Leading International Marathi News Daily
मंगळवार, २४ मार्च २००९

गुढीपाडवा, कडुनिंब वाढवा!
विद्यार्थ्यांच्या सहाय्याने वनीकरण विभागाची मोहीम

प्रतिनिधी / नाशिक

राष्ट्रीय हरित सेना योजनेंतर्गत गुढी पाडव्याचा सण पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करावा, या उद्देशाने यंदा ‘गुढी पाडवा कडुनिंब वाढवा’ ही मोहीम राबविली जाणार आहे. इको क्लबच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांच्या सहकार्याने पाडव्याच्या दिवशी घरोघरी कडुनिंब लावण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सामाजिक वनीकरण विभागामार्फत याकरिता नाशिक व जळगाव येथे रोपेही उपलब्ध करून देण्यात आली आहेत. भारतीय संस्कृतीत सण समारंभ साजरे करताना पर्यावरणाचे होणारे नुकसान टाळण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे.

दर आठवडय़ाला राज ठाकरे नाशकात!
अभिजीत कुलकर्णी / नाशिक

लोकसभा निवडणुकीला प्रथमच सामोऱ्या जाणाऱ्या आपल्या पक्षाच्या प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी येथे येण्यापूर्वीच राज ठाकरे यांच्यावर प्रक्षोभक भाषण न करण्यासंदर्भात बजावण्यात आलेली नोटीस आणि प्रचार सभेनंतर याच कारणावरून जाहीर झालेला आचारसंहिता भंगाचा गुन्हा या पाश्र्वभूमीवर राज येत्या महिनाभरात प्रचाराच्या निमित्ताने आणखी तीन ते चार वेळा म्हणजेच सरासरी दर आठवडय़ाला नाशकात दाखल होणार असल्याने स्थानिक यंत्रणेची धावपळ आणि डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.

रेल्वे स्थानकाच्या सुशोभीकरणापेक्षा सुविधांची निकड
प्रश्न जिव्हाळ्याचे

वार्ताहर / नाशिकरोड

नाशिकरोड रेल्वे स्थानकातून बाहेर पडल्यावर प्रथम पहायला मिळतो तो परिसरातील बकालपणा. अभूतपूर्व कोंडीतून मार्ग काढताना मग प्रवाशांची दमछाक होते. एवढे कमी म्हणून की काय, रिक्षाचालक पिळवणूक करण्यास सज्ज असतात. दिवसभरात कोणत्याही वेळी येथे भेट दिल्यानंतर हा अनुभव घेता येवू शकतो. मात्र, पोलीस व अतिक्रमण हटविण्याची जबाबदारी असणारी महापालिका व रेल्वे प्रशासनाला बहुदा त्याची गंधवार्ता नसावी अशी परिस्थिती आहे. मध्यंतरी स्थानक परिसराच्या सुशोभीकरणाचा घाट घातला गेला. तथापि, तो एक देखावा ठरल्याची अनुभूती सध्या प्रवासी घेत आहेत.

धोऽऽऽ डाला !
भाऊसाहेब :
निवडनूक लोकसबेची का इदानसबेची म्हनायची, भावराव..
भाऊराव : लोकसभेचीच, का हो ?
भाऊसाहेब : न्हाई, म्हटलं शेनेनं सुनिलभाऊंची इदानसबेची उमेदवारी जाहीर केली, म्हनून उगा शंका.
भाऊराव : गेल्या निवडणुकीत गटबाजीचा फटका बसल्यामुळेच सेनेच्या अप्पांचा पराभव झाला, म्हणून यावेळी त्यांनी ताकही फुंकून प्यायचं ठरवलेलं दिसतंय.
भावडय़ा : आता सगळी काळजी घ्यावीच लागेल. नाहीतर ‘एक का तीन’ व्हायला वेळ नाही लागायचा. त्यातच राजसाहेबांची सभा एवढी जोरात झाली की, विचारू नका.
भाऊसाहेब : राजसाहेबाच्या सभेमंदी लै जोरदार बार निघाले म्हने..

‘समाजकारणाचे भान हवे’
निवडणुकीचे पडघम वाजू लागले की, पक्ष-पक्षांचे राजकारण सुरू होते. मतदार ‘राजा’ आहे याची जाणीव होते. गेली पाच वर्षे ज्या राजाची दखलही घेतली जात नाही, त्यांचे प्रश्न, विकास यांची भरभरून आश्वासने दिली जातात. मात्र निवडून येताच जाहिरनाम्याशी फारकत घेतली जाते. प्रत्यक्षात सत्तेचे राजकारण सुरू होते. लोकसभेतील, विधानसभेतील जादुई आकडा कसा पार करता येईल या संख्येच्या हिशेबाची गणिते मांडून सत्ता काबीज केली जाते. या गणितात अपक्षांचा घोडेबाजार बाजी मारतो आणि स्वतची चांदी करून घेतली जाते.

दर घसरल्याने उत्पादकांकडून कांदाफेक
नाशिक / प्रतिनिधी

अंदरसूल कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची विक्रमी आवक झाल्यानंतर भाव घसरल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यावर कांदाफेक केली. या घटनेमुळे बाजार समितीच्या आवारात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. बाजार समिती संचालक व पोलीस पाटलांच्या मध्यस्थीनंतर लिलाव पूर्ववत झाले. अंदरसूल बाजार समितीत शनिवारी पाचशे ट्रॅक्टर व ७५० पिकअप व्हॅन आणि रिक्षाव्दारे कांद्याची विक्रमी आवक झाली. आवक वाढल्याने दरात मोठी घसरण झाली. या घसरणीमुळे उत्पादक संतप्त झाले आणि त्यांनी आपला राग व्यापाऱ्यांवर कांदाफेक करून व्यक्त केला. अचानक झालेल्या या घटनेमुळे व्यापाऱ्यांनी बाजार समितीच्या आवारातून पळ काढला. लिलावाचे कामकाज बंद केले. लिलाव बंद झाल्याचे पाहून शेतकरी अधिकच संतप्त झाले. या घटनेची माहिती समजल्यानंतर समितीचे संचालक नरेंद्र दराडे, अरूण काळे, शिवाजी वडाळकर व उपसभापती देवीदास निकम यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यानच्या काळात पोलिसांना पाचारण करीत तणावपूर्ण वातावरण शांत करण्यात आले. शेतकरी व व्यापाऱ्यांशी बोलणी करून संचालकांनी १०० रूपये दरवाढीचा तोडगा मांडला. दर वाढवून मिळाल्याने शेतकऱ्यांनी सामंजस्याची भूमिका घेतल्यानंतर लिलावाचे काम सुरू झाले. सायंकाळपर्यंत २५० ट्रॅक्टर कांद्याचा लिलाव झाल्याची माहिती बाजार समितीने दिली.

मराठी तरुणांनी उदात्त स्वप्ने पाहावीत - वसंत गीते
नाशिक / प्रतिनिधी

मराठी तरुणांना खेडय़ातून शहराकडे येण्यासाठी प्रोत्साहन मिळणे गरजेचे आहे. त्याच भूमिकेतून कुसुमाग्रज मंडळ कार्य करीत असून नजीकच्या काळात मराठी तरुणांकडे लाल दिव्याची गाडी यावी हे स्वप्न प्रत्येक विद्यार्थ्यांने पाहणे गरजेचे आहे, असे आग्रही प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस वसंत गीते यांनी कुसुमाग्रज मंडळातर्फे आयोजित युपीएससी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराच्या समारोप प्रसंगी केले. मंडळातर्फे शहरातील पाटीदार भवनमध्ये युपीएससी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रतिभूती मुद्रणालयाच्या कामगार संघटनेचे सरचिटणीस रामभाऊ जगताप, प्रा. राम खैरनार, डॉ. जी. आर. पाटील. इमेज अ‍ॅकॅ डमीचे सुनिल पाटील, असिस्टंट कमांडंट चेतन खर्जेकर आदी उपस्थित होते. १४ डिसेंबरपासून महिन्यातील प्रत्येक रविवारी असे एकूण १५ रविवार केटीएचएम महाविद्यालयात युपीएससी मार्गदर्शन वर्ग घेण्यात आले. या वर्गाला जिल्ह्य़ातील बव्हंशी विद्यार्थी सहभागी झाले होते. मराठी विद्यार्थ्यांंनी तळमळीने अभ्यास केल्यास नाशिक जिल्ह्य़ाचा आय.ए.एस व आय.पी.एस क्षेत्रात लौकीक निर्माण होईल असा विश्वासही गीते यांनी व्यक्त केला. युपीएस क्षेत्रात नाशिक जिल्ह्य़ाची मक्तेदारी निर्माण होईल यादृष्टीने विद्यार्थ्यांनी ध्येय ठेवून अभ्यासाला लागले पाहिजे असे आवाहन प्रा. खैरनार यांनी केले. आगामी काळात संपूर्ण भारतात युपीएससीचा टॉपर हा नाशिकमधला असेल हेच उद्दिष्ट ठेवून ज्ञानदानाचे कार्य कुसुमाग्रज मंडळाकरवी होत आहे असे मत डॉ. पाटील यांनी मांडले. यावेळी अशोक गायधनी, आर. जे. घुमरे, कचेश्वर कोठुरकर, सुनिल पाटील, प्राची शास्त्री, डॉ. श्रृतिका भराडे, रणजित कुऱ्हे आदींची भाषणे झाली. मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब दुगजे प्रास्तविक तर सचिन चव्हाण यांनी आभारप्रदर्शन केले.