Leading International Marathi News Daily
मंगळवार, २४ मार्च २००९
विशेष
(सविस्तर वृत्त)

न्या. रानडे : पहिले मराठी अर्थशास्त्रज्ञ

 

लब्धप्रतिष्ठित संप्रदायाचे अर्थशास्त्रज्ञ-अ‍ॅडम स्मिथ, रिकाडरे, जेम्स मिल, सिनिओर, माल्थस, टॉरेन, बॅस्टिएट यांच्या सिद्धांतांवर रानडेंनी टीका केली. रिकाडरेची रेंट थेअरी भारताला अजिबात लागू होत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जमीन महसूल हा खंड नसून तो केवळ एक कर असल्याचे म्हटले. निरंकुश अर्थव्यवहार धोरणावर त्यांनी जोरदार हल्ला केला. लोकपरायण दृष्टिकोनातून सरकारने मोठे उद्योग काढावे असे सुचवले. ब्रिटिश लब्धप्रतिष्ठित संप्रदायाचा पुरस्कार न करणारे फ्रेडरिक लिस्ट, अ‍ॅडम मिलर, हॅमिल्टन व हेन्री कॅरे हे युरोपियन व अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ मात्र रानडेंना जवळचे वाटत. त्या काळच्या इंग्रजांना वाटे की, अर्थशास्त्राची तत्त्वे व गृहीते वैश्विक सत्य आहेत. रानडेंनी हे प्रतिपादन धिक्कारून म्हटले की ती तत्त्वे व गृहीते केवळ इंग्लंडमधील परिस्थितीत सापेक्ष होत. भारताच्या अप्रगत व स्थितिशील कृषी अर्थव्यवस्थेला ती लागू होऊ शकणार नाही.

इंडियन पोलिटिकल इकॉनॉमी म्हणजे भारतीय धोरणाभिमुख अर्थशास्त्राचा पाया रचला महादेव गोविंद रानडे यांनीच. त्याबरोबर ‘इंडियन इकॉनॉमिक्स’ ही नवीन संकल्पना उत्क्रांत करून त्यांनी एक अभिनव ज्ञानशाखा साकार केली. या विद्याशाखेचे अध्वर्यू रानडे हेच! इंडियन इकॉनॉमिक्स हा या विषयावरील पहिला ग्रंथ लिहून त्यांनी विचारप्रवर्तन केले. आपली प्रखर बुद्धिमत्ता, अथांग विद्वत्ता व चिकित्सक दृष्टिकोन याद्वारे राजकारण, समाजसुधारणा व समतावादी अभियानाव्यतिरिक्त अर्थशास्त्रात रानडेंनी महान योगदान दिले. अर्थशास्त्राचे प्राध्यापक या नात्याने आपल्या जीविकेचा प्रारंभ त्यांनी मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयात केला. या विषयावर अनुभववादी अभ्यास करून कित्येक लेख व प्रबंध त्यांनी लिहिलेत. पुणे सार्वजनिक सबेची असंख्य विज्ञापने तेच तयार करीत. भारतीय अर्थव्यवस्थेचे टय़ून विकसीकरण म्हणजे अंडरडेव्हलपमेंट कशामुळे झाले याचे विश्लेषण सरकारी आकडेवारीने करून, त्यांनी उपाय सुचविले. या शिवाय ऑक्सफर्ड-केंब्रिज संप्रदायाच्या अर्थशास्त्रज्ञांच्या सिद्धांतांवर सैंद्धांतिक भाष्य करून रानडेंनी त्यांच्या उणीवा दाखवून दिल्या.

दादाभाई नवरोजी, आर. सी. दत्त, पी. सी. रे व जी. सुब्रमणिया अय्यर यांच्यासह रानडेंनी ‘धननिस्सारणाचा सिद्धांत’ साकार केला. ब्रिटिश वसाहतवादी यंत्रणेचे शोषक स्वरूप उघड करणारा जो विचार त्यांनी मांडला त्याला ‘इकॉनॉमिक क्रिटिक ऑफ कलोनिआलिझम’ म्हणावे लागते. या विचारामुळे अनेक युवक प्रेरित झालेत. आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके हे एक. फडकेंचा लढा जसा परकीय राजवटीविरुद्ध होता तसा आर्थिक शोषणाविरुद्ध देखील होताच. त्यांची बंडाची प्रेरणा आर्थिक अन्यायाशी निगडित होतीच. लढय़ापूर्वी फडके गुप्तपणे रानडेंना भेटलेही होते. इंग्रजांना याबाबत रानडेंचा दाट संशय वाटत होता. इंग्रजांच्या फायलीमधील हे शब्द रानडेंबद्दलचे आहेत: ‘द मोस्ट डेंजरस मॅन’ ‘ही इज अ पर्निशस इंफ्युएन्स’. फडकेंच्या बंडापासून (१८७९) रानडेंवर इंग्रजांची करडी नजर असे ती उगीच नव्हे. या विषयावर संशोधन करताना मला बऱ्याच अज्ञात घटना आढळून आल्यात. रानडेंचे बरेच लेखन आज उपलब्ध नसले, तरी सरकारी दस्तऐवजांमध्ये त्यांचा आशय व नोकरशाहीच्या त्यावरील प्रतिक्रिया मला पहायला मिळाल्या.
स्वदेशी चळवळ
वंगभंग चळवळीचा भाग म्हणून स्वदेशीची मोहीम बंगालने उभारल्यावर लोकमान्य टिळकांनी ती महाराष्ट्रात आणली (१९०५) असा समज आहे. तथापि त्यापूर्वीच २५ वर्षे आधी स्वदेशीचा मंत्र रानडेंनी दिला होता. डिसेंबर १८७२ मध्ये त्यांनी पुण्यातील एका विद्वत्तापूर्ण भाषणात म्हटले होते की, ‘भारताच्या संपत्तीरसाचे इंग्रजी राज्यकारभार व व्यापार शोषण करून घेत आहेत. प्रजेकडून मिळणाऱ्या उत्पन्नाचा एक-तृतीयांश भाग म्हणजे सोळा कोट रुपये दरसाल अविच्छिन्नपणे विलायतेत जातात. कच्चा माल परदेशी जातो व त्यामानाने पक्का उत्पादक माल कमी प्रमाणात येतो. त्यामुळे हिंदी कारागिरांच्या कलाकौशल्याचा क्षय होत असून सर्वाची प्रवृत्ती विलायती जीनसांकडेच दिवसेंदिवस वाढत चालल्यामुळे स्वदेशी जिनसांचा खप संसाराच्या सर्व कामात कमीकमी होत आहे. निर्यातीचे प्रमाण आयातीहून जास्त आहे. अर्थात हिंदी व्यापाराची स्थिती शोचनीय आहे.. देशात कारखाने काढून विलायती मालाच्या खपाची पीछेहाट करणे हे एक साधन आपल्या हातात आहे.’ भांडवली अधिमूल्यन व भांडवल निर्मिती या संकल्पना रानडेंनी मांडल्या. जबर करांव्यतिरिक्त इंग्लंडला पाठवावी लागणारी ‘खंडणी’, व्याज, होम चार्जेस नामक ब्रिटिश द्रव्यशोषण, रेल्वे कंपन्यांना द्यावयाची नफ्याची निश्चित हमी व अवैध रेमिटन्सेस यावरही रानडेंनी हल्ला केला. जर्मनीने विध्वंस केल्यावरही फ्रान्सने दाखवलेला स्वाभिमान व आत्मनिर्भरतेचे उदाहरण देऊन रानडेंनी भांडवल निर्मिती व स्वदेशीचा मंत्र दिला. कारखाने काढून शेतीवरील लोकांचा भार कमी करण्याचा मार्ग दाखवला.
या शिकवणुकीचा तात्काळ परिणाम होऊन जी. व्ही. जोशी ऊर्फ सार्वजनिक काकांनी आयात कापडाचा पूर्णपणे त्याग करून जानेवारी १८७३ मध्येच स्वदेशी वस्तूच वापरण्याचे व्रत अंगिकारले. विशेष म्हणजे १८७७ मध्ये व्हाइसरॉय लॉर्ड लीटन याने प्रथमच घडवलेल्या ‘दिल्ली दरबार’मध्ये जोशींनी हातमागाचे कपडे परिधान करून इंग्रज नोकरशाही व भारतीय महनीयांना चकित केले. जोशींप्रमाणेच आद्य क्रांतिकारक वासुदेवराव फडकेंनीही स्वदेशी कपडे व वस्तू वापरण्यास प्रारंभ केला व पुढे बहुसंख्य क्रांतिकारकांनी स्वदेशीच्या वापराची परंपरा पाळली. (पहा : न. र. फाटक, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचे चरित्र, पृ. १२३-२५).
जी. व्ही. जोशी व रानडेंनी १८७३ मध्ये पुण्यात स्वदेशी विक्रीची कंपनी काढली. त्यांच्याच प्रेरणेने पुणे सार्वजनिक सभेने १८७४ मध्ये महाराष्ट्रातील लघुउद्योगांच्या स्वदेशी वस्तूंचे प्रदर्शन भरवले तसेच एक सहकारी उपक्रमही उभारला. जोशींच्या निधनानंतर गोपाळ कृष्ण गोखले हे तर रानडेंचे शिष्य व मानसपुत्र बनले व त्यांनी आर्थिक चळवळीसाठी बरेच योगदान दिले. या दोघांनी १८९० मध्ये इंडस्ट्रियल असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया हा उपक्रम सुरू केला व त्याच वर्षांपासून औद्योगिक परिषद पुण्यात भरवण्याची प्रथा सुरू केली. या परिषदेत बरेच उद्योजक भाग घेत. त्याद्वारे उद्योजकांमध्ये आत्मविश्वास व स्वदेशीची प्रेरणा जागृत करण्यात येई. त्याचाच परिणाम म्हणून पुण्यात एक कापड गिरणी, मेटल मॅन्युफॅक्चरिंग फॅक्टरी, पूना डाईंग कंपनी, रे पेपर मिल व पूना र्मकटाईल बँक हे उपक्रम स्थापन झालेत. ते रानडेंची मदत व प्रेरणेमुळेच झाल्याचे गोखलेंनी नमूद केलेले आहे. आत्मनिर्भरतेचा पुरस्कार करताना त्यांनी साखर व तेलाच्या कारखान्यांना प्राधान्यक्रम दिला. तसेच मद्यनिर्मिती, लोकरी कापड, चर्मोद्योग, कागद व काच निर्मितीस उत्तेजन दिले. याचे कारण त्यांत इंग्लंडची स्पर्धा नव्हती. भारतीय उद्योगांना ‘इंफंट इंडस्ट्री प्रोटेक्शन’ मागणारे रानडे हे पहिले भारतीय! रेल्वे कंपन्यांप्रमाणेच भारतीय उद्योगांना सरकारने किमान नफ्याची हमी द्यावी ही मागणी ठामपणे करून रानडेंनी इंग्रजांना चकित केले होते.
विविध संस्था, महाविद्यालये व सामाजिक परिषदेच्या व्यासपीठावरूनही रानडे आर्थिक व औद्योगिक प्रबोधन करून सरकारपुढे गाऱ्हाणी मांडत व मागण्या करीत. १८९७च्या प्रसिद्ध वेबी कमिशनपुढे साक्ष देताना वित्तविषयक धोरण, चलन, विनियमाचे दर व स्वदेशीसाठी गो. कृ. गोखलेंनी प्रभावीपणे मांडलेल्या मांगण्यांचा मसुदा रानडेंनी तयार केला होता. सरकारी दस्तऐवज व अनुभववादी अभ्यासाद्वारे ते आपली भूमिका मांडत. लीवार्नर सारखे कट्टर साम्राज्यवादीदेखील त्यांच्या युक्तिवादाने प्रभावित होत असत. पण तरीही टिळकांचा वितंडवाद व आत्मप्रौढीच्या शैलीमुळे आर्थिक बाबींमध्ये देखील या दोन विचारप्रणालींमध्ये तणाव निर्माण होत. उदाहरणार्थ भारतीय उद्योगधंद्यांसाठी येथील भांडवलदारांना व विदेशी उद्योजकांनासुद्धा उत्तेजन द्यावे, असे रानडे म्हणत. तर यासाठी टिळक रानडेंना देशद्रोही म्हणत. डेक्कन कॉलेजमधील या विषयावरील सभेत भयानक वाक्ताडन व आरोपप्रत्यारोप झाले होते. केसरीमधील हेच वाक्य पाहा- ‘परदेशी भांडवलाचे गोडवे गाणारे माधवराव देशद्रोही आहेत.’ वस्तुत: देशातील उद्योगविकासासाठी परदेशी भांडवलसुद्धा स्वागतार्हच होते. कारण देशी भांडवल फारच कमी होते. पण टिळक प्रतिपक्षावर नेहमीच तुटून पडत. वितंडवाद निर्माण करीत.
आक्रमक भूमिका
स्वदेशीचा प्रचार अधिक जोमाने चालवण्यासाठी रानडेंनी फेब्रुवारी १८७३ मध्ये विश्रामबागेतील सभेत आपली आक्रमक भूमिका विषद केली. स्वदेशी, देशाभिमान व आत्मनिर्भरतेवर जोर दिला. विदेशी व्यापारातून होणारी फसवणूक, दुस्थिती व विसंगती स्पष्ट करून त्यामुळे देशातील उद्योग नष्ट झाल्याचे त्यांनी सांगितले. व्यापारी नफा इंग्रज कसा पचवतात व रेल्वे हे शोषणाचे साधन कसे बनले ते दाखवून दिले. भारतीय लष्कर व प्रशासनावरील खर्च ब्रिटनपेक्षा काही पटींनी जास्त असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. ‘इंदुप्रकाश’मधील लेख, १८७३ पासून कार्यप्रवण केलेल्या पुणे सार्वजनिक सभेने सरकारकडे पाठवलेली असंख्य विज्ञापने व जमाबंदीवरील त्यांचा प्रचंड ग्रंथ (१८७७) यातून रानडेंनी लोकांचे प्रबोधन करून सरकारवर चांगला वचक बसविला. (न. र. फाटक, उपरोक्त, पृ. १२७-३२).
रानडेंनी सडेतोडपणे म्हटले की, ‘हिंदुस्थानची जहाज वाहतूक आमची राहिली नाही. जुना बँक व विमा व्यवसाय आमच्या हातून गेला. कमिशनचा धंदा पूर्णपणे विदेशी मक्तेदारांकडे गेला. रेल्वे ही तर पूर्णपणे इंग्रज भांडवलदारांची मक्तेदारीच होय. कारण रेल्वे बांधली कंपन्यांनी. बांधण्याच्या भांडवलावर त्यांना निश्चित व चढय़ा दराने नफा दिला जाई भारतीयांच्या करउत्पन्नातून. शिवाय ऑपरेशनल एक्सपेन्स म्हणून रेल्वेला ठराविक लाभ मिळविण्यासाठी सरकारने हमी दिली होती. बाजारपेठ मिळवणे व भांडवलावर नफा या दृष्टिकोनातूनच रेल्वे बांधली होती. शिवाय संरक्षणदलाच्या हालचालीसाठी सुलभ व्हावे व प्रशासकीय मगरमिठी घष् करणे हा हेतू होताच. म्हणूनच रानडेंनी स्पष्ट केले की, रेल्वे व विदेशी व्यापार म्हणजे आर्थिक विकास नसून अर्थव्यवस्थेचे न्यूनविकसीकरण (अंडरडेव्हलपमेंट) व शोषणाचे माध्यम होय.. आम्ही केवळ राजकीय प्रांगणातच नव्हे तर आर्थिक क्षेत्रातही वर्चस्वहीन झालो आहोत. व्यापार व कारखानदारीतील प्रभावाद्वारेच स्वाभाविक राजकीय वर्चस्व प्राप्त होते. त्या क्षेत्रात तर आम्ही साफ कोसळलो आहोत.. भारतापुढील मूलभूत समस्या राजकीयपेक्षा आर्थिक हीच होती.’ (डॉ. के. के. चौधरी, झुंजार पुणे : वसाहतवाद व सामाजिक विषमतेशी लढा, पुणे, २००८ पृ. १५२-५४ यात अधिक विश्लेषण आहे).
१८९१ मध्ये पुणे-मुंबईत स्वदेशीची लाट पुन्हा उसळली. डेक्कन कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांनी स्वदेशी वस्तूंचे भांडार काढल्याने अनेक ठिकाणी त्याचे अनुकरण झाले. रानडेंनी इंफंट इंडस्ट्री संरक्षणाची मागणी लावून धरली व सरकारी क्षेत्राचा विकास करण्याचा आग्रह केला.
रानडेंची सैद्धांतिक भूमिका
लब्धप्रतिष्ठित संप्रदायाचे अर्थशास्त्रज्ञ-अ‍ॅडम स्मिथ, रिकाडरे, जेम्स मिल, सिनिओर, माल्थस, टॉरेन, बॅस्टिएट यांच्या सिद्धांतांवर रानडेंनी टीका केली. रिकाडरेची रेंट थेअरी भारताला अजिबात लागू होत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जमीन महसूल हा खंड नसून तो केवळ एक कर असल्याचे म्हटले. निरंकुश अर्थव्यवहार धोरणावर त्यांनी जोरदार हल्ला केला. लोकपरायण दृष्टिकोनातून सरकारने मोठे उद्योग काढावे असे सुचवले. ब्रिटिश लब्धप्रतिष्ठित संप्रदायाचा पुरस्कार न करणारे फ्रेडरिक लिस्ट, अ‍ॅडम मिलर, हॅमिल्टन व हेन्री कॅरे हे युरोपियन व अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ मात्र रानडेंना जवळचे वाटत. त्या काळच्या इंग्रजांना वाटे की, अर्थशास्त्राची तत्त्वे व गृहीते वैश्विक सत्य आहेत. रानडेंनी हे प्रतिपादन धिक्कारून म्हटले की ती तत्त्वे व गृहीते केवळ इंग्लंडमधील परिस्थितीत सापेक्ष होत. भारताच्या अप्रगत व स्थितिशील कृषी अर्थव्यवस्थेला ती लागू होऊ शकणार नाही. येथील परिस्थिती व समस्या इंग्लंडसारख्या नसून काही अंशी युरोप खंडातील तेव्हाच्या कृषिप्रधान देशांप्रमाणे आहेत. भारताची ऐतिहासिक पाश्र्वभूमी व सद्यस्थिती याअनुसार आर्थिक धोरण ठरवायला हवे. या विषयावर रानडेंनी बराच ऊहापोह केलेला आहे.
विचारप्रणालीच्या दृष्टीने रानडे भांडवलशाहीचे पुरस्कर्ते असल्याचे काहींचे मत आहे आणि ते खरेही आहे. तथापि त्यांच काळी रोझा लक्झेंबर्ग, जे. ए. हॉबसन अथवा लेनिनचे विचार तसेच कार्ल मार्क्‍सचे भारतातील ब्रिटिश वसाहतवाद यावरील मूलभूत लिखाण अद्याप इंग्रजीत नव्हते. स्वत: मार्क्‍सचा कॅपिटल हा ग्रंथ तर १८९२ पर्यंत इंग्रजी भाषेत उपलब्ध नव्हता. त्यामुळे समाजवादी आर्थिक विचारांचा प्रभाव पडणे शक्यही नव्हते. म्हणूनही रानडेंनी भारतीय भांडवलदारांना उत्तेजन दिले. देशाच्या विकासासाठी भांडवल व उद्योजकांची नितांत गरज होती. त्यामुळे तेव्हा भांडवलदारीला पर्याय नव्हता. हाच विचार स्वदेशी चळवळीतून प्रसारित झाला.
डॉ. के. के. चौधरी
माजी कार्यकारी संपादक व सचिव,
गॅझेटीअर विभाग, महाराष्ट्र शासन
मोबाइल : ९९६९४१२५३७