Leading International Marathi News Daily
मंगळवार, २४ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

सापांविषयी जनजागृतीसाठी चाळीसगावमध्ये कार्यक्रम
चाळीसगाव / वार्ताहर

सापाबद्दल समाजात अनेक गैरसमजुती असून पूर्वजांनी सापाचे महत्व ओळखून संस्कृतीमध्ये त्यांना महत्वाचे स्थान दिले आहे. सापाला ठार मारण्यापेक्षा सर्प चावलेल्या व्यक्तीवर योग्य उपचार करून त्याला वाचविण्याचा प्रयत्न करावा, असे प्रतिपादन येथील सर्पमित्र राजेश ठोंबरे यांनी केले.
येथील आयुर्वेद व शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित कार्यक्रमात ‘सर्प- मित्र की शत्रु’ या विषयावर ते मार्गदर्शन करीत होते. यावेळी सोबत आणलेले विषारी, बिनविषारी साप दाखवित सविस्तर माहितीही त्यांनी दिली. मुला-मुलींना त्यांनी प्रत्यक्षात साप हाताळण्यास सांगितल्याने मुलांच्या मनातील सापाविषयीची भिती नष्ट झाली. किसान ज्ञानोदय मंडळाचे प्रमुख डॉ. उत्तम महाजन हे अध्यक्षस्थानी होते. राष्ट्रीय महाविद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब चव्हाण हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
साप निसर्गाचा समतोल राखणारा प्राणी असून शेतकऱ्यांसाठी तो अतिशय उपयुक्त आहे. डॉ. महाजन यांनी सापाबद्दलच्या अवास्तव गोष्टींकडे लक्ष न देता त्यांचे जतन करावे असा सल्ला उपस्थितांना दिला. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी वैद्यकीय सेलचे अध्यक्ष डॉ. जगदीश देशमुख, पॅरामेडिकल कॉलेजचे अध्यक्ष डॉ. शंकरराव पाटील, आयुर्वेद महाविद्यालयाचे उप प्राचार्य डॉ. उमेश पाटील, धन्वंतरी रूग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. धनंजय महाजन, इन्स्टिटय़ुट ऑफ फार्मसीचे प्राचार्य किरण पाटील, शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य अजयकुमार इंगळे, प्रशासकीय अधिकारी विलास पाटील, डॉ. प्रमोद खारकर आदी उपस्थित होते. जनसंपर्क अधिकारी प्रमोद दंडगव्हाळ यांनी स्वागत केले. युवराज पाटील, दीपमाला जाधव, रूपाली गवळी यांनी सूत्रसंचालन केले.