Leading International Marathi News Daily
मंगळवार, २४ मार्च २००९

नेत्यांच्या उदासीनतेने पाणी प्रश्न बिकट
वार्ताहर / अमळनेर

कधी भ्रष्टाचार, कधी पुरेसा ज्ञानाचा अभाव तर कधी नियंत्रणाची वानवा अशा स्थितीत जळगाव जिल्ह्य़ातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी केंद्र सरकारकडून देण्यात आलेल्या महत्वाकांक्षी पाणी योजनांनी पाणी टंचाई तर दूर झाली नाहीच, उलट स्थानिक लोकप्रतिनिधींनी आपलेच कार्यकर्ते त्यात दोषी सापडण्याची शक्यता पाहता कारवाईचा रेटा लावला नसल्याचे दिसून येते. परिणामी, पाणी टंचाईची झळ जिल्ह्य़ात कायम राहिली असून मुलभूत प्रश्नाविषयी लोकप्रतिनिधींची भूमिकाही उदासिन राहिली आहे. या पाश्र्वभूमीवर, पाणी टंचाईला जबाबदार कोण असा प्रश्नही उपस्थित झाला आहे. या सर्व बाबींचा परिणाम म्हणजे तब्बल पाच वर्षांपेक्षा अधिक काळ लोटूनही मंजूर असलेल्या पाणी योजना अद्यापही कागदावर रेंगाळत आहेत. १० टक्के लोकवर्गणी व ९० टक्के केंद्र शासनाची रक्कम अशा रितीने योजनांचे केंद्र सरकारने महत्वाकांक्षी पाणी योजना देशात आणली होती.

तहसीलदारांच्या बदलीचे धक्कातंत्र
वार्ताहर / मालेगाव

वरिष्ठांनी केलेल्या बदलीला स्थगिती मिळवत पुन्हा त्याच पदाचा कार्यभार स्वीकारण्याबद्दल गेले काही महिने चर्चेच्या केंद्रस्थानी राहिलेले येथील तहसीलदार के. एस. म्हसाणे यांनी त्यांच्या नुकत्याच झालेल्या बदलीसाठी स्थगिती मिळवून वरिष्ठांना ‘धक्कातंत्राची’ प्रचिती आणून दिली आहे. प्रशासकिय न्यायाधिकरणाच्या निकालानुसार म्हसाणे यांनी पुन्हा तहसिलदार पदाचा कार्यभार स्वीकारला असून यानिमित्ताने महसूल आयुक्तालयातील घिसाडघाई देखील चव्हाटय़ावर आली आहे. सर्वसामान्य नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करणाऱ्या या बदली प्रकरणाने तहसिलदारसारख्या महत्वाच्या पदाची मात्र पुरती शोभा झाल्याने येथे सध्या तो चर्चेचा विषय बनला आहे. जून २००७ मध्ये तहसीलदारपदाचा कार्यभार सांभाळणाऱ्या म्हसाणे यांची गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात अचानक नाशिक येथील संजय गांधी योजनेच्या तहसीलदारपदी बदली झाली होती.

सापांविषयी जनजागृतीसाठी चाळीसगावमध्ये कार्यक्रम
चाळीसगाव / वार्ताहर

सापाबद्दल समाजात अनेक गैरसमजुती असून पूर्वजांनी सापाचे महत्व ओळखून संस्कृतीमध्ये त्यांना महत्वाचे स्थान दिले आहे. सापाला ठार मारण्यापेक्षा सर्प चावलेल्या व्यक्तीवर योग्य उपचार करून त्याला वाचविण्याचा प्रयत्न करावा, असे प्रतिपादन येथील सर्पमित्र राजेश ठोंबरे यांनी केले.येथील आयुर्वेद व शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित कार्यक्रमात ‘सर्प- मित्र की शत्रु’ या विषयावर ते मार्गदर्शन करीत होते. यावेळी सोबत आणलेले विषारी, बिनविषारी साप दाखवित सविस्तर माहितीही त्यांनी दिली.

अवैध धंद्यांविरूध्दच्या पोलिसी कारवाईचे शिवसेनेकडून स्वागत
धुळे / वार्ताहर

पोलिसांनी जिल्ह्य़ातील अवैध व्यवसायांविरूध्द सुरू केलेल्या कारवाईचे शिवसेनेने जोरदार स्वागत केले आहे. रॉकेल, गॅस आणि स्वस्त धान्य दुकानावर न नेता परस्पर धान्याचा केला जाणारा काळाबाजार आणि जनावरांची होणारी बेकायदा वाहतूक अशी सर्वच गुन्हेगारी प्रकरणे शिवसेनेने पोलिसांना सोबत घेऊन उघड केली आहेत. धुळे शहरातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी पोलिसांनी अलिकडे ठोस अशी पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. या कारवाईत सातत्य राखण्याची गरज शिवसेनेचे महानगरप्रमुख हिलाल माळी यांनी व्यक्त केली. जीवनावश्यक वस्तुंच्या काळ्या धंद्यांवर राजकीय वरदहस्त असल्याचा आरोप माळी यांनी केला आहे.

जळगावमध्ये आपत्ती व्यवस्थापनाविषयी राज्यस्तरीय परिषद
जळगाव / वार्ताहर

येथील अरूणोदय ज्ञान प्रसारक मंडळ संचलित कला, वाणिज्य व गृहविज्ञान महाविद्यालयात ‘आपत्ती व्यवस्थापनातील नवप्रवाह’ या विषयावर २५ मार्च रोजी विद्यापीठ अनुदान आयोग अनुदानित राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. अरूणोदय ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव प्रा. ए. पी. चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा. डॉ. पी. आर. चौधरी, दादासाहेब भाटेवाल डॉ. तृप्ती बढे, प्रा. एस. एन. भारंबे आदी तज्ञ परिषदेत मार्गदर्शन करणार आहेत. आपत्ती व्यवस्थापनातील नवप्रवाह आणि विविध पैलूंची ओळख पटवून देणे, आपत्ती व्यवस्थापन वैद्यकीय मदत, या संकल्पनेविषयी पुनर्विचार करणे, भौगोलिक माहिती प्रणालीच्या उपयुक्ततेविषयी जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. परिषदेचा समारोप महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मंगला जंगले यांच्या अध्यक्षतेखाली तर प्रा. बी. एम. महाजन यांच्या उपस्थितीत होणार आहे. आयोजन समिती अध्यक्ष प्रा. किशोर नेहेते सदस्य प्रा. सतीश जाधव, प्रा. विजय पाटील, प्रा. साधना जावळे परिषद यशस्वीतेसाठी कार्यरत आहेत.

नववर्ष स्वागतासाठी जळगावमध्ये शोभायात्रा
जळगाव / वार्ताहर

नववर्षांच्या स्वागतासाठी २७ मार्च रोजी गुढीपाडव्यानिमित्त विविध संस्था, संघटना तसेच मंडळांच्या संयुक्त विद्यमाने येथे शोभायात्रांचे आयोजन करण्यात आले आहे. जळगाव येथील ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थानचे विद्यमान गादीपती मंगेश महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली या यात्रांचे आयोजन करण्यात आले आहे. मंगेश महाराज यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ, श्रीशारदा वेद पाठशाळा, सनातन संस्था, हिंदू जनजागृती समिती यांच्यासह शहरातील सामाजिक तसेच धार्मिक, सांस्कृतिक मंडळांची सभा नुकतीच झाली. हिंदू नववर्ष दिनाच्या या स्वागत यात्रेत परंपरांगत वेशभूषेसह नागरिकांनी सहभागी व्हावे, असे अवाहन महाराजांनी केले आहे. यात्रा आयोजन समितीची पुढील बैठक गोलाणी मार्केट परिसरातील दक्षिणमुखी हनुमान मंदिरात २५ मार्च रोजी सायंकाळी होणार आहे.

येवल्यात आजपासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा
येवला / वार्ताहर

नगरपालिकेच्या साठवण तलावात अल्प पाण्याचा साठा शिल्लक राहिल्याने मंगळवारपासून शहराला दोन दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचे नियोजन असल्याची माहिती मुख्याधिकारी अमोल बागूल यांनी येथे दिली. येवल्यात वर्षभर दररोज दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. परंतु सध्या पालिकेच्या साठवण तलावात केवळ पाच दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या पंधरवडय़ापासून पाणी पुरवठय़ाच्या वेळेत १० मिनिटांची कपात करण्यात आली होती. परंतु मर्यादित पाणी साठा असल्याने आता दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचे धोरण प्रशासनाने ठरविले आहे. तालुक्यातील बोकटे यात्रेनिमित्त पालखेड पाटबंधारे विभागाकडून १० ते १३ एप्रिल दरम्यान पाण्याचे आवर्तन सोडण्यात येणार आहे. या कालावधीत येवला शहर पाणीपुरवठा साठवण तलावात पाणी भरले जाणार आहे. तोपर्यंत नागरिकांना दोन दिवसाआड पाणी पुरवठा होईल. नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन पाणी पुरवठा समिती प्रमुख भालचंद्र कुक्कर व मुख्याधिकारी बागूल यांनी केले आहे. नळ कनेकशन धारकांनी नळांना तोटय़ा बसवाव्यात व पाणी वाया जाणार नाही याची दक्षता घ्यावी अन्यथा संबंधीत नळ कनेकशन धारकांना कारवाईला सामोरे जावे लागण्याचा इशाराही दिला आहे.