Leading International Marathi News Daily
मंगळवार, २४ मार्च २००९

एक कोटीच्या घोटाळाप्रकरणी ढोलेसह सात जणांवर गुन्हा
पुणे जिल्हा न्यायालयीन पतसंस्था घोटाळा

पुणे, २३ मार्च / प्रतिनिधी

पुणे जिल्हा न्यायालयीन क र्मचारी पतसंस्थेत गेल्या आठ वर्षांत तब्बल एक कोटी दहा लाख १७ हजार रुपयांच्या आर्थिक घोटाळाप्रकरणी सुमारे एका महिन्यानंतर पतसंस्थेचे माजी अध्यक्ष सुनील ढोले यांच्यासह सात जणांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आज गुन्हा दाखल करण्यात आला. बनावट कागदपत्रे तयार करणे, फसवणूक, खोटी खाती तयार करणे असे आरोप ठेवण्यात आले आहेत. ‘लोकसत्ता’ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर हा घोटाळा उघडकीस आला आणि न्यायालयीन वर्तुळात एकच खळबळ उडाली. दौंडच्या दिवाणी न्यायालयात कर्मचारी म्हणून कार्यरत असलेले आणि पतसंस्थेचे माजी व संचालक अध्यक्ष सुनील अनंत ढोले, अंतर्गत लेखापरीक्षक एस. जी. बेलवाडकर (रा. धनकवडी), व्यवस्थापक सुनीता राजेंद्र कोंढरे (रा. सिंहगड रोड), किशोर आनंद पन्हाळकर (रा. हडपसर), संतोष पारखी (कोथरूड), किरण सुधाकर शिवरात्री (रा. येरवडा) आणि नितीन विष्णू दगडे (रा. इंदूरी, ता. वडगाव मावळ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एसएमएस’ युद्ध
‘रिअ‍ॅलिटी शो’च्या सध्याच्या युगामध्ये ‘एसएमएस’ला भलतीच मागणी आहे. अमूक-तमूकला ‘एसएमएस’ करा, अशा आशयाचे फलक शहरभर झळकताना दिसतात. निवडणुकीची धुमश्चक्रीही त्यामध्ये मागे नाही. आता हेच पाहा ना, उमेदवार निवडीपूर्वी ‘एसएमएस’, उमेदवारी जाहीर झाल्यावर ‘एसएमएस’ आणि प्रत्यक्ष प्रचारादरम्यानही ‘एसएमएस’चा मारा! त्यातच संगणकावरून ‘एसएमएस’ पाठविण्याची सोय उपलब्ध झाल्याने हे युद्ध आणखीनच भडकू लागले आहे.

प्राध्यापक संघ अध्यक्षाला जिवे मारण्याची धमकी
परदेशी विद्यार्थी प्रवेश घोटाळय़ातील प्रकार

पुणे, २३ मार्च/खास प्रतिनिधी

आंतरराष्ट्रीय विद्यार्थी केंद्रातील प्रवेशामध्ये झालेल्या घोटाळ्याप्रकरणी साक्ष देणारे पुणे विद्यापीठ शिक्षक संघाचे (पुटा) अध्यक्ष अतुल बागूल यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. कर्मचारी भरती घोटाळ्यापाठोपाठ उद्भवलेल्या या प्रकरणामुळे विद्यापीठ वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

डॉ. शां. ब. मुजुमदार यांना पुण्यभूषण पुरस्कार
पुणे, २३ मार्च/ विशेष प्रतिनिधी

त्रिदल-पुणे या संस्थेतर्फे देण्यात येणारा पुण्यभूषण पुरस्कार सिंबायोसिस संस्थेचे संस्थापक व सिंबायोसिस अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. शां. ब. मुजुमदार यांना जाहीर झाला आहे.
त्रिदल-पुणे या संस्थेच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत पुण्याच्या महापौर राजलक्ष्मी भोसले यांनी आज ही घोषणा केली. या पुरस्कार वितरण सोहळ्यात पाच ज्येष्ठ प्रकाशात न आलेल्या स्वातंत्र्यसैनिकांनाही गौरविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्रिदल संस्थेचे डॉ. सतीश देसाई, सुधीर गाडगीळ, प्रकाश पायगुडे, प्रकाश देवळे आदी या वेळी उपस्थित होते.

मुलास विष पाजून महिलेची आत्महत्या
शिक्रापूर, २३ मार्च/वार्ताहर

एका शेतमजूर महिलेने स्वत:च्या एक वर्षांच्या मुलास विष पाजल्यानंतर स्वत:ही विषप्राशन करून आत्महत्या केली. तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथे सकाळी अकरा वाजेच्या सुमारास ही हृदयद्रावक घटना घडली. याबाबत शरद साहेबराव ढमढेरे यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या घटनेत राणी तानाजी जगताप (वय २३, रा. पिंगळेनगर, तळेगाव ढमढेरे, ता. शिरूर, मूळ राहणार उस्मानाबाद) व तिचा मुलगा ओंकार (वय १ वर्ष) मरण पावले. शिक्रापूर पोलिसांनी या घटनेची दिलेली माहिती अशी की, एका किरकोळ कारणावरून काल रात्री राणी जगताप हिने आपल्या लहान भावाला मारहाण केली. यावरून तिचे पती तानाजी जगताप यांनी तिला दरडावले. आज सकाळी तानाजी जगताप हे शेतात कामास निघून गेल्यानंतर अकराच्या सुमारास राणीने आपल्या एक वर्षांच्या मुलाला विष पाजले. नंतर तिने स्वत:ही विष प्राशन केले. थोडय़ा वेळातच तिला झटके येऊ लागले तर मुलगा ओंकार याच्या जोरजोरात रडण्याच्या आवाजाने आजूबाजूचे रहिवासी त्या ठिकाणी आले. परिस्थितीचे गांभीर्य पाहून त्यांनी बेशुद्धावस्थेतील या दोघांना तळेगाव ढमढेरे येथील खासगी रुग्णालयात हलवले. मात्र त्या दोघांचे प्राण वाचू शकले नाही. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक आर. एम. चव्हाण करीत आहेत.

एसकेएफ मध्ये ‘ब्लॉक क्लोजर’
पिंपरी, २३ मार्च / प्रतिनिधी

चिंचवड येथील एसकेएफ बेअरिंग कंपनीत टीआरबी व टेक्साटाईल या विभागांत अनुक्रमे २७ ते ३१ मार्च व २६ ते ३१ मार्च असा दोन टप्प्यांत पाच दिवसांचा ‘ब्लॉक क्लोजर’ जाहीर करण्यात आला आहे. व्यवस्थापनाच्या मनुष्यबळ विभागाने तशा आशयाची एक नोटीस कंपनीच्या फलकावर आज दुपारी लावली. एसकेएफ व्यवस्थापन आणि कामगार संघटना यांच्यात नुकताच वेतनवाढ करार झाला. या करारात अर्थिक मंदी अथवा कंपनीच्या यंत्रसामग्रीची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी महिन्यातून सहा दिवस तसेच दिवाळी व मे महिन्याच्या कालावढीत प्रत्येकी बारा दिवस असा वर्षांतून ८४ दिवसांचा ‘क्लोजर’करण्याची तरतूद केली आहे. या करारात कामगारांना मूळ पगार अधिक महागाई भत्ता असे वेतन या कालावधीत मिळणार आहे.या दोन विभागांत सुमारे पाचशे कामगार कार्यरत आहेत.

‘बेबी युनिव्हर्स’मध्ये कल्पना, विचार यांची चर्चा झाली पाहिजे- श्याम मनोहर
पुणे, २३ मार्च/ प्रतिनिधी

‘समाजात आपले म्हणणे मोकळेपणाने मांडणे शक्य झाले तरच संशोधनात आपण पुढे जाऊ. सामाजिक परिस्थितीमुळे जाहीरपणे बोलणे अवघड जात असेल तर किमान आपल्या ‘बेबी युनिव्हर्स’मध्ये तरी कल्पना, विचार यांची चर्चा झाली पाहिजे. त्यातून संशोधनाच्या वाढीच्या शक्यता आहेत,’ असे मत साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लेखक श्याम मनोहर यांनी व्यक्त केले. मराठी विज्ञान परिषद, पुणे विभागातर्फे आयोजित ‘कळ’मधील ‘वैज्ञानिकांच्या कथा आणि आपण’ या चर्चासत्रात ते बोलत होते. श्याम मनोहर म्हणाले की, ‘आपल्या देशात बुद्धिमत्ता खूप आहे, असे म्हटले जाते. प्रतिकूल परिस्थितीतही बुद्धिमत्ता उतू जाऊन काही कार्य होत असेल तरच तिला बुद्धिमत्ता म्हणता येईल,’ या चर्चेत डॉ. अनिल लचके, डॉ. सुरेश गोरे आदींनी सहभाग घेतला. अध्यक्षस्थानी म. ना. गोगटे होते. अरुण साठे यांनी आभार मानले.

७६८ खटल्यातून वसूल झाले ९४ लाख रुपये
लोकन्यायालयाचा प्रभाव
पुणे, २३ मार्च / प्रतिनिधी

शिवाजीनगर येथील जिल्हा न्यायालयात लोकन्यायालयाच्या माध्यमातून विविध प्रकारची ७६८ खटले निकाली काढण्यात येऊन त्याद्वारे ९४ लाख रुपये वसूल करण्यात आले. तसेच २५५ खटले संबंधित पक्षकारांकडून मागे घेण्यात आले. जिल्हा न्यायाधीश विजय आचलिया, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य के. आर. वारियर आणि अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी एस. टी. ढवळे यांच्या उपस्थितीत झालेल्या या लोकन्यायालयात सुमारे एक हजार खटले चालविण्यात आले. त्यात तडजोड करून ७६८ खटले निकाली काढण्यात आले. त्यापैकी सर्वाधिक ४१८ खटले हे बीएसएनएलचे होते. तसेच युनियन बँक - १५, दिवाणी-२, गुन्हेगारी - ३१४, रिलायन्स- ६, मोटार अपघात खटला- १३ अशा ७६८ खटल्यांचा समावेश आहे. बीएसएनएलच्या पाच हजार खटल्यापैकी ४१८ खटले निकाली काढून त्यातून सोळा लाख २५ हजार रुपये वसूल करण्यात आले. बहुतांश खटले थकबाकी बिलांचे होते. हे खटले निकाली निघाल्याने अनेक ग्राहकांना दिलासा मिळाला. तेरा मोटार अपघातांच्या खटल्यातून ३७ लाख ४० हजार रुपये वसूल करण्यात आले. अ‍ॅक्वा मॅन्स इन्स्ट्रमेन्शनकडून वीस लाख रुपये वसूल करण्यात आले. राजलक्ष्मी इलेक्ट्रॉनिक्स कंपनीने अ‍ॅक्वाच्या विरोधात ३५ लाख रुपयांचा दावा केला होता. त्यात वीस लाखांची वसुली अ‍ॅक्वाकडून करण्यात आली.

बीजे’च्या अधिष्ठातापदी डॉ. जामकर
पुणे, २३ मार्च/ प्रतिनिधी

बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातापदी म्हणून डॉ. अरुण जामकर यांची वैद्यकीय शिक्षण खात्याने नियुक्ती केली आहे. डॉ. आनंद मलीक हे गेल्या वर्षी जुलै महिन्यात निवृत्त झाले. त्यानंतर दोन-तीन महिने प्रभारी अधिष्ठातापदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर डॉ. जामकर यांची कोल्हापूरला बदली करण्यात आली होती. त्यानंतर अधिष्ठातापदाचा कार्यभार शरीररचनाशास्त्र विभागाच्या डॉ. निर्मला बोराडे यांच्याक डे सोपविण्यात आला होता. प्रभारी पदाचा कार्यभार त्यांनी गेली चार महिने सांभाळल्यानंतर वैद्यकीय शिक्षण खात्याच्या विभागीय निवड मंडळामार्फत डॉ. जामकर यांची सेवाज्येष्ठतेनुसार बीजेच्या अधिष्ठातापदी म्हणून नियुक्ती करण्यात आली. याबाबत डॉ. जामकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ‘लोकसत्ता’च्या वृत्तास दुजोरा दिला. ते म्हणाले, ‘राज्याच्या सेवाज्येष्ठतेच्या यादीत आपण पहिल्या क्रमांकावर असल्याने अधिष्ठातापदी आपली नियुक्ती करण्यात आली.

पुणे जिल्हय़ात शंभर विभागीय दूरसंचार केंद्रे उभारणार - चंद्रप्रकाश
िपपरी, २३ मार्च/ प्रतिनिधी

शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागात ‘ब्रॉडबँड’ सेवा पोहोचविण्यासाठी भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल)च्या वतीने पुणे जिल्ह्य़ात १०० विभागीय दूरसंचार केंद्रे उभारण्यात येणार आहेत, अशी माहिती बीएसएनएलचे राज्याचे मुख्य महाप्रबंधक चंद्रप्रकाश यांनी चिंचवड येथे बोलताना दिली. बीएसएनएलतर्फे चिंचवड स्टेशन येथील विभागीय दूरसंचार प्रशिक्षण केंद्राच्या आवारात टेलिफोन एक्सचेंज केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन चंद्रप्रकाश यांच्या हस्ते झाले. तेव्हा ते बोलत होते. याप्रसंगी पुण्याचे महाव्यवस्थापक व्ही. के. महेंद्र, व्यवस्थापक शिवप्रकाश आदी उपस्थित होते. चंद्रप्रकाश म्हणाले की, बीएसएनएलने आता ग्रामीण भागाकडे लक्ष केंद्रित केले आहे. ब्रॉडबँड सेवा सर्वसामान्यांना पुरविण्यासाठी कंपनीच्या वतीने १५०० रुपयांमध्ये संगणक उपलब्ध करून देणारी योजना अमलात आणण्यात येणार आहे. ग्रामीण भागात ३० टक्के, शहरी भागात ४० टक्के आणि मोठय़ा शहरांत ६० टक्के ग्राहक ब्रॉडबँड सेवा वापरतात. यापुढे ब्रॉडबँडची मागणी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे याबाबतची मागणी लक्षात घेऊन पुढील पावले उचलली जात आहेत, असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवप्रकाश यांनी केले. सूत्रसंचालन रेखा दैठणकर यांनी केले. एस.टी. गायकवाड यांनी आभार मानले.

वाहतूक व्यवस्था, स्वच्छता आणि झोपडपट्टी पुनर्वसन मुद्दय़ांवर निवडणूक लढवणार- अरुण भाटिया
पुणे, २३ मार्च/प्रतिनिधी

आपण पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असून झोपडपट्टीवासीयांना अत्याधुनिक संगणकाचे व प्रगत इंग्रजी भाषेचे ज्ञान देणे, पाणी, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, स्वच्छता आणि झोपडपट्टी पुनर्वसन या मुद्दय़ांवर आपण निवडणूक लढवणार असल्याची घोषणा पीपल्स गार्डियन पक्षाचे अध्यक्ष अरुण भाटिया यांनी पत्रकार परिषदेत केली. भाटिया म्हणाले की, आपण गेल्या चार वर्षांत काय केले यापेक्षा आपण गेल्या ३१ वर्षांत काय केले हे पुणेकर जाणतात. तसेच बी. आर.टी. सारख्या योजनांपेक्षा शहरातील सार्वजनिक वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणारा मेट्रो रेल्वे प्रकल्प शहरात लवकरात लवकर योग्य नियोजनासह राबवण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भाषा, जात, धर्म यापेक्षा गुणवत्तेच्या आधारावर शहरातील युवकांना नोकरी आणि शिक्षण क्षेत्रात संधी मिळण्यासाठी आपण लढा देणार आहे आणि यामुळेच प्रोफेशनल पार्टी ऑफ इंडियाने आपल्या पाठिंबा दिला आहे, अशी माहिती भाटिया यांनी दिली. गेल्या काही दिवसांपासून आपण निवडणूक लढवू नये म्हणून आपल्याला धमक्या देण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

वडगावशेरीत २२ लाखांची वीजचोरी
पुणे, २३ मार्च/ प्रतिनिधी

वडगावशेरी येथील कुमार सन्स व कुमार हौसिंग अ‍ॅण्ड लॅन्ड डेव्हलपर्स कंपनीने सुमारे २२ लाख रुपयांची वीजचोरी केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणी ‘महावितरण’कडून गुन्हा दाखल करण्यात आला असून, संबंधित कंपनीकडून २४ लाख ६,४०० रुपयांची वसुली करण्यात आली आहे, अशी माहिती ‘महावितरण’कडून आज देण्यात आली. वडगावशेरी येथील कुमार सेरेब्रम या इमारतीत असलेल्या संबंधित कंपनीचा वीजपुरवठा बिल न भरल्याने २९ डिसेंबर २००८ रोजी बंद करण्यात आला होता. मात्र, बिलाची थकबाकी न भरता कुमार सन्स या ग्राहकाने कुमार हौसिंग अ‍ॅण्ड लॅन्ड डेव्हलपर्स यांच्याकडून अनधिकृतपणे वीजपुरवठा घेतला होता. त्यानुसार दोन लाख २३ हजार ९६ युनिट विजेची चोरी केल्याचा गुन्हा कंपनीच्या विरुद्ध दाखल करण्यात आला. त्यानुसार वीजचोरीचे २१ लाख ७९ हजार २३० रुपये व थकबाकीचे दोन लाख २७ हजार १७० रुपये संबंधित कंपनीने महावितरणकडे जमा केले आहेत. महावितरणचे मुख्य अभियंता एस. पी. नागटिळक, रास्ता पेठ मंडलाचे अधीक्षक अभियंता श्रीधर चौधरी, दक्षता व सुरक्षा विभागाचे उपसंचालक शिवाजी इंदलकर, सहायक संचालक दीपक क्षेत्रिय यांच्या मार्गदर्शनाखाली नगररोड विभागचे कार्यकारी अभियंता सुरेश गणेशकर, रास्ता पेठ विभागाचे कार्यकारी अभियंता बी. एम. इवरे, उपकार्यकारी अभियंता प्रवीण नाईक व त्यांच्या सहकार्यानी हे प्रकरण उघडकीस आणले.

दुचाकीस्वाराचा मृत्यू
पुणे, २३ मार्च/प्रतिनिधी

पौड गावाजवळ सुतारवाडी येथे एका भरधाव डंपरने धडक दिल्याने आज सायंकाळी झालेल्या अपघातामध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. अपघातानंतर डंपरचालक घटनास्थळावरून पसार झाला. त्यामुळे संतप्त जमावाने डंपरवर दगडफेक करून तो पेटवून दिला. विठ्ठल चव्हाण (वय ४०, रा. पौड) असे या अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्या मोटारसायकलस्वाराचे नाव आहे. चव्हाण हे आज सायंकाळी सव्वाचारच्या सुमारास दुचाकीवरून घरी चालले होते. सुतारवाडी येथे ते आले असता, एका भरधाव डंपरने त्यांना धडक दिली. या अपघातामध्ये चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाला.

कोथरूड निवडणूक कार्यालयाचे स्थलांतर
पुणे, २३ मार्च / प्रतिनिधी

कोथरूड विधानसभा मतदारसंघातील मतदारांच्या सोयीसाठी कोथरूड निवडणूक कार्यालयाचे स्थलांतर महापालिकेच्या कर्वे रस्ता क्षेत्रीय कार्यालयात करण्यात आले आहे. कोथरूड मतदारसंघाचे कार्यालय महापालिकेच्या मुख्य भवनात होते. मात्र, नागरिकांना ते गैरसोयीचे ठरल्याने हे कार्यालय आता हलविण्यात आले आहे. मतदार नोंदणी, नावातील दुरुस्ती, नाव वगळणे, पत्ता दुरुस्ती आदी कामांसाठी मतदारांनी कर्वे रस्ता क्षेत्रीय कार्यालयात (दूरभाष: २५५० ७५१२) संपर्क साधावा, असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी राजेंद्र मुठे यांनी केले आहे.

दुरुस्तीकामामुळे गुरुवारी विविध भागांत पाणी नाही
पुणे, २३ मार्च/ प्रतिनिधी

खडकवासला धरणातील जॅकवेल येथील विद्युतविषयक तातडीची दुरुस्ती कामे गुरुवारी (२६ मार्च) केली जाणार असल्यामुळे त्या दिवशी सकाळी अकरा ते सायंकाळी सहा या वेळेत विविध भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. गुरुवारी दुपारी पाणीपुरवठा बंद राहणारे भाग पुढीलप्रमाणे आहेत. वारजे परिसर- पौड रस्ता, उजवी व डावी भुसारी कॉलनी, शास्त्रीनगर, बावधन, भुगाव रस्ता परिसर, सूस रस्ता, बाणेर, बालेवाडी, पाषाण, वारजे महामार्ग परिसर, कर्वेनगर डहाणूकर कॉलनी, गांधी भवन, महात्मा सोसायटी. विद्यानगर भाग- धानोरी, कळस, विमाननगर, विद्यानगर परिसर. या सर्व भागांना शुक्रवारी (२७ मार्च) सकाळी नेहमीप्रमाणे पाणीपुरवठा होईल.

राष्ट्रवादीच्या उमेदवारांचे अर्ज ३१ मार्चला एकत्रितपणे भरणार .
िपपरी, २३ मार्च / प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने बारामती, शिरुर आणि मावळ मतदारसंघाच्या उमेदवारांचे अर्ज ३१ मार्चला एकत्रितरित्या भरण्यात येतील, अशी माहिती पालकमंत्री अजित पवार यांनी आज भोसरीत बोलताना दिली. यानिमित्त जोरदार शक्तीप्रदर्शन करण्याचे संकेत पवार यांनी दिले आहेत. माढा लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार व पक्षाध्यक्ष शरद पवार यांचा अर्जही ३१ मार्चला भरण्यात येणार असून त्या दिवशी अकलूज येथे विजयसिंह मोहिते पाटील यांच्या पुढाकाराने भव्य सभेचे आयोजन करण्यात आल्याचे पवार यांनी सांगितले. त्याच दिवशी पुण्यातील तीनही जागेसाठी अर्ज भरण्यात येतील. यावेळी प्रदेशाध्यक्ष आर. आर. पाटील यांच्या उपस्थितीत प्रचाराचा शुभारंभ करण्यात येणार आहे. यानिमित्त सभेचे आयोजनही करण्यात आले आहे. दुसऱ्या दिवसापासून खऱ्या अर्थाने प्रचारमोहिमेस सुरुवात होईल, असे सांगतानाच आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.

‘डीवाय’ पब्लिक स्कूलला परवाना रद्द करण्याचा इशारा
पिंपरी,२३ मार्च / प्रतिनिधी

दामदुप्पट फीवाढ करुन पालकांची अडवणूक करणाऱ्या पद्मश्री डॉ.डी.वाय.पाटील स्कूलला फीवाढ मागे घेण्याचे आदेश देत प्रसंगी शाळेचा परवाना रद्द करण्याचा इशारा, पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी हरी भारती यांनी दिला आहे. या प्रकरणात पालक संघाने शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर नुकतेच उपोषण केले.संस्थेवर कारवाईचे आश्वासन मिळाल्यावर उपोषण मागे घेण्यात आले.प्रशासन अधिकारी भारती यांनी संस्थेला दिलेल्या पत्रात, जादा दराने फी वसुली सुरु असल्याचे निदर्शनास येत आहे असे म्हटले आहे. यापुढे कोणत्याही विद्यार्थ्यांने अथवा पालकाने जादा दराने फी भरु नये.जादा दराने फी भरण्यासाठी संस्थेतर्फे विद्याथ्यार्ंस कोणताही त्रास दिल्यास त्याची गंभीर दखल घेऊन संस्थेविरुध्द मान्यता काढून घेण्याची कारवाई करु,असा इशारा भारती यांनी दिला आहे.