Leading International Marathi News Daily
मंगळवार, २४ मार्च २००९
राज्य

ब्रेकर फुटण्याची हॅटट्रिक, खंडित वीज पुरवठय़ामुळे उद्योजक संतप्त
नाशिक, २३ मार्च / प्रतिनिधी

सातपूर औद्योगिक वसाहतीतील विद्युत ब्रेकर फुटल्याने सोमवारी दुपारी वसाहतीतील जवळपास अध्र्या भागाचा वीजपुरवठा खंडित झाला. शनिवार, रविवार पाठोपाठ लागोपाठ तिसऱ्या दिवशी औद्योगिक वसाहतीतील वीज पुरवठय़ात बाधा आल्याने स्थानिक उद्योजकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून वीज कंपन्यांनी परस्परांमध्ये योग्य तो समन्वय राखत आपापली यंत्रणा सुधारावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

परचुरी गावी पूल उभारणीच्या आश्वासनाचा मागील पाच वर्षांत विसर
संगमेश्वर, २३ मार्च/वार्ताहर

परचुरी हे नदीपलीकडील गाव स्वातंत्र्योत्तर काळात पूल उभारणीची प्रतीक्षा करीत असून, पाच वर्षांपूर्वी लोकसभा निवडणुकीआधी या मतदानावर बहिष्कार टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या या गावाला पूल उभारणीचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र गत पाच वर्षांत या आश्वासनाचा विसर पडल्याची खंत येथील ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. परचुरी हे गाव संगमेश्वर तालुक्यात समाविष्ट आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील आंबेड बुद्रुक व मानसकोंड या गावांच्या मध्यभागी परचुरीतर हा थांबा आहे.

सामूहिक अटक करण्याची कळणेवासीयांची मागणी
अभिमन्यू लोंढे
सावंतवाडी, २३ मार्च

दोडामार्ग तालुक्यातील कळणे या गावी खनिज उत्खनन प्रकल्पावरून निर्माण झालेल्या आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर पोलिसांनी गुन्हे दाखल केल्याने कळणे गावाने सामूहिक अटक करण्याची आज मागणी केली. दिवसभर मंदिरात बसून भजन व कीर्तन करीत घोषणाबाजी करणाऱ्या आंदोलकांना पोलीस हात लावू शकले नाहीत. हे आंदोलन चिघळण्याची शक्यता असून सुजाण नागरिकांनी आंदोलकांना पाठिंबा दर्शविला आहे. उद्या मंगळवारी वारकरी लोकही दाखल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.

रत्नागिरीच्या विकासासाठी नीलेशला मते द्या! - नारायण राणे
रत्नागिरी, २३ मार्च/खास प्रतिनिधी

रत्नागिरी जिल्ह्याच्या सर्वागीण विकासासाठी काँग्रेसचे संभाव्य उमेदवार डॉ. नीलेश राणे यांना लोकसभा निवडणुकीत मतदान करण्याचे आवाहन राज्याचे उद्योगमंत्री नारायण राणे यांनी आज केले. रत्नागिरी जिल्ह्यातील निवडक पक्ष कार्यकर्त्यांचा मेळावा जिल्हा काँग्रेस समितीतर्फे आयोजित करण्यात आला.

संगमेश्वरजवळील अपघातप्रवण क्षेत्रातील रुंदीकरणाच्या कामाचा प्रारंभ
लोकसत्ता इफेक्ट
संगमेश्वर, २३ मार्च/वार्ताहर
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील संगमेश्वरच्या दुतर्फा असणाऱ्या अपघातप्रवण क्षेत्रातील अपघात रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना न केल्याने अपघातांच्या मालिका सुरू असल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’ने प्रसिद्ध करताच राष्ट्रीय महामार्ग विभागाने अरुंद व अवघड वळणांच्या रुंदीकरणाचे काम हाती घेतले आहे.

पुणे विद्यापीठ अधिसभेत गाजणार ५४ ठराव
पुणे, २३ मार्च/खास प्रतिनिधी

विद्यापीठाच्या व्यवस्थापन मंडळासह इतर अधिकार मंडळांच्या बैठका पुणे विद्यापीठाच्या कॅम्पसबाहेर इतरत्र आयोजित करू नयेत.. विद्यापीठ अधिकार मंडळाच्या बैठकीच्या दिवशी रात्री कुलगुरूंच्या निवासस्थानी भोजन व गायनाच्या कार्यक्रमाचे आयोजन विद्यापीठ निधीतून करण्यात येऊ नये....पुणे विद्यापीठाच्या अधिसभेच्या बैठकीदरम्यान सदस्यांच्या तीव्र भावनांना वाट करून देणाऱ्या अशा ठरावांसह एकूण ५४ ठराव मांडले जाणार आहेत. त्याचप्रमाणे प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून विद्यापीठाच्या कारभाराविषयीच्या नाराजीला वाट करून देण्यासाठी सदस्यांकडून मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. अधिसभेची येत्या शनिवार-रविवारी ( २८-२९) बैठक होत आहे. त्या निमित्ताने सदस्यांना वितरित करण्यात आलेल्या अंतिम कार्यक्रमपत्रिकेमध्ये सदस्यांनी मांडलेले ठराव आणि विचारण्यात आलेल्या प्रश्नांची माहिती देण्यात आली आहे. ‘विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठका पुण्याबाहेर अहमदनगर व नाशिक जिल्ह्य़ांतील काही संस्थाचालकांच्या ‘फार्महाऊस’वर आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यावर अधिसभेच्या काही सदस्यांनी यापूर्वीही आक्षेप नोंदविला होता. बैठकीपेक्षा हुरडापार्टी साजरी करण्यावरच भर असतो. त्यासाठी बैठकीचे निमित्त शोधले जाते. विद्यापीठाच्या निधीतून वाहन-निवास भत्ता वसूल करून अशा जेवणावळी साजऱ्या केल्या जातात,’ अशा भावना काही सदस्यांनी व्यक्त केल्या. त्याचे प्रतिनिधित्व म्हणून अधिसभेच्या माध्यमातून ठराव सादर करण्यात आला आहे.

इलेक्ट्रॉनिक मतदानयंत्रांना हजारे यांचा विरोध
नगर, २३ मार्च/प्रतिनिधी

इलेक्ट्रॉनिक मतदानयंत्रामुळे मतदारांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढीस लागून ग्रामीण भागात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असल्याची तक्रार करीत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी इलेक्ट्रॉनिक मतदानयंत्रास विरोध दर्शविला आहे. मुख्य निवडणूक आयुक्तांना हजारे यांनी निवेदन पाठविले असून, त्यात ही तक्रार केली आहे. इलेक्ट्रॉनिक मतदानयंत्रावरील मतमोजणीत गोपनीयतेचा भंग होत असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. घटनेनुसार आणि प्रचलित निवडणूक कायद्यामध्ये मतदारांना त्यांनी केलेल्या मताची गोपनीयता राखण्याची हमी देण्यात आली आहे. त्यानुसार मतपत्रिका मिसळून मतमोजणी करावयाची कार्यपद्धती विहित करण्यात आली. यापूर्वी विधानसभा, लोकसभा मतदारसंघांतील मतमोजणी दोन टप्प्यांत करण्यात येत असे. पहिल्या टप्प्यात मतपेटय़ांतील सर्व मतपत्रिका बाहेर काढल्या जात. नंतर मतपत्रिकांची संख्या निश्चित केली जात असे.

जळगावी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये ‘फ्री स्टाईल’
जळगाव, २३ मार्च / वार्ताहर

आपल्या कार्याचा लेखाजोखा मांडण्यासाठी जळगाव लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार खा. वसंत मोरे यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत युवक कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या वादंगाचे पर्यावसन मारहाणीत झाले. स्वत मोरे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करीत वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. तथापि, कार्यकर्त्यांनी कुणालाही जुमानले नाही.
पत्रकार परिषदेपूर्वी राष्ट्रवादी भवनात खा. मोरे यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यानंतर ठरलेल्या वेळेनुसार पत्रकारांचे आगमन झाले. चर्चेला सुरूवात होत असतानाच राष्ट्रवादीचे महानगर युवक अध्यक्ष विनोद देशमुख दाखल झाले आणि आपल्याला मारहाण करण्याची धमकी दिली जात असल्याचे सांगितले. त्यावेळी खा. मोरे, महानगर अध्यक्ष बंडू काळे, नगरसेवक गणेश सोनवणे, मंगलसिंग पाटील यांनी वाद नंतर मिटवू असे सांगत त्यांना बाहेर पाठविले. तथापि, देशमुख बाहेर जाताच वाद उफाळून आला. शिवीगाळ व मारहाणीचा आवाज येवू लागल्यावर पदाधिकाऱ्यांनी धाव घेतली. कार्यकर्त्यांच्या एका गटाकडून एका कार्यकर्त्यांला मारहाण सुरू होती. खा. मोरे यांनी हा प्रकार रोखण्याचा प्रयत्न केला. तथापि, कार्यकर्त्यांनी त्यांना दाद दिली नाही. या घटनेनंतर पदाधिकाऱ्यांनी सर्वाची समजूत काढत हा वाद पोलीस ठाण्यापर्यंत जावू दिला नाही.