Leading International Marathi News Daily
मंगळवार, २४ मार्च २००९

आता प्रचाराच्या गाडीलाही ब्रेक!
संजय बापट

निवडणूक आचारसंहितेच्या काळात मतदारांवर प्रभाव पाडण्यासाठी जाती-धर्माच्या नावाने प्रचार करणे हा आचारसंहिता भंग मानला जात असतानाही ठाणे जिल्ह्यात सर्वत्र राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आपापल्या पक्षांचा खुलेआम प्रचार करीत आहेत. वाहनांवर मोठे स्टिकर्स लावून आचारसंहितेचा भंग केला जात असल्याबद्दल संबंधित यंत्रणांना आता एकाएकी जाग आली आहे.
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

कल्याणमध्ये उभारणार १०० फुटांची महागुढी
ठाणे/प्रतिनिधी :
एकीकडे सांस्कृतिक उत्सवांची परंपरा जपताना नव्या-जुन्याचा मेळ साधत नेहमीच भव्यदिव्य संकल्प साकारणे ही कल्याणकरांची खासियत. सबकुछ महिला मंडळांनी साजरा केलेला गणेशोत्सव असो वा महारांगोळी, महाभोंडला असो, नेहमीच आगळेवेगळे काहीतरी करून दाखविणाऱ्या कल्याणकरांनी यंदाही आपली ही परंपरा कायम राखीत भारतीय नववर्षांचे स्वागत तब्बल १०० फुटी गुढी उभारून करण्याचा मानस सोडला आहे.ठाणे ही राज्याची सांस्कृतिक उपराजधानी असली तरी भव्यदिव्य आणि आगळ्यावेगळ्या उत्सवांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने सांस्कृतिकपणा जपण्याचे श्रेय आजही कल्याण-डोंबिवलीलाच दिले जाते.

शिक्षण मंडळातील घोटाळ्याची एसीबीमार्फत चौकशी
ठाणे/प्रतिनिधी

ठाणे महापालिका शिक्षण मंडळात ठेकेदारी पद्धतीने मदतनीस/ सुरक्षारक्षकांची नेमणूक करताना झालेल्या आर्थिक घोटाळ्याची चौकशी आता लाचलुचपत प्रतिबंधक विभागानेही सुरू केली असून, सोमवारपासून मुख्याध्यापकांच्या चौकशीला प्रारंभ झाल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.
मिळालेल्या माहितीनुसार ठाणे महापालिका शिक्षण मंडळात शाळांमध्ये कंत्राटी मदतनीस नेमताना बनावट दस्तऐवज तयार करून लाखो रुपये हडप केल्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर लेखापाल ललिता जाधव आणि कारकून विजय कुंभार या दोघांना यापूर्वीच निलंबित करण्यात आले आहे.

सावित्रीच्या रंगमंचावर उषेच्या इंद्रधनुची प्रभा
डोंबिवली/प्रतिनिधी -
देव, भाव, भक्ती, प्रेम, देश आणि लोकगीतांच्या सुरेल सुरावटींमधून सावित्रीच्या रंगमंचावर उषेचे इंद्रधनु कधी उगवले हे दर्दी रसिकांना कळलेच नाही. निमित्त होते अवधूत एन्टरप्रायसेस आणि सिद्धिविनायक ग्रुप यांनी आयोजित केलेल्या प्रसिद्ध गायिका उषा मंगेशकर यांच्या ‘रंग उषेच्या’ कार्यक्रमाचे. सावित्रीबाई फुले रंगमंदिरात काल हा कार्यक्रम आयोजित केला होता. गेल्या अनेक वर्षांंनंतर प्रथमच डोंबिवलीत उषा मंगेशकर यांचा कार्यक्रम झाला. परीक्षांचा हंगाम, आर्थिक वर्षांखेर असूनही दर्दी रसिकांनी कार्यक्रमाला गर्दी केली होती. ‘स्वस्ती श्री गणनायक गजमुखम’ या गणेश स्तवनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. ‘

समाजातील अंध:कार नष्ट करण्यासाठी सद्गुणांचा
प्रकाश वाढविण्याची गरज -राम शेवाळकर

डोंबिवली/प्रतिनिधी -
समाजात सर्वदूर अंधार पसरला आहे. वाईट तेवढे पाहण्याची हौस वाढली आहे. हा अंध:कार समाजाला घातक असून तो नष्ट करण्यासाठी सद्बुद्धीवर विश्वास ठेवून, सद्गुण, सतप्रवृत्ती या प्रकाशाच्या परीघाची व्याप्ती वाढविण्याची गरज आहे; तरच समाजात नवचैतन्य निर्माण होईल, असे प्रतिपादन संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. राम शेवाळकर यांनी शनिवारी येथे केले.

कचरा दरुगधीविरुद्ध उत्स्फूर्त रास्ता रोको!
ठाणे/प्रतिनिधी

मुंबई महापालिकेच्या मुलुंड कचरा डंपिंग ग्राऊंडवरील सडक्या कचऱ्याच्या दरुगधीमुळे हैराण झालेल्या कोपरी, हरिओमनगर व परिसरातील नागरिकांनी रविवारी उत्स्फूर्तपणे पूर्वद्रुतगती महामार्गावर उतरून काही काळ रास्ता रोको आंदोलन केले. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. दैनंदिन जगणे असह्य करणारे मुलुंडचे डंपिंग ग्राऊंड बंद करा, अशी मागणी यावेळी नागरिक करीत होते. सुमारे एक तास संतप्त नागरिकांनी हरिओमनगरकडे कचरा घेऊन जाणारे मुंबई पालिकेचे डंपर्स व महामार्गावरील वाहतूक अडवून ठेवली. मुंबई महापालिकेच्या निर्ढावलेल्या प्रशासनाविरुद्ध नागरिक संतप्त घोषणा देत होते. काही वेळाने मुलुंडच्या नवघर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आमदार आव्हाड यांच्यासह १५-२० नागरिकांना ताब्यात घेऊन नंतर त्यांची मुक्तता केली.

बदलापूरमध्ये आनंद दिघे खो-खो अकादमीची स्थापना
बदलापूर/वार्ताहर :
बदलापूर शहरातून खो-खोच्या खेळाला पूर्वीचे गतवैभव प्राप्त व्हावे यासाठी खेळाडूंना शास्त्रोक्त प्रशिक्षण देऊन प्रोत्साहन देण्यासाठी नगरसेवक मनोज वैद्य यांनी पुढाकार घेतला आहे. यासाठी धर्मवीर आनंद दिघे खो-खो अकादमीची स्थापना केली आहे.
या खेळासाठी नगरपालिकेने अंदाजपत्रकात १० लाख रुपयांची तरतूद केली असल्याचे त्यांनी सांगितले.नगरपालिकेच्या १९९५ साली झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत आनंद दिघे यांनी खो-खोचा इतिहास असलेल्या शहरात खो-खो खेळ कायम सुरू ठेवावा, असे आवाहन केले होते. नगरपालिकेच्या वतीने खो-खो अकादमी सुरू करण्यात आली आहे. धर्मादाय आयुक्तांकडून संस्था नोंदणीकृत करण्यात येऊन शहरातील जाणकार व खेळाडूंना यात सामावून घेण्यात येणार आहे. या अकादमीचे पदसिद्ध अध्यक्ष व सचिव अनुक्रमे नगराध्यक्ष व मुख्याधिकारी असून, या अकादमीमध्ये शहरांतील नामवंत खेळाडू व विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ मंडळींचा सहभाग असणार असल्याचे वैद्य म्हणाले.

हरणटोळासह नऊ नागांना जीवदान
कल्याण/वार्ताहर :
कल्याण सर्पसेवा संस्थेच्या मदतीने पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी शिवसेना शहरप्रमुख विजय साळवी व माजी नगरसेवक विश्वनाथ भोईर यांनी नऊ नाग व एक हरणटोळ यांना ठाण्याच्या जंगलात सोडले. शहरातील कल्याण सर्पसेवा संस्थेचे दत्ता बोंबे गेली २५ वर्षे शहरातील सर्प पकडून जंगलात सोडण्याचे काम करतात. त्यांचे सहकारी रश्मी प्रजापती, पुष्कर कानडे, शैलेश बोबडे, योगेश कांबळे, दरीमधील मृतदेह काढणे, घरांमध्ये, सोसायटींमध्ये आलेले सर्प पकडणे, ते आधारवाडी अग्निशमन दलाच्या जागेमध्ये ठेवणे, त्यानंतर ते अग्निशामक दलाच्या खास गाडीने जंगलात सोडले जातात. या संस्थेने आतापर्यंत एक हजार निरनिराळ्या जातीचे साप जंगलात सोडून पर्यावरणाचा समतोल राखण्याचा प्रयत्न केला आहे.