Leading International Marathi News Daily
मंगळवार, २४ मार्च २००९
क्रीडा

आयपीएल परदेशात गेल्याने ‘टीम इंडिया’ निराश
ऑकलंड, २३ मार्च / पीटीआय

इंडियन प्रीमियर लीगचे दुसरे पर्व परदेशात आयोजित करण्याच्या बीसीसीआयच्या निर्णयावर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसह टीम इंडियाच्या अनेक खेळाडूंनी निराशा व्यक्त केली. युवराज सिंग, गौतम गंभीर आणि लक्ष्मीपती बालाजी यांनीही सचिनच्या सुरात सूर मिसळला असून मायदेशातील प्रेक्षकांपुढे खेळता येण्याची संधी त्यामुळे हिरावली असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

आयपीएल दक्षिण आफ्रिकेत ?
बुधवारी होणार निर्णय
नवी दिल्ली, २३ मार्च / वृत्तसंस्था
आयपीएलचा आयोजक देश म्हणून इंग्लंडच्या तुलनेत दक्षिण आफ्रिकेला प्रथम पसंती देण्याच्या घडामोडींना वेग आला आहे. आयपीएलचे कमिशनर ललित मोदी हे लंडनहून आज रात्री दक्षिण आफ्रिकेला रवाना होणार असून तेथे ते दक्षिण आफ्रिका सरकार आणि क्रिकेट वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशीही चर्चा करणार असल्यामुळे आयपीएलचे दुसरे पर्व इंग्लंडमध्ये होणार की, दक्षिण आफ्रिकेत याचा निर्णय बुधवारी होण्याची शक्यता असल्याचे वृत्त क्रिकइन्फो या वेबसाईटने दिले आहे.

लंडनला व्हावी आयपीएल
भारतीय संघाचे मत
ऑकलंड, २३ मार्च/ पीटीआय
ट्वेंन्टी-२० विश्वचषक स्पर्धा ही लंडनमध्ये खेळविण्यात येणार असल्याने इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) स्पर्धासुद्धा तिथेच खेळविण्यात यावी, असे मत न्यूझीलंड दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघातून व्यक्त होत आहे. आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धा ही लंडनमध्ये खेळविण्यात येणार असल्याने तिथेच जर आयपीएल खेळविण्यात आली तर त्याचा नक्कीच फायदा संघाला होणार आहे.

आयपीएल भारताबाहेर खेळवणे त्रासदायक- मोदी
नवी दिल्ली, २३ मार्च/ पीटीआय

भारतामध्ये इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) खेळवणे शक्य नसल्याने परदेशात स्पर्धा घेण्याचाच आमच्यासमोर पर्याय आहे. पण आयपीएल भारताबाहेर खेळविणे हे नक्कीच आमच्यासाठी त्रासदायक असेल, असे मत आयपीएलचे कमीशनर ललीत मोदींनी व्यक्त केले आहे. आयपीएल स्पर्धा भारतामध्ये भरविण्यासाठी मी स्वत: बरीच वर्षे प्रयत्नशील होतो.

चंद्रपॉल, स्ट्रॉसची शतके; विंडीजची इंग्लंडवर मात
मालिकेत १-१ बरोबरी

प्रोव्हिडन्स, २३ मार्च / एएफपी

शिवनारायण चंद्रपॉलने झळकावलेल्या दहाव्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय शतकाच्या जोरावर वेस्ट इंडिजने इंग्लंडचा २१ धावांनी पराभव केला आणि पाच एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी केली. पहिल्या लढतीत डकवर्थ-लुईस नियमाच्या आधारावर स्वीकाराव्या लागलेल्या पराभवामुळे विंडीज संघाला झालेले दु:ख काल मिळवलेल्या विजयामुळे काही अंशी कमी झाले.

राष्ट्रकुल स्पर्धासाठी अत्युच्च दर्जाची सुरक्षा व्यवस्था
नवी दिल्ली, २३ मार्च/पीटीआय

पुढील वर्षी दिल्लीत होणारी राष्ट्रकुल स्पर्धा सुरळीत आणि सुरक्षितपणे पार पडेल असा विश्वास भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने व्यक्त केला आहे. आय.पी.एल. स्पर्धा परदेशात हलविण्यात आल्याचा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धाच्या आयोजनावर कुठलाही परिणाम होणार नसल्याचे आयओचे सरचिटणीस रणधीर सिंग यांनी म्हटले आहे. रणधीर सिंग यांच्या मते आयपीएल स्पर्धेच्या तारखा या लोकसभा निवडणुकांदरम्यानच आल्याने सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला.

संदीप पाटील ‘कामगार केसरी’ तर प्रमोद नरुटेला ‘कुमार केसरी’चा मान
मुंबई, २३ मार्च/क्री.प्र.

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ आयोजित राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेतील ‘कामगार केसरी’ हा सर्वोच्च बहुमान वारणा सहकारी संघाच्या संदीप पाटील याने तर शंकर सहकारी साखर कारखान्याच्या प्रमोद नरुटेने ‘कुमार केसरी’ हा बहुमान मिळविला. या बहुमानाबरोबरच या दोघांना अनुक्रमे २१ हजार व १५ हजार रुपये रोख इनाम, चांदीची गदा, मानाचा पट्टा व प्रशस्तीपत्रे देण्यात आली.

कॅरम : पंकज पवार, आयेशा मोहम्मद अजिंक्य
मुंबई, २३ मार्च/क्री.प्र.

महाराष्ट्र राज्य कॅरम असोसिएशन आणि मुंबई जिल्हा कॅरम असोसिएशन मान्यताप्राप्त आणि शिवाजी पार्क जिमखाना आयोजित राज्य गुणांकन कॅरम स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी मुंबईच्या पाचवा मानांकित पंकज पवार व मुंबई उपनगरच्या चौथा मानांकित माजी राज्य विजेती आयेशा मोहम्मदने अनुक्रमे पुरुष व महिला गटाचे विजेतेपद मिळविले.

महाराष्ट्र कबड्डी संघटनेचे नवे पदाधिकारी घोषित
मुंबई, २३ मार्च / क्री. प्र.

महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या २००९-२०१३ या चार वर्षांसाठी नव्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. संघटनेच्या संयुक्त कार्यवाहपदाचा अपवाद वगळता इतर पदांसाठी बिनविरोध निवड झाली. या पदासाठी आठ उमेदवारांत लढत होती. त्यातून पाचजणांची संयुक्त कार्यवाह म्हणून निवड झाली. निवडून आलेले पदाधिकारी असे - अध्यक्ष : अजित पवार (पुणे), उपाध्यक्ष : मदन पाटील, सुरेश वरपुडकर, भाई जगताप, रमेश कदम, गणवतराव माने. कार्याध्यक्ष : किशोर पाटील, सरचिटणीस : मोहन भावसार, खजिनदार : फिदा कुरेशी. संयुक्त कार्यवाह (कंसात मते) : सुनील जाधव (५६), मुजफ्पर अली सय्यद (४३), राम मोहिते (३८), रमेश देवाडीकर (३६), गणेश शेट्टी (३६), पराभूत झालेले उमेदवार : मीनानाथ धानजी (३२), रमेश प्रभू (३१), उत्तमराव इंगळे (२९).

संक्षिप्त क्रीडावृत्त
आनंद पहिल्या स्थानावर
नाइस (फ्रान्स): विश्वविजेता विश्वनाथन आनंद याने अंबर ब्लाइंडफोल्ड व रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत व्लादिमिर क्रामनिकला १.५-०.५ असा पराभव करून एकटय़ाने आघाडी घेतली आहे. आनंदने ब्लाइंडफोल्ड डाव जिंकला पण रॅपिड बुद्धिबळात त्याला बरोबरीवर समाधान मानावे लागले. आनंदच्या खात्यात १०.५ गुण आहेत.

झुलन अव्वल स्थानावर
दुबई: विश्व चषकामध्ये चमकदार कामगिरी केलेल्या भारताची महिला क्रिकेट संघाची कर्णधार झुलन गोस्वामीने पुन्हा एकदा आयसीसीच्या क्रमवारीमध्ये अव्वल स्थान पटकाविले आहे. आयसीसीच्या गोलंदाजीच्या यादीमध्ये ऑक्टोबर महिन्यात तिने अग्रस्थान पटकाविले होते. त्यानंतर इंग्लंडच्या ईशा गुहाने तिला दुसऱ्या स्थानावर ढकलले होते. विश्व चषकामध्ये झुलानला चांगली साथ देणाऱ्या रूमेली धार आणि अमिता शर्मा यांच्याही क्रमवारीत लक्षणीय सुधारणा झालेली आहे. तर फलंदाजीमध्ये भारताची माजी कर्णधार मिताली राजने दहावे स्थान पटकाविले आहे.

सायमंड्स पुन्हा वादाच्या भोवऱ्यात
मेलबर्न: ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू अ‍ॅंड्रय़ू सायमंड्स हा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. येथील एका वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार सायमंड्स हा आपल्या मित्रांसह रविवारी रात्री ब्रिस्बेन येथे एका बारमध्ये गेला होता. तेथे सायमंड्स याने ग्लास फोडल्यामुळे त्याला व त्याच्या मित्रांना बार बाहेर हाकलण्यात आले. या वेळी सायमंड्स व त्याचे मित्र आरडाओरडही करत होते. अलीकडेच न्यूझीलंडचा यष्टीरक्षक ब्रेंडन मॅककुलम याचा नभोवाणीवरील मुलाखतीत असभ्य भाषेत उल्लेख केल्याबद्दल ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळाने सायमंड्स याला चार हजार डॉलर दंड केला होता.गेल्या वर्षी बांगला देशविरुद्धच्या सामन्यावेळी संघाच्या बैठकीला उपस्थित राहण्याऐवजी सायमंड्स मासेमारी करण्यास गेला होता. त्यामुळे त्याला संघातून वगळण्यात आले. त्यानंतर ऑस्ट्रेलिया मंडळाने त्याचे समुपदेशन करण्यासाठी समुपदेशकाची नियुक्ती केली होती. त्याचे समुपदेशन सध्या चालू आहे. मात्र त्याला मद्य घेण्यास अनुमती देण्यात आली होती, असे क्वीन्सलॅंड क्रिकेट संघटनेच्या पदाधिकाऱ्याने सांगितले.

बकनर यांना अलविदा
केपटाऊन: दक्षिण आफ्रिका-ऑस्ट्रेलिया यांच्यात रविवारी संपलेला तिसरा कसोटी सामना स्टीव्ह बकनर यांच्या कारकीर्दीतील अखेरचा कसोटी सामना होता. त्याबद्दल बकनर यांना काल ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंनी भावपूर्ण निरोप दिला. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनेही बकनर यांच्या कारकीर्दीचा गौरव केला आहे. विश्वचषक स्पर्धेच्या सलग पाच अंतिम लढतींत बकनर हे पंच होते. यावरूनच त्यांच्या श्रेष्ठ दर्जाची कल्पना येते, अशा शब्दांत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हरुन लॉरगॅट यांनी बकनर यांचा गौरव केला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटला बकनर यांची उणीव भासणार आहे, असेही लॉरगॅट यांनी सांगितले. इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात २९ मार्च रोजी होणारा एकदिवसीय सामना हा बकनर यांच्या कारकीर्दीतील अखेरचा एकदिवसीय सामना असणार आहे.

दक्षिण आफ्रिकेच्या संघात स्मिथचे पुनरागमन
केपटाऊन: दुखापतीमुळे कसोटी सामन्याला मुकलेला दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार गॅ्रमी स्मिथ फिट झाला असून पाच एकदिवसीय सामन्यासाठी त्याचे संघात पुनरागमन झालेले आहे. दक्षिण आफ्रिकेचा एकदिवसीय मालिकेसाठीचा संघ पुढील प्रमाणे :- गॅ्रमी स्मिथ (कर्णधार), जोहान बोथा (उपकर्णधार), हशिम अमला, मार्क बाऊचर (यष्टिरक्षक), अ‍ॅबी डि‘ व्हिलीअर्स, जे.पी.डय़ुमिनी, हर्शेल गिब्स, जॅक्स कॅलिस, अ‍ॅल्बी मॉर्केल, मॉर्न मार्केल, मखाया एन्टिनी, वेन पार्नेल, डेल स्टेन आणि वॉगन वॅन जार्सवेल्ड.

दुसऱ्या कसोटीसाठी न्यूझीलंडचा संघ जाहीर
ऑकलंड : हॅमिल्टन येथील पहिल्या कसोटी सामन्यात भारताकडून दहा विकेट्सने पराभूत झाल्यानंतरही न्यूझीलंडच्या संघात दुसऱ्या कसोटीसाठी फक्त एकच बदल करण्यात आलेला आहे. वेगवान गोलंदाज इयनओब्रायन हा दुखापतग्रस्त असल्याने स्थानिक सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या ब्रेन्ट आर्नेलला संधी देण्यात येणार आहे. अष्टपैलू खेळाडू जेकब ओरम हा दुखापतीतून चांगलाच सावरलेला असला तरी तो पूर्णपणे फीट नसल्याने दुसऱ्या कसोटीमध्ये तो खेळू शकणार नाही, असे न्यूझीलंडच्या निवडसमितीचे अध्यक्ष ग्लेन टर्नर यांनी सांगितले. न्यूझीलंडचा संघ पुढील प्रमाणे :- डॅनियल व्हेटोरी (कर्णधार), डॅनियल फ्लिन, जेम्स फ्रॅन्कलीन, मार्टीन गप्टील, टीम मॅक्नतोश, ब्रेन्डन मॅक्क्युलम, ख्रिस मार्टीन, कायले मिल्स, जीतन पटेल, जेसी रायडर, रॉस टेलर आणि ब्रेन्ट आर्नेल.

पंचांच्या एलिट पॅनेलमध्ये हिल व गोल्ड यांचा समावेश
दुबई: न्यूझीलंडचे टोनी हिल व इंग्लंडचे इयन गोल्ड यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या पंचांच्या एलिट पॅनेलमध्ये स्थान देण्यात आले आहे. त्यांच्या कामगिरीचा आढावा व निवड प्रक्रियेनंतर हा निर्णय घेण्यात आला. या दोन पंचांचा एलिट पॅनेलमध्ये समावेश केल्यामुळे या पॅनेलमधील पंचांची संख्या १२ झाली आहे. ५१ वर्षीय हिल हे १९९८पासून आंतरराष्ट्रीय पंचांच्या पॅनेलमध्ये आहेत त्यांनी नऊ कसोटी तर ६३ एकदिवसीय सामन्यात पंच म्हणून कामगिरी पाहिलेली आहे. तर ५७ वर्षीय गोल्ड १८ एकदिवसीय सामन्यात इंग्लंडकडून खेळलेले आहेत आणि २००६पासून आंतरराष्ट्रीय पंच म्हणून २ कसोटी तर ३१ एकदिवसीय सामन्यात उभे राहिलेले आहेत.

आयपीएल सहभागासाठी पाकिस्तान उत्सुक
कराची: इंडियन प्रीमियर लीग स्पर्धा आता भारतात होणार नाहीत हे स्पष्ट झाल्याने पाकिस्तान मंडळाने आपल्या खेळाडूंना या स्पर्धेत भाग घेता येईल का, यासाठी चाचपणी चालू केली आहे. या स्पर्धेत पाकिस्तानच्या खेळाडूंना भाग घेता येईल का, यासाठी आम्ही भारतीय क्रिकेट नियामक मंडळाशी संपर्क साधणार आहोत तसेच पाकिस्तान सरकारचा सल्ला घेणार आहोत, असे पाकिस्तान मंडळाचे अध्यक्ष एजाझ बट्ट यांनी आज पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी खेळाडूंनी आयपीएलमध्ये भाग घेऊ नये, असा आदेश काढण्यात आला, पण ही स्पर्धा भारतात होणार नाही हे स्पष्ट झाले आहे.