Leading International Marathi News Daily
मंगळवार, २४ मार्च २००९
व्यक्तिवेध

जॅक मा (वय वर्षे ४४) म्हणजे चीनचे नारायण मूर्ती आहेत! १९९५ साली ‘अलीबाबा डॉट कॉम ’ या वेबसाइटची स्थापना केल्यापासून या गृहस्थाने कधी मागे वळून पाहिले नाही. आज त्यांचा ‘अलीबाबा’ हा एक उद्योगसमूह झाला आहे. आपल्याकडील नारायण मूर्तीचा प्रवास जसा शून्यातून झाला तसाच काहीसा प्रवास जॅक यांचा आहे. महत्त्वाचे म्हणजे ९५ साली ‘अलीबाबा’ स्थापन करीपर्यंत त्यांनी संगणकाला कधी हातही लावला नव्हता. त्यांनी चीनमध्ये इंटरनेटवर आधारित पहिली कंपनी स्थापन केली. तोपर्यंत चीनमध्ये

 

अनेकांना इंटरनेट म्हणजे काय याची पुसटशीही कल्पना नव्हती. इंटरनेटद्वारे व्यवहार करणे तर लांबच राहिले. मार्च ९५ मध्ये जॅक यांनी आपल्या घरात १८ सहकाऱ्यांसमवेत ‘अलीबाबाडॉट कॉम’ ही वेबसाइट सुरू केली. सुरुवातीला त्यांनी लहान व मध्यम उद्योगांना ही सेवा देण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांच्या या सेवेला उत्कृष्ट प्रतिसाद मिळत गेला आणि अलीबाबाचा पसारा झपाटय़ाने वाढत गेला. त्यामुळे त्यांनी बिझनेस टू बिझनेस सेवा देणारी साइट सुरू केली. २००१ मध्ये ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’ने जॅक यांची ‘यंग ग्लोबल लीडर’ म्हणून निवड केली. २००४ साली चायना सेंट्रल टेलिव्हिजनने जगातील दहा आघाडीच्या उद्योजकांमध्ये त्यांचा समावेश करीत त्यांना सन्मानित केले. पुढच्याच वर्षी ‘फॉच्र्युन ५००’ मासिकाने आशियातील ‘मोस्ट पॉवरफुल बिझनेस पीपल’ च्या यादीत त्यांचा समावेश केला. या विविध पुरस्कारांमुळे जॅक जगापुढे आले. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू प्रकाशझोतात आले. वयाच्या १२ व्या वर्षी त्यांचा प्रथम इंग्रजी भाषेशी संबंध आला. इंग्रजी ही जगाची भाषा आहे हे लक्षात घेऊन त्यांनी ही भाषा शिकण्यास सुरुवात केली. बाइक चालविणे हा एक त्यांचा आवडता छंद. दररोज किमान एक तास ते आवडीने बाइक चालवीत. जॅक तरुण असताना चीनची अर्थव्यवस्था नुकतीच खुली होत होती. त्यामुळे त्यांच्याच सांगण्यानुसार, ‘आपण चिनी असण्यापेक्षा जागतिक व्हावे’ असे वाटू लागले होते. १९७९ मध्ये जॅक यांची व एका ऑस्ट्रेलियन कुटुंबाची पत्राद्वारे मैत्री झाली. या कुटुंबाने ८५ साली जॅक यांना सुट्टीत ऑस्ट्रेलियाला भेट देण्यास बोलावले. ऑस्ट्रेलियाल्या या ३१ दिवसांच्या सुट्टीने त्यांचे आयुष्य पार बदलून टाकले. दृष्टी पार बदलून गेली. जग ही बाजारपेठ असल्याचा साक्षात्कार जॅक यांना या भेटीत झाला आणि त्यांनी त्या दृष्टीने विचार करण्यास प्रारंभ केला. याचा त्यांना पुढील आयुष्यात मोठा उपयोग झाला. नवीन तंत्रज्ञानाचा ध्यास घेण्याची प्रेरणा त्यांना यातूनच मिळली. त्यांनी चीनमध्ये कुणालाच माहीत नसलेल्या पण जगात झपाटय़ाने वाढत असलेल्या इंटरनेट क्षेत्रात प्रवेश करण्याचे ठरविले. आज परिस्थिती अशी आहे की, चीनमधील एकूण इंटरनेटधारकांची संख्या अमेरिकेहून जास्त आहे. ‘अलीबाबा’ ही चीनमधील तीन कोटी ग्राहक असलेली सर्वात मोठी इ कॉमर्स कंपनी आहे. त्याचबरोबर ‘याहू चायना’चा ताबा जॅक यांच्याकडे आहे. भारतातही ‘अलीबाबा’ ही साइट लोकप्रिय आहे. गेल्या वर्षांत भारतातील त्यांचे ग्राहक १३८ टक्क्यांनी वाढले. सध्याची चीन व भारतात आलेली मंदी ही आपल्यासाठी एक प्रकारची संधी आहे, असे जॅक यांचे मत आहे. सध्या मंदीमुळे सर्वत्र नोकरकपात होत असताना जॅक मात्र ५००० कर्मचाऱ्यांची भरती करणार आहेत. भारत ही आय.टी.ची जननी आहे. त्यामुळे आपल्याला भारतातून कर्मचारी घेण्यात विशेष रस आहे, असे जॅक यांचे म्हणणे आहे. गेल्या नोव्हेंबरमध्ये ‘अलीबाबा’ने समभागांची खुली विक्री केली होती. त्यामुळे या कंपनीचे बाजारातील एकूण मूल्य २६ अब्ज डॉलरवर गेले. जॅक यांची कंपनी अशा प्रकारे झपाटय़ाने वाढत चालली आहे. भविष्यात जॅक यांनी बिल गेटस्ची जागा घेतल्यास आश्चर्य वाटू नये.