Leading International Marathi News Daily
मंगळवार, २४ मार्च २००९

उरणमध्ये अनधिकृत इमारतीवर बुलडोझर
उरण/वार्ताहर

सत्तेचा दुरुपयोग करून उरण नगर परिषदेच्या हद्दीतील भिवंडीवाला गार्डनमधील आरक्षित जागेत अनधिकृतरीत्या बांधलेली १६ हजार स्क्वेअर फुटाची इमारत उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सोमवारी पाडण्यात आली. यामुळे बांधकामधारकांमध्ये प्रचंड खळबळ माजली आहे.
उरण नगर परिषदेच्या हद्दीत भिवंडीवाला गार्डनमधील सव्‍‌र्हे नं. ८+९+१०+११ ही जमीन ग्रीन झोनसाठी आरक्षित आहे. मात्र याच आरक्षित जमिनीवर जिम्नॅशियम, तसेच इनडोअर गेम्सच्या इमारतीचे अनधिकृत बांधकाम केले आहे. उरण नगर परिषदेने बांधकामाला परवानगी दिली नसतानाही डोसू आर्देसर भिवंडीवाला यांनी दुमजली इमारत बांधली. उरण परिषदेच्या सत्ताधारी गटातील काही नगरसेवक या अनधिकृत बांधकामात गुंतले असल्यानेच १६ हजार स्क्वेअर फुटाची इमारत उभी करणे शक्य झाले. या अनधिकृत बांधकामाच्या विरोधात तक्रारी होताच नगर परिषदेने बेकायदेशीर इमारतीच्या बांधकामाला नोटीस बजाविली होती, तसेच बांधकाम पाडण्याचेही कळविण्यात आले होते. या नोटिसीविरोधात भिवंडीवाला यांनी उरण न्यायालयात धाव घेतली होती. मात्र उरण न्यायालयानेही नगर परिषदेची भूमिका रास्त असल्याने यावर स्थगिती देण्यास नकार दिला. त्यानंतर शासन, जिल्हाधिकाऱ्यांनीही उरण परिषदेला बेकायदेशीर बांधकामावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. मात्र त्यानंतरही अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यास नप टाळाटाळ करू लागल्याने येथील दक्ष नागरिक जयंत घोसाळकर यांनी उच्च न्यायालयात या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी जनहित याचिका दाखल केली होती. नप व शासन यांची भूमिका जाणून घेतल्यानंतर उच्च न्यायालयाने संबंधित इमारतीच्या बांधकामावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार सोमवारी उरण नगर परिषदेने पोलीस बंदोबस्तात अनधिकृत इमारत पाडण्यास सुरुवात केली. मात्र अनधिकृत बांधकामावरील कारवाईमुळे परिसरातील अनधिकृत बांधकामधारकांचे धाबे दणाणले आहेत. उरण मुख्याधिकारी हरिकल्याण येलगट्टे, सार्वजनिक बांधकाम अभियंता पी.एन. देसले, एसीपी बी.एन.शिरसाट, वरिष्ठ पोलीस निरीक्षक आर.के. कोठावळे, वालतुरे यांच्या देखरेखीखाली अनधिकृत बांधकाम पाडण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

परीक्षित लागला प्रज्ञा परीक्षेच्या तयारीला!
पनवेल/प्रतिनिधी :
दहावीची परीक्षा संपल्यानंतर दोन दिवस आराम केला; आता मी महाराष्ट्र प्रज्ञा शोध परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात केली आहे. मराठीत आणि अतिशय गोड आवाजात परीक्षित शाह भावी योजना आत्मविश्वासाने सांगत होता. हाडांच्या ठिसूळपणाच्या जन्मजात व्याधीवर मात करीत पनवेलमधील वि. खं. विद्यालयातून दहावीची परीक्षा देणाऱ्या परीक्षितच्या कौतुकाने वर्तमानपत्रांचे रकाने भरले आहेत. तरीही तो पूर्वीसारखाच विनम्र आहे हे विशेष. भूमितीचा पेपर काहीसा आव्हानात्मक वाटला, मात्र बाकीचे पेपर अतिशय सोपे गेले. अपेक्षेप्रमाणे दहावीत मी ८०-८५ टक्के मिळवेन, असे त्याने ठामपणे सांगितले. पनवेलमधील ५२ बंगला परिसरातच मामा राहत असल्याने परीक्षा संपल्यावर त्याच्याकडे जाऊन आलो, मला भेटायला घरी अनेक मित्र आले होते. या सुट्टीत खूप काही करायचे आहे, मात्र २४ एप्रिलला होणाऱ्या महाराष्ट्र प्रज्ञा शोध परीक्षेच्या अभ्यासाला मी सुरुवात केली आहे. यात गणित, विज्ञान, सामान्य ज्ञान, समाजशास्त्र असे विषय आहेत. या परीक्षेतही मला चांगले यश मिळवायचे आहे, असे सांगताना त्याचे डोळे आनंदाने चमकतात. दहावीनंतर कोणत्या शाखेत प्रवेश घेणार, असे विचारल्यानंतर तो त्वरित कॉमर्स असे उतरला. ८० टक्के मिळाले तर सायन्सला का जाणार नाही, असे विचारले असता सायन्समध्ये प्रात्यक्षिके खूप असतात. ते मला अडचणीचे ठरेल, शिवाय मला अकाऊंट व शेअर्समध्ये जास्त स्वारस्य आहे, असे त्याने सांगितले. तेव्हा त्याच्या सुजाणपणाचे आणि निर्णयक्षमतेचे कौतुक वाटले. सुट्टीत घरी इंग्लिश स्पीकिंग तसेच ज्योतिषाचा कोर्स करायचाही विचार त्याने बोलून दाखविला. क्रिकेटची आवड असल्याने आयपीएलचे सामनेही तो उत्सुकतेने पाहणार आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करणाऱ्या परीक्षितचे नाव प्रत्येकाच्या ओठावर आहे.