून उपयोगी पडत होते. त्यांची ही पुस्तके लॅटिन भाषेत होती. त्यांचे इटली, जर्मनी व इंग्रजी भाषांत अनुवाद झाले. याशिवाय त्यांची राजकीय व आर्थिक विषयांवरही पुस्तके लिहिली. भूविज्ञानाचे पूर्वसुरी असे संबोधले जाणारे अ‍ॅग्रिकोला २१ नोव्हेंबर १५५५ रोजी निधन पावले.
संजय शा. वझरेकर

गो ष्ट डॉ ट कॉ म
निसर्गाकडून मिळणारे शहाणपण
ही कथा छांदोग्य उपनिषद या ग्रंथात आहे. वनामध्ये आश्रमात मंत्रपठण चालू होते. आश्रमाचा परिसर प्रसन्न होता. सभोवती वृक्षवेली होत्या. हरणांची बलके आनंदाने भटकंती करत होती. अनेक ठिकाणांहून आणि विविध प्रकारच्या कुटुंबांमधून आलेले विद्यार्थी झाडाखाली बसून गुरूंच्या तोंडून ज्ञान मिळवत होते. आश्रमात एक मुलगा आला. तेजस्वी डोळय़ांचा, बुद्धिमान दिसणारा तो मुलगा गुरूंच्या पायावर डोके ठेवून नमस्कार करून म्हणाला,‘‘आचार्य, मला आपला शिष्य व्हायचे आहे. ब्रह्म म्हणजे काय, याचे ज्ञान आपण मला द्या’’ गुरूंनी त्याची विनंती मान्य केली. ते म्हणाले,‘‘ आश्रमात राहा, उद्यापासून गाई रानात चरायला ने.’’ गुरूंची आज्ञा मोडायची नसते किंवा गुरूंनी एखादी गोष्ट कर म्हटल्यावर ‘का’ असे विचारायचे नाही. गुरू करतील ते शिष्याच्या भल्यासाठीच, हा त्या काळचा नियम होता. मुलगा पहाटे उठायचा. गाईंच्या धारा काढायचा आणि त्यांना रानात चरायला घेऊन जायचा. सूर्य मावळायला लागला की गाईंना घेऊन आश्रमात यायचा. गोठा साफ करायचा. शेण गोळा करायचा. गुरूंनी त्याला कधी पाठाला बसायला सांगितले नाही की ग्रंथवाचन करायला दिले नाही. पण त्याची गुरूंवर श्रद्धा होती. तो निराश झाला नाही. गुरूंनी जे करायला सांगितले ते मन:पूर्वक करत राहिला. गाई घेऊन तो रानात जायचा. पक्षी गात असायचे. मोर नाचताना दिसायचे. वृक्षवेली फळाफुलांनी लहडलेले असायच्या. ही सुंदर सृष्टी परमेश्वरच आहे असे त्याला वाटायचे. गाई पाण्याकडे तहानलेल्या होऊन निघत. तोही पाण्यावर जायचा. पाणी पिऊन तृप्त होणारे पशुपक्षी पाहून त्याला वाटे, पाणी जीवनच आहे. ढगांनी भरून गेलेले आकाश. कोसळणारा पाऊस, रोज उगवून अस्त पावणारा सूर्य, चंद्र साऱ्यांशी त्याचे मैत्रीचे नाते झाले. एके दिवशी गुरू म्हणाले,‘‘की या शंभर गाई घेऊन वनात राहा. त्यांच्या जेव्हा हजार गाई होतील तेव्हा आश्रमात परत ये.’’ तो गाई घेऊन वनात गेला. गाईंचे जगणे, आजारी पडणे, त्यांच्या वासरांचे जन्म, मरण, अन्नपाण्याची त्यांची गरज सारे त्याने जवळून पाहिले. पक्षी, वायू, आकाश यांनी त्याला जीवनाचे ज्ञान दिले. नद्या, डोंगर, जमीन, वनस्पती सगळय़ांकडून तो शिकत गेला. त्याच्यात एक वेगळेच चैतन्य निर्माण झाले. एके दिवशी तांबूस रंगाची गाय त्याला म्हणाली, ‘‘बाळा, असा आम्ही एक हजार झालो आहोत. आपण आश्रमात परत जाऊया.’’ शिष्य हजार गाई घेऊन परतला. त्याला पाहून गुरू म्हणाले, ‘मला तुझ्या चेहऱ्यावर ब्रह्मतेज-ज्ञानाचे तेज दिसते आहे. हे ज्ञान तुला कुणी दिले? शिष्य म्हणाला,‘‘आचार्य, मनुष्येतरांकडून हे ज्ञान मला मिळाले.’’
निसर्गाच्या जवळ गेले, त्याच्या सान्निध्यात राहिले तर जीवनाला आवश्यक असे कितीतरी शहाणपण आणि ज्ञान निसर्ग आपल्याला देतो. निसर्गाचा ग्रंथ खूप मोठा आहे. त्यांची पाने वाचणारा नुसताच ज्ञानी नाही तर तत्त्वज्ञानी होतो.
आजचा संकल्प- मी निसर्गाच्या संगतीत राहीन.
ज्ञानदा नाईक
dnyanadanaik@hotmail.com