Leading International Marathi News Daily
मंगळवार, २४ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

तहसीलदारांच्या बदलीचे धक्कातंत्र
वार्ताहर / मालेगाव

वरिष्ठांनी केलेल्या बदलीला स्थगिती मिळवत पुन्हा त्याच पदाचा कार्यभार स्वीकारण्याबद्दल गेले काही महिने चर्चेच्या केंद्रस्थानी राहिलेले येथील तहसीलदार के. एस. म्हसाणे यांनी त्यांच्या नुकत्याच झालेल्या बदलीसाठी स्थगिती मिळवून वरिष्ठांना ‘धक्कातंत्राची’ प्रचिती आणून दिली

 

आहे. प्रशासकिय न्यायाधिकरणाच्या निकालानुसार म्हसाणे यांनी पुन्हा तहसिलदार पदाचा कार्यभार स्वीकारला असून यानिमित्ताने महसूल आयुक्तालयातील घिसाडघाई देखील चव्हाटय़ावर आली आहे. सर्वसामान्य नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करणाऱ्या या बदली प्रकरणाने तहसिलदारसारख्या महत्वाच्या पदाची मात्र पुरती शोभा झाल्याने येथे सध्या तो चर्चेचा विषय बनला आहे.
जून २००७ मध्ये तहसीलदारपदाचा कार्यभार सांभाळणाऱ्या म्हसाणे यांची गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात अचानक नाशिक येथील संजय गांधी योजनेच्या तहसीलदारपदी बदली झाली होती. त्यांच्या जागी बाळासाहेब वाघचौरे यांची बदली करण्यात आली होती. त्यावेळी या एकाच खुर्चीवर दोघा अधिकाऱ्यांनी दावा केल्याने खुर्चीचा वाद चांगलाच रंगला होता. वाघचौरे यांनी आपल्या दालनाला नवे कुलूप लावल्याने म्हसाणे यांच्या समर्थकांनी तहसील कार्यालयाच्या आवारात तेव्हा आंदोलनही केले होते. त्या नंतर महसूल आयुक्तालयाने प्रशासकिय न्यायाधिकरणाच्या निकालानुसार म्हसाणे यांची येथून झालेली बदली रद्द करण्याचे आदेश काढले होते.
त्यानंतर गेल्या १९ जानेवारी रोजी प्रशासनाने भारतीय प्रशासकीय सेवेचे प्रशिक्षणार्थी आश्विनी मदगुल यांची दोन महिन्यांच्या कालावधीसाठी येथील तहसीलदारपदी नियुक्ती केली होती. या पदावरील म्हसाणे यांना मात्र कुठलाही पदभार न देता त्यांना अंधातरी ठेवण्यात आले होते. या पदावरील म्हसाणे यांना कुठलाही पदभार न देता त्यांना अंधातरी ठेवण्यात आले होते. हा दोन महिन्याचा कालावधी संपल्यावर या पदावर पूर्ववत आपला हक्क राहिल असे म्हसाणे यांनी गृहित धरले असावे. मात्र या दोन महिन्याच्या कालावधीत तीन चार दिवस शिल्लक असतानाच यावलचे तहसीलदार राहूल मुंडके यांची येथील तहसीलदारपदी तर म्हसाणे यांची धुळे येथे संजय गांधी योजनेच्या तहसीलदारपदी बदलीचे आदेश निघाले. त्यानुसार गेल्या १३ मार्च रोजी मुंडके यांनी प्रशिक्षणार्थी तहसीलदार मुदगल यांच्याकडून पदभार स्वीकारला.
या बदली आदेशाला म्हसाणे यांनी पुन्हा ‘मॅट’ मध्ये आव्हान दिले होते. त्यानुसार गेल्या आठवडय़ात मॅटने म्हसाणे यांची बदली रद्द करून त्यांच्याकडे येथील तहसीलदारपदाचा कार्यभार सोपविण्याचे आदेश दिले होते. या निर्णयानुसार महसूल आयुक्तालयाने म्हसाणे यांच्या बदलीचे आदेश रद्द केले. त्यामुळे मुंडके यांच्याकडून त्यांनी रितसर कार्यभार स्वीकारला. मुंडके यांच्याकडे मात्र अद्याप कुठलाही पदभार देण्यात आलेला नाही. म्हसाणे हे येत्या ३० जून रोजी सेवानिवृत्त होत आहेत.