Leading International Marathi News Daily
मंगळवार, २४ मार्च २००९
विशेष

न्या. रानडे : पहिले मराठी अर्थशास्त्रज्ञ
लब्धप्रतिष्ठित संप्रदायाचे अर्थशास्त्रज्ञ-अ‍ॅडम स्मिथ, रिकाडरे, जेम्स मिल, सिनिओर, माल्थस, टॉरेन, बॅस्टिएट यांच्या सिद्धांतांवर रानडेंनी टीका केली. रिकाडरेची रेंट थेअरी भारताला अजिबात लागू होत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जमीन महसूल हा खंड नसून तो केवळ एक कर असल्याचे म्हटले. निरंकुश अर्थव्यवहार धोरणावर त्यांनी जोरदार हल्ला केला. लोकपरायण दृष्टिकोनातून सरकारने मोठे उद्योग काढावे असे सुचवले. ब्रिटिश लब्धप्रतिष्ठित संप्रदायाचा पुरस्कार न करणारे फ्रेडरिक लिस्ट, अ‍ॅडम मिलर, हॅमिल्टन व हेन्री कॅरे हे युरोपियन व अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ मात्र रानडेंना जवळचे वाटत. त्या काळच्या इंग्रजांना वाटे की, अर्थशास्त्राची तत्त्वे व गृहीते वैश्विक सत्य आहेत. रानडेंनी हे प्रतिपादन धिक्कारून म्हटले की ती तत्त्वे व गृहीते केवळ इंग्लंडमधील परिस्थितीत सापेक्ष होत. भारताच्या अप्रगत व स्थितिशील कृषी अर्थव्यवस्थेला ती लागू होऊ शकणार नाही.

कोकणातील अपारंपरिक ऊर्जेचा आशावाद : कोकण कृषी विद्यापीठाचे एनर्जी पार्क
मानवी जीवन शैलीत सुधारणा करायची असेल तर,ऊर्जा ही एक महत्त्वाचा घटक आह़े त्यामुळेच औद्योगिक व घरगुती क्षेत्रात ऊर्जेला महत्त्वाचे स्थान आह़े अशा परिरिस्थतीत पारंपरिक ऊर्जा स्त्रोतांचा ऱ्हास होत आह़े पारंपारिक ऊर्जा स्त्रोतांना पुरक स्त्रोत म्हणून सोलर, कृषी अवशेष व हायड्रोइलेक्ट्रिक स्त्रोतांचा उपयोग करणे योग्य ठरेल़ हे स्त्रोत कोकणात मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत़ अपारंपारिक स्त्रोतांचा उपयोग केला गेला तर पर्यावरणावर होणारे प्रदूषण टाळता येईल़ सगळ्या जगाचे लक्ष आज जास्तीत जास्त अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांचा उपयोग करून कधी न संपुष्टात येणारी व पारंपरिक ऊर्जेस पूरक अशी ऊर्जा कशा प्रकारे निर्माण करता येईल याकडे आह़े या पाश्र्वभूमीवर डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील एनर्जी पार्क एक महत्वपूर्ण भूमिका बजावीत आहे.

वादाविना पार पडलेले कविसंमेलन
८२ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे सूप अखेरीस वाजले. या संमेलनाने प्रचंड मोठा इतिहास घडवला, अनेकानेक वादही उभे केले. या साऱ्या वादांच्या, वादविषयांच्या निर्मितीस कारणीभूत ठरलेल्या घटना-प्रसंगांच्या तपशीलात शिरण्याचे येथे काहीच कारण नाही, ते प्रस्तुतही नाही. पण एक गोष्ट खरीच की 'एकविसाव्या शतकात मराठी साहित्य संमेलन ही बाब कालबाह्य ठरेल' असे जे विधान कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी केले होते, ते खरे ठरण्याचा काळ अधिकाधिक निकट येऊन ठेपला आहे, हे महाबळेश्वरमध्ये नुकत्याच भरलेल्या संमेलनाने सिध्द केले आहे. या संमेलनात त्यातल्यात्यात निर्वेध पार पडले ते निमंत्रितांचे कवी संमेलन. त्याला थोडेसे गालबोट लावण्याचा प्रयत्न आचारसंहितेचे कारण पुढे करून महाबळेश्वर पोलीसांनी करून पाहिला, पण महाबळेश्वर परिसरात आचार संहितेतील वेळ टळून गेल्यानंतरही जे कर्णकटु डिस्कोगाण्यांचे धुडगूस सुरू होते, ते ध्यानात घेऊन अटक झाली तरी बेहत्तर, काव्यवाचन सुरू ठेवायचेच असा निर्णय संमेलनाच्या संयोजकांनी ध्वनीवर्धकाचा आवाज थोडा कमी करत का होईना घेतला. गमतीचा भाग सोडून देऊ. पण त्या निमित्ताने एक विचारचक्र मात्र सुरू झाले. प्रतिवर्षी होणाऱ्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनात, विभागीय साहित्य संमेलनात, जिल्हा, शहर वा उपनगरीय साहित्य संमेलनात कवितेला जे स्थान मिळते ते उपेक्षेचेच. एक संमेलन सत्र निव्वळ कवितेसाठी योजले जाते, त्यात निमंत्रितांना स्थान मिळते, एक निव्वळ नवकवींसाठी योजले जाते, त्यात उगवत्या कवींना स्थान मिळते आणि या दोन्हीतून उरणारे मग कवीकट्टा भरवून आपली हौस भागवून घेतात. यंदाही तसे घडलेच. अशोक नायगावकर कवीसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी होते, समारोप करताना त्यांनी अध्यक्षीयवादाचा संदर्भ घेत चिमटा काढलाच. ते म्हणाले, 'चला, अध्यक्षीयपदाचा कुठलाही वाद न होता, हे एक संमेलन तरी पार पडले!' ठाणे शहरातील नामांकित वैद्यक व्यावसायिक विनोद इंगळहळ्ळीकर यांच्या 'मी जगलोच नाही' या कवितेने संमेलनाचा प्रारंभ झाला, तर 'या सुखांनो या' या कवितेने डोंबिवलीच्या प्राची गडकरी यांना प्रथमच अ.भा. मराठी साहित्य संमेलनात स्थान मिळाले. अडीच तास चाललेल्या संमेलनात भाव खाऊन गेले ते दोनच कवी. लक्ष्मीकांत रांजणे आणि अवधूत पटवर्धन. रांजणे वाईचे, त्यांनी 'गहिवर' या कवितेतून यादव प्रकरणाविषयीचा आपला सारा संताप व्यक्त केला, तर अवधूत पटवर्धनांनी सादर केलेल्या 'आम्ही कुणब्याची पोरं' या कवितेला चक्क वन्स मोअर मिळाला. रांजणे म्हणतात, 'करी शब्दांची निर्मिती, त्याची ख्याती देशभर नव्या युगाचा सर्जक, ऐसा ज्ञानी नरवर। त्येचा ‘गोतावळा’ किती, कागल झालं विश्वभर, ऐसा ‘खळाळ’ शब्दांचा, ‘नटरंग’ मातीवर। या मातीच्या रिनाची, ‘झोंबी’ त्याले अंगभर, एकाएका ग्रंथातून, केली उत्राई सत्वर। ऐसा संत गा आजचा, घराघरात वावर, बांधावरच्या कुणब्यानं, केला लेखणीचा नांगर। केली मशागत ऐसी, थक्क शारदेचा दरबार, ऐसा सारस्वत राजा, झाला सिंहासनाधिश्वर। त्याच्या जीवितकार्याला, पण लागली नजर, आमच्या मराठी बाण्याचा, वार-करी हो खंजीर। पुन्हा काळ तोच आला, ‘सूर्य’ डोहाचा अंधार, बडव्यांनी ज्ञानियाच्या, केला हटवादी येव्हार। तेव्हा इंद्रायणीतही, आनंद तरंग अपार, आज ‘आनंदाचे’ डोही, त्येच्या कार्याचा विसर। वैष्णवांनी बुडविला, विवेक अन् विचार, सहिष्णुतेला हो आज नाही उरे पारावार। कैसा आला गा हा काळ, करी वार संतावर, या ईपरीताने हो, व्यथित महाबळेश्वर। अभिव्यक्तिचा मेळावा, सैरभर हो अक्षर, अवघ्या साहित्य दिंडीला, आज येई गहिवर'।